Robot collapse after working 20 hours : मानवाची मदत करण्यासाठी आणि मानवाचे काम सोपे करण्यासाठी सुरुवातीला यंत्रांची, नंतर तंत्रज्ञानाची आणि आता गेल्या काही काळापासून यंत्रमानवाची निर्मिती होत असल्याचे आपण पाहत आहोत. यंत्रमानव म्हणजेच रोबोट्स मनुष्यापेक्षा अधिक काम करण्यास सक्षम असतात, असे आपण म्हणतो. हेच यंत्रमानव मनुष्याची जागा घेतील की नाही, अशी चर्चा होत असतानाच तब्बल २० तास काम केल्यानंतर चक्क रोबोटदेखील थकून जमिनीवर कोसळल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एक्स [पूर्वीचे ट्विटर] या सोशल मीडियावरील Agility Robotics नावाच्या अकाउंटने त्यांनीच विकसित केलेल्या या रोबोटचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘डिजिट’, असे त्या रोबोटचे नाव असून, तो २० तासांची लांब शिफ्ट करण्याच्या क्षमतेचे प्रदर्शन करीत होता. एका कपाटातून वस्तू उचलून काउंटरपर्यंत नेण्याचे काम तो यंत्रमानव २० तास करतो. त्याची अपेक्षित तासांची क्षमता संपताच डिजिट रोबोट हातात उचलून घेतलेल्या वस्तुनिशी खाली कोसळतो आणि ते प्रात्यक्षिक संपते.

हेही वाचा : ‘या’ देशात चक्क ‘रोबोट्स’ करतात फूड डिलिव्हरी! पाहा सोशल मीडियावर व्हायरल होणारा Video

डिजिट रोबोटला या प्रात्यक्षिकात ९९ टक्के यश मिळाल्याचे समजते. मात्र, हा रोबोट जेव्हा कोसळून पडला तेव्हा ती कोणतीही त्रुटी नसून, बॅटरी कमी असल्याने नियंत्रित शट-डाउन असल्याचे कंपनीने त्यांच्या व्हायरल पोस्टवरील कॅप्शनमध्ये सांगितले आहे.

‘डिजिट’चे डिझाईन हे इतर यंत्रमानवाच्या डिझाईनपेक्षा वेगळे आहे. इतर रोबोट्सपेक्षा अधिक गतिमान पद्धतीने आणि चपळाईने हालचाल करण्यासाठी त्याचे खास डिझाईन केले गेले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांचे काय म्हणणे आहे ते पाहा.

“बघा! म्हणजे रोबोट्ससुद्धा इतके तास काम करून थकतो”, असे एकाने लिहिले आहे.
“तंत्रज्ञानदेखील परिपूर्ण नसते”, असे दुसऱ्याने लिहिले आहे.
“अरे, कुणीतरी त्यामध्ये नवीन बॅटरी घाला”, अशी तिसऱ्याने मिश्कील प्रतिक्रिया दिली आहे.

एक्स [पूर्वीचे ट्विटर] व्हिडिओ पाहा :

हेही वाचा : Optimus robot घालतोय कपड्यांच्या घड्या; पाहा एलॉन मस्कने शेअर केलेला ‘हा’ भन्नाट व्हिडीओ….

इन्स्टाग्राम व्हिडिओ पाहा :

एक्सवरील Agility Robotics या अकाउंटने हा व्हिडीओ शेअर केलेलाच आहे; मात्र इन्स्टाग्रामवरदेखील @businessbulls.in या अकाउंटद्वारे हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे.