एखादी सवय लागली की ती मोडणे खूपच कठीण असते. प्रत्येकाला वेगवेगळी सवय असते. काहींना चांगल्या तर काहींना वाईट. मात्र मध्य प्रदेशमधील दिंडोरीतील एका व्यक्तीला चक्क काचा खाण्याची सवय लागली आहे. बरं ही सवय या व्यक्तीला लहानपणापासूनच लागली आहे. मागील ४० वर्षांपासून ही व्यक्ती काचेचे ग्लास, बल्ब, दारुच्या बाटल्या आणि काचेच्या इतर वस्तू खात आहे. या व्यक्तीचे नाव आहे दयाराम शाहू.

‘मला काहीतरी वेगळं करुन दाखवायचं होतं म्हणून मी काचेच्या गोष्टी खायला सुरुवात केली’ असं पेशाने वकील असणारे दयाराम आपल्या या विचित्र सवयीबद्दल बोलताना सांगतात. ‘पहिल्यांदा मी काच खाल्ली तेव्हा मला काचेची चव आवडली. जेव्हा मी काच खातो हे लोकांना समजले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले आणि ते मला महत्व देऊ लागले. त्यामुळेच मी लोकांना दाखवण्यासाठी काच खाऊ लागतो आणि त्यानंतर मला त्याची सवयच लागली,’ असं दयाराम सांगतात. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना, ‘हळूहळू या सवयीचे रुपांतर व्यसनामध्ये झाले आहे. लोकांना जसे सिगारेटचे, दारुचे किंवा इतर गोष्टींचे व्यसन असते तसेच मला काचा खाण्याचे व्यसन आहे,’ अशी कबुली दिली.

या व्हिडिओवर लोकांनी मजेदार रिप्लाय दिले आहेत.

एवढी मंदी आलीय की काचा खाऊ लागले लोक

ओके

काय आहे हे

काय बोलणार

बापरे

मात्र या काच खाण्याच्या सवयीचा माझ्या दातांवर परिणाम झाल्याचेही दयाराम यांनी सांगितले आहे. ‘मला कधीच काचा खाल्ल्यामुळे दुखापत झाली नाही. मात्र डॉक्टरांनी मी काचेचा मोठा तुकडा खालल्यास आतड्याला इजा होऊ शकते असा इशारा मला दिला आहे,’ असंही दयाराम सांगतात. सहापुरा येथील सरकारी रुग्णालयातील डॉक्टर सतेंद्र परास्ते यांनी अशाप्रकारे काच खाण्याचा प्रयत्न कोणीही करु नये असा इशारा दिला आहे. ‘काच ही पचणारी गोष्ट नाही. त्यामुळे काच खाऊ नये. काच जेव्हा अन्न नलिकेमधून जाते तेव्हा त्यामुळे इजा होण्याची शक्यता असते,’ असं सतेंद्र यांनी सांगितले.