पावसाळ्यात घाटरस्त्यावर वाहनं चालवणं चालकांसाठी कसरतच असते. त्यांचा खरा कस पणाला लागतो. खच्चून माल भरलेलं अवजड वाहन घेऊन भरपावसात घाट पार करणं काही साधी गोष्ट नक्कीच नाही. एक तर पावसामुळं वाहनासमोरचा रस्ता स्पष्ट दिसत नाही. रस्ते निसरडे होतात, तर कधी-कधी परिस्थिती इतकी भयंकर असते की भूस्खलन होऊन समोरचा भाग खोल दरीत कोसळेल याचा काही नेम नाही. अशा परिस्थितीत अवजड वाहनं चालवणं म्हणजे थेट मृत्यूच्या वाटेवरून प्रवास करण्यासारखं आहे. याचाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानातील हतियन बाला भागातील हा व्हिडिओ आहे. झेलम नदीच्या काठावर वसलेल्या या गावातून हा ट्रक चालला होता. अर्थात या ट्रकमध्ये क्षमतेपेक्षाही जास्त माल भरला होता आणि अशातही चालक जीव धोक्यात घालून ट्रक पुढे रेटून नेत होता.

त्यातून पाऊस पडून गेल्याने घाटावरचा रस्ता अधिक निसरडा झाला होता. अशा बिकट परिस्थितीतही ट्रक पुढे नेण्याचा मूर्खपणा ट्रकचालकाने केला आणि काही सेकंदात भूस्खलन होऊन ट्रक दरीत कोसळला. रस्त्याच्या कडेला उभे असणारे इतर प्रवासी हतबल होऊन हे दृश्य पाहत बसले. ‘एक्सप्रेस ट्रिब्यून’ने हा व्हिडिओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.