Man lying on railway track to make reel: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावरून रिल्ससाठी लोक काय काय करतील हे सांगता येत नाही असंच वाटेल. काही व्ह्यूज आणि लाइक्ससाठी जीव धोक्यात घालणं यात कुठलं शहाणपण आहे… असाच संताप हा व्हिडीओ पाहून होईल. या व्हिडीओमध्ये एक तरूण रेल्वे रूळावर सुरूवातीला उभा दिसतो. त्यानंतर काही सेकंदातच ट्रेन येताना दिसताच हा तरूण चक्क त्याच ट्रॅकवर आडवा होतो.
ट्रेन वेगाने येत असल्याचं पाहून तो ट्रॅकवर झोपला आणि पूर्णपणे स्थिर झाला. तो अशा अवस्थेत आणि त्याच्या अंगावरून ट्रेन गेली. ट्रेन गेल्यानंतर तो उठतो आणि त्याच्या मित्रांसह आनंद साजरा करताना दिसतो.
प्रकाश नावाच्या एका एक्स युजरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत.
सोशल मिडिया युजर्सनी या व्हिडीओवर तीव्र संताप व्यक्त करत कमेंट्स केल्या आहेत. एकाने कमेंट केली की, अशी रील बनवणाऱ्या या तरूणाला तुरूंगात टाकलं पाहिजे. दुसऱ्या एका युजरने म्हटले की, हे अशाप्रकारचे विनोद करणारे स्वत:चा जीव तर धोक्यात घालत आहेतच आणि इतरांनाही असे करण्यास भाग पाडत आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी गंभीर टीका केली आहे. तसंच अशा बेजबाबदार वर्तनामुळे जीव धोक्यात येऊ शकतात याचं भान आहे की नाही असा प्रश्नही काही युजर्स विचारत आहेत.
बरं, ही घटना काही पहिलीच नाही. तीन महिन्यांपूर्वी राजस्थानच्या बालोत्रा जिल्ह्यातील तिलवारा गावातील २१ वर्षीय कमलेश नावाच्या तरूणाने रेल्वे रूळावर तोंड करून फोन हातात घेत व्हिडीओ शूट केला होता आणि ट्रेन वरून जात होती. त्याचा हा १८ सेकंदाचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते.
अशा व्यक्ती केवळ स्वत:चा जीव धोक्यात घालत नाहीत तर रेल्वेच्या ऑपरेशन्समध्येही गंभीर सुरक्षेसंबंधित धोका निर्माण करतात असे काहींचे म्हणणे आहे. सोशल मीडियावरील प्रसिद्धी लोकांना जीवघेणी कृत्ये करण्यास प्रवृत्त करतात आणि त्यामुळेच असे विचित्र ट्रेंड निर्माण होतात असे काही युजर्सनी म्हटले आहे.
दरम्यान, अशाप्रकारचे व्हिडीओ सातत्याने येत असताना याला आळा घालण्यासाठी कठोर अंमलबजावणी, कडक दंड आणि जागरूकता मोहीम राबवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.