आपला समाज हा पुरुषसत्ताक मानसिकतेचा आहे जिथे पुरुषांच्या अस्तित्वाला आजही जास्त महत्त्व दिले जाते आणि स्त्रियांना कमी लेखले जाते. अजूनही असे लोक आहेत जे स्त्रियांना कमी लेखतात. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा मानतात आणि मुलगी म्हणजे ओझं मानतात. अनेकदा स्त्रीभ्रुण हत्या करून त्यांच्या जन्माआधीच जगण्याचा हक्क हिरावला जातो. मुलीचा जन्म झाल्यास नाराजी व्यक्त केली जाते.आता काळ बदलत आहे. स्त्री आणि पुरुष दोघेही समान आहेत आणि त्यांना समान हक्क आणि अधिकार आहेत ही संकल्पना हळू हळू रुढ होत आहे. आता मुलगी जन्मल्यास लक्ष्मी जन्मली असे मानले जाते. मुलींच्या जन्मानंतर अनेकदा घरातील लोक आनंदोत्सव साजरा करताना दिसतात. अशाच घटनेचा सध्या व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका मुलीचा जन्म झाल्यानंतर आनंद व्यक्त केला जात असल्याचे दिसत आहे. व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. नेटकऱ्यांनी या कुटुंबाचे कौतुक केले आहे.
व्हायरल व्हिडिओ एका रुग्णालयातील आहे जिथे नुकताच एका लहान मुलीचा जन्म झाला आहे. डॉक्टर मुलगी जन्मली आहे हे कुटुंबाला कळवत आहे. मुलगी जन्मल्याचे ऐकता कुटुंबाला खूप आनंद झाला आहे. तिथे उपस्थित असलेली एक वयस्कर महिला तेथील डॉक्टराला सांगते की, आम्हाला मुलगीच पाहिजे होती…”डॉक्टर हे ऐकून खुश होते म्हणते…हो मुलगीच झाली आहे आणि खूप गोड आहे. ” व्हि़डीओ पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत.
व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर ही पोस्ट shivanivarpedhawale_ नावाच्या खात्यावरून पोस्ट केली आहे. पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मुलीचा जन्म झाल्यानंतर कधी विसरू शकणार नाही असे आजेसासूंचे शब्द.”
व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी खूप आनंदी झाले आहे. अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले की, “खरंच खूप गोड आहे.”
दुसऱ्याने या व्हिडिओबाबत वेगळे मत व्यक्त केले, “मुलींच्या जन्माचे गौरव पाहणे निराशाजनक आहे, तर मुलांबद्दल तोच उत्साह क्वचितच दिसून येतो. लिंगभेद, मग तो मुलींबद्दल असो वा मुलांबद्दल, मूलभूतपणे चुकीचा आहे. बाळंतपण हा एक आशीर्वाद आहे जो साजरा करण्यास पात्र आहे, मग तो मुलाचे लिंग काहीही असो.”