Viral Video: शाळेतील आठवणी म्हणजे पाठीवर दप्तर, शाळेचा गणवेश आणि त्यावर त्रिकोणी रुमाल, हातात डब्याची पिशवी आणि बरंच काही… तुम्ही शाळेत अनेकदा अनुभवलं असेल की, कंपासमधील दररोज पेन्सिल, खोडरबर, कटर शाळेत हरवून जायचं. तसेच शाळेत गृहपाठ लिहून घेताना अनेकदा प्रत्येकाला पेन्सिल दातानं कुरतडण्याची, तर विचार करताना पेन्सिल तोंडात घालण्याची सवय असायची. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात एका शेफनं स्टेशनरी केक म्हणजेच पेन्सिल, कटरचा केक बनवला आहे; जो तुम्ही आवडीनं खाऊ शकता.

अमौरी गुइचॉन असं या शेफचं नाव आहे. नॉस्टॅल्जिक काळात जाऊन या शेफनं पेन्सिल आणि कटरचा केक बनविण्याचा निर्णय घेतला आहे; जे पाहून तुमच्याही तोंडाला पाणी येईल आणि ही पेन्सिल आणि कटर खरं आहे की खोटं हे ओळखण्यात तुमचाही गोंधळ होईल. शेफ सुरुवातीला चॉकलेटपासून पेन्सिलचा षटकोनी भाग बनवून घेतो आहे. त्यानंतर पेन्सिलला फूड कलरनं चमकदार पिवळा रंग दिला जातो. तसेच शेफनं खऱ्या पेन्सिलवर जसं कंपनीचं नाव लिहिलेलं असतं त्याचप्रमाणे पेन्सिलवर नाव रंगविण्यासाठी स्टेन्सिलचा वापर केला आहे. एकदा पाहाच हा आकर्षक केक.

हेही वाचा…पान-तंबाखू खाऊन सार्वजनिक ठिकाणे रंगवणाऱ्यांनो ‘हा’ VIDEO पाहाच; सफाई कर्मचाऱ्यांचे ‘असे’ होतात हाल

व्हिडीओ नक्की बघा…

तुम्ही व्हिडीओत पाहिलं असेल की, नंतर शेफनं पेन्सिलचं टोक बनविण्यासाठी काळ्या खाद्य द्रवाचा उपयोग केला. पेन्सिलच्या मागे असणाऱ्या खोडरबरसाठी रास्पबेरी जेलीचं मिश्रण तयार केलं आणि गुलाबी रंगाचा खोडरबर तयार केला. शेवटी त्यानंतर त्यानं एक अवाढव्य कटर बनवलं. तसेच हा कटर खरा दिसावा म्हणून त्यानं त्यावर चांदीचा लेप दिला. अशा प्रकारे पेन्सिल आणि कटरचा हा आकर्षक केक तयार झाला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @amauryguichon या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओला “चॉकलेट पेन्सिल आणि शार्पनर! लहानपणी पेन्सिल चावणाऱ्या त्या प्रत्येकासाठी हा केक आहे”,अशी कॅप्शन देण्यात आली आहे. अगदीच बारकाईनं लक्ष देऊन पेन्सिल आणि कटरच्या छोट्या छोट्या गोष्टी या केकमध्ये हुबेहूब बनविण्यात आल्या आहेत. त्यामुळे नेटकरी हा केक खाण्याची इच्छा व्यक्त करताना आणि प्रशंसा करताना कमेंट्समध्ये दिसून आले आहेत.