Viral Video: दो हंसो का जोडा बिछड गया रे.. हे हिंदी गाणं प्रसिद्ध आहे. एखाद्या आपल्या व्यक्तीची ताटातूट जशी माणसाला जाणवते तशी ती प्राणी आणि पक्ष्यांनाही जाणवतेच. एका राजहंसाने प्राण सोडले.. पण दुसऱ्याला वाटलं त्याला काय झालंय? त्यामुळे त्याने त्याला उठवण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरु केले. डोळ्यांच्या कडा ओलावणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

निवृत्त वन अधिकारी सुसंत नंदा यांनी पोस्ट केला व्हिडीओ

निवृत्त वन अधिकारी सुसंत नंदा यांनी हा व्हिडीओ त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केला आहे. प्रेम ही भावना आहे जिला मृत्यूही तोडू शकत नाही. हा हंस बघा त्याच्या मृत पार्टनरला, त्याच्या आयुष्यभराच्या जोडीदाराला मृतावस्थेतून उठवू पाहतो आहे. राजहंसांनी जोडीदार निवडला की ते आयुष्यभर एकमेकांना साथ देतात. जेव्हा एक साथ सोडून जातो तेव्हा दुसऱ्याला त्याचं दुःख अनावर होतं. काही नाती ही कायमस्वरुपी असतात. या आशयाची पोस्ट करत सुसंत नंदा यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

काय दिसतं आहे व्हिडीओत?

सुसंत नंदा यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये दिसतं आहे की एक राजहंस तळ्यात गतप्राण झाला आहे आणि तो उलट बाजूने तरंगतोय. मात्र दुसऱ्या राजहंसाने आशा सोडलेली नाही. दुसरा राजहंस आपला साथीदार असलेल्या मृत हंसाला उठवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतो आहे. जीव तोडून एक हंस आपल्या साथीदार मृत राजहंसाला जागं करण्याचा प्रयत्न करतो आहे. आपल्या साथीदार राजहंसाने मृत्यूची चिरनिद्रा घेतली आहे आणि तो त्यातून कधीच जागा होणार नाही याची जाणीव या जागं करणाऱ्या राजहंसाला नाही. त्याने त्या राजहंसाला उठवण्यासाठी जे करता येईल ते करणं सुरु ठेवलं आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू उभे राहिले आहेत. त्याबाबत नेटकरी व्यक्तही होत आहेत.

नेटकरी हा व्हिडीओ पाहून काय म्हणत आहेत?

कदाचित पुढच्या जन्मी या दोघांची पुन्हा भेट होईल असं एका युजरने म्हटलं आहे. अनेक युजर हा व्हिडीओ पाहून आम्ही रडलो खूप हृदयद्रावक व्हिडीओ आहे असंही म्हणत आहेत. आणखी एक युजर म्हणतो याला म्हणतात खरं प्रेम. राजहंसाचा व्हिडीओ २१ हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर या व्हिडीओवर अनेक कमेंटही येत आहेत. जन्म आणि मृत्यू ही दोन सत्य प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असतात. प्राणी आणि पक्षीही त्याला अपवाद नाहीत याची जाणीव पुन्हा एकदा या व्हिडीओने करुन दिली आहे.