अमेरिकेत हिंदू आणि हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याची चिंता भारतीय वंशाचे खासदार श्री ठाणेदार यांनी व्यक्त केली. आहे. हिंदूविरोधी हल्ल्यांची ही फक्त सुरुवात असल्याचाही सूचक इशारा त्यांनी दिला. अमेरिकेत पत्रकार परिषद घेऊन हिंदू ॲक्शन या बिगर सरकारी संस्थेने हिंदूंवरील वाढत्या हल्ल्यांना वाचा फोडली. तसेच एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना खासदार श्री ठाणेदार म्हणाले की, अमेरिकेत सध्या हिंदू धर्मावर हल्ले वाढत आहेत. तसेच ऑनलाईन आणि इतर माध्यमातून चुकीच्या माहितीचाही प्रसार होतोय.

श्री ठाणेदार यांच्यासह रो खन्ना, राजा कृष्णमूर्ती, ॲमी बेरा आणि प्रमिला जयपाल या चार भारतीय वंशाच्या खासदारांनीही न्याय विभागाला पत्र लिहून हिंदू मंदिरांवर वाढत्या हल्ल्यांचा तपास करण्याची विनंती केली होती. सोमवारी नॅशनल प्रेस क्लब येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री ठाणेदार यांनी सांगितले की, आमच्या तक्रारीनंतरही अमेरिकन प्रशासन कोणतीही कारवाई करण्यास तयार नाही. आतापर्यंत हल्ले करणाऱ्यांपैकी कुणालाही अटक झालेली नाही.

जॉर्जियामध्ये ‘हिंदूफोबिया’ विरोधी ठराव मंजूर; हिंदूफोबिया म्हणजे काय आणि हा ठराव आणण्याची गरज का भासली?

“मागच्या काही महिन्यांपासून हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे आम्ही पाहतोय. मला वाटतंय की, ही फक्त सुरुवात आहे. हिंदू समाजाविरोधात समन्वयित पद्धतीने हल्ले आणखी वाढतील, असे दिसते. आता वेळ आली आहे, समाजाने आता एकत्र राहिले पाहीजे आणि मी तुमच्याबरोबर खंबीरपणे उभा आहे”, अशी भावना खासदार ठाणेदार यांनी व्यक्त केली.

श्री ठाणेदार पुढे म्हणाले, “मी लहानपणापासून हिंदू धर्माचे आचरण करत मोठा झालो. हिंदू धर्म हा अतिशय शांतताप्रिय असा धर्म आहे. हिंदू धर्मात दुसऱ्या धर्मावर हल्ला केला जात नाही. तरीही हिंदू समाजाचे चुकीचे चित्रण केले जाते, गैरसमज पसरविले जातात आणि कधी कधी हे जाणीवपूर्वक केले जाते. माझ्यासह इतर चार खासदारांनी मध्यंतरी न्याय विभागाला पत्र पाठवून चिंता व्यक्त केली.”

गेल्या काही काळात कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क याठिकाणी काय झाले, हे सर्वांनी पाहिले आहेच. संपूर्ण अमेरिकेत सध्या हिंदूंवर हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. हिंदू मंदिरांवर होणारे हल्ले नियोजित पद्धतीने होत असून त्यामुळे हिंदू समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असेही श्री ठाणेदार यांनी सांगितले. ठाणेदार असेही म्हणाले की, हल्ल्याच्या घटनेनंतर स्थानिक प्रशासन, पोलीस त्याची दखल घेतात. मात्र तपास म्हणावा तसा पुढे जात नाही, त्यामुळे कुणावरही अद्याप कारवाई झालेली नाही.