Harsh Goenka 9 to 5 Jobs Post: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि अब्जाधीश हर्ष गोयंका यांची एक्सवरील पोस्ट अनेकदा चर्चेत येत असते. कधी ते तरूणांना करिअर मार्गदर्शन करतात, तर कधी नवख्या गुंतवणूकदारांना एखादा सल्ला देतात. हर्ष गोयंका यांच्या मार्मिक पोस्ट अनेकदा व्हायरल होत असतात. आता त्यांनी केलेली एक पोस्टही चर्चेत आहे. मात्र त्यावरून अनेकांनी त्यांनाच उलट प्रश्न विचारले आहेत. हर्ष गोयंका यांनी ‘९ ते ५’ नोकरीच्या पद्धतीवर टीका केली होती. कॉर्पोरेटमधील ९ ते ५ नोकऱ्यांमुळे नोकरदारांचे आयुष्य खंगत असून हा एक सापळा आहे, असे हर्ष गोयंका म्हणाले होते.
हर्ष गोयंका यांनी ९ ते ५ नोकऱ्यांच्या सापळ्याबद्दल पोस्ट केल्यानंतर अनेकांनी याचे स्वागत केले आहे. नोकरदार वर्ग आयुष्यभर राब राब राबतो, मात्र त्याला स्वतःचे आयुष्य जगता येत नाही, असा मतितार्थ दाखविणारा एक व्हिडीओही गोयंका यांनी या पोस्टबरोबर शेअर केला आहे. या पोस्टचे जसे स्वागत होत आहे, त्याचप्रकारे अनेकांनी टीका केली. हर्ष गोयका हाच सल्ला त्यांच्या कर्मचाऱ्यांनाही देऊ शकतात का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला आहे.
‘उशीर होण्याआधी जागे व्हा’, असे कॅप्शन लिहून हर्ष गोयंका यांनी सदर व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये एक तरूण मुलगा स्केट बोर्ड खेळताना दिसत आहे. कॉर्पोरेट कंपनीत काम करणारा सुटाबुडातील मॅनेजर त्याला एका जागी ५ वाजेपर्यंत उभे राहण्याचे काही पैसे देतो. पैसे मिळाल्यामुळे तरूणाला काम करण्याची इच्छा निर्माण होते. तो रोज ठरलेल्या ठिकाणी जाऊन उभा राहतो. त्याच्या आजूबाजूला त्याचे मित्र आयुष्याचा आनंद घेत असताना त्याला दिसतात. मात्र तो मात्र रोज विशिष्ट वेळेत आपले काम करतो. हळू हळू त्याची जागा मोठी होते, तो म्हातारा होत जातो. आयुष्याच्या सरतेशेवटी तो निवृत्त होतो. त्यानंतर एक स्केट बोर्ड घेऊन तो चालविण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्याला ते जमत नाही आणि तो खाली पडतो.
हर्ष गोयंका यांच्या पोस्टवर अनेकांनी त्यांनाच उलट प्रश्न विचारले आहेत. हर्ष गोयंका यांच्या कंपनीतील कर्मचारीही ९ ते ५ काम करतात. मात्र तेच उद्योगपती आता ९ ते ५ काम करू नका, असे सांगतात. ही विसंगती आहे, अशी टीका नेटकऱ्यांनी दिली.
एका नेटकऱ्याने उपरोधिक टोला लगावताना म्हटले की, सर, ही पोस्ट तुमच्या कर्मचाऱ्यांना दाखवू नका. जर तुमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी याचा अवलंब केला तर तुमच्या कंपनीची अवस्था काय होईल? तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले की, तुम्ही एक उद्यमी असूनही असे म्हणत असाल तर आम्ही नेमके काय करायला हवे?
तर काहींनी ९ ते ५ नोकरीचे समर्थन केले आहे. एका युजरने म्हटले की, ९ ते ५ नोकरी ही वाईट नाही. पण जेव्हा ५ नंतर तुम्ही काम घरी घेऊन जाता, तेव्हा ते तुमच्या मेंदूचा ताबा घेते. कामाचे तास एवढ्यावरच मर्यादीत राहिले तर काहीच अडचण नाही.
आणखी एका युजरने म्हटले की, जर तुम्ही अशा नोकऱ्या करणे टाळले तर तुमचे घर के चालेल? तुमच्या कुटुंबाचे पोट कसे भरेल, मुलांचे संगोपन कसे होईल? प्रत्येकजण काही व्यवसाय करू शकत नाही. दुसऱ्या एका युजरने म्हटले की, प्रत्येकजण ९ ते ५ नोकरीबद्दल बोलतो. पण जर सोमवारी एखादा कर्मचारी १० मिनिटे जरी उशीरा आला तर हेच उद्योगपती आणि त्यांचे मॅनेजर्स कर्मचाऱ्याची लाज काढतात.