रस्त्यावर एखादा भटका कुत्रा दिसला तर आपली साधारण प्रतिक्रिया काय असते? अनेकजण हातातला दगड उचलून त्या मुक्या प्राण्याच्या दिशेने भिरकावतात, कोणी लाथा मारून त्याला हुसकावून लावतं, तर कोणी या भटक्या प्राण्याला बघून क्रूरपणाची हद्दच गाठतो. शेवटी ते एक मुकं जनावर आहे त्याला फक्त आपल्या प्रेमाची गरज आहे, असा विचार कोणी का नाही करत? खरंतर या कुत्र्यांना कोणी वाली नसतो, रस्त्यावरच जे काही मिळेल ते खाऊन, उघड्यावरच झोपून हा प्राणी जगतो. जर आपण घरातल्या कुत्र्यांवर एवढा जीव, माया करतो तर या रस्त्यावरच्या मुक्या जनावरावर थोडी माया केली तर काय बिघडतं? असा विचार आपण का नाही करत? किंवा जे विचार करतात त्यांचीही संख्या खूपच कमी का आहे?

भटका कुत्रा दिसला की त्याला एकतर मारायचे किंवा हुसकावून तरी लावायचे एवढंच माहिती असणाऱ्या आजकालच्या लोकांची हिच मानसिकता बदतोय तो एक तरुण. ‘द फर्स्ट हग’ हे त्याच्या मोहिमेचे नाव. या मोहिमेअंतर्गत बनवलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्राण्याला फक्त थोड्या दयेची, प्रेमाची गरज आहे आणि तुम्ही तुमच्या वाटेचे अगदी मुठभर प्रेम जरी या प्राण्याला दिलं तरी तो तुमचा चांगला मित्र होऊ शकतो हेच त्याला समाजाला दाखवायचं आहे. म्हणून त्याने या भटक्या कुत्र्यांसोबत एक संपूर्ण दिवस घालवला. अनोळखी माणूस दिसला की त्यावर भुंकणारे हे कुत्रे त्यालाही बघून भुंकू लागले. पण त्यांच्याशी मैत्री करण्याचे त्याने ठरवले होते सुरूवातीला थोडंसं जवळ जाण्याचा प्रयत्न करत त्याने प्रेमाने या कुत्र्यांना जवळ घेतलं. मग काय काहीवेळापूर्वी त्याच्यावर भुंकणार कुत्रे शांत झाले. त्याच्या कुशीत विसावले. त्याला कोणतीही इजा पोहोचवली नाही. उलट त्याच्याभोवतीच रेंगाळू लागले.

फक्त या प्राण्याला तुमच्या प्रेमाची गरज आहे आणि जर तुम्ही थोडसं का होईना पण प्रेमाचा वर्षाव त्यांच्यावर केला तर तुमच्याशी आयुष्यभर इमान राखायलाही ते तयार होतात हेच त्याने आपल्या कृतीतून दाखवून दिले. या कुत्र्यांना एकतर घाबरणारे किंवा त्यांना दगड मारून हुसकावून लावण्याऱ्या शाळेतल्या मुलांनाही त्यांने या आपल्या मोहिमेतून या मुक्या जीवावर प्रेम करायला शिकवले. आता त्याच्यासारखी या भटक्या कुत्र्यांना जाऊन मिठी मारायला  आपल्याला काही शक्य नाही. पण त्या मुक्या जिवाला आपल्याकडून तरी इजा पोहचत नाही ना हा प्रयत्न तर आपण नक्कीच करू शकतो.