मुलं मोठी होऊन जेव्हा स्वप्न पूर्ण करतात, तो पालक आणि आजी-आजोबांसाठी अत्यानंदाचा क्षण असतो. आपल्या लेकरांना आयुष्यात मोठे यश मिळवताना त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याची क्षणभराची संधी अनेकांसाठी आयुष्यभराची आठवण बनते. असाच एक भावनिक आणि मनाला स्पर्शून जाणारा क्षण समोर आला आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या एका तरुण पायलट मुलीने आपल्या पालक आणि आजी-आजोबांचे विमानात स्वागत केले आणि तो क्षण पाहून सर्वांच्याच डोळ्यांत अभिमान आणि आनंदाचे अश्रू दाटले.

इंडिगोची पायलट तनिष्का मुदगल हिने आई-वडील आणि आजी-आजोबांचे विमानात प्रवेश करताना हसत हसत स्वागत केले. तिचे गणवेशातला ते देखणे रूप पाहून कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर दिसणारा अभिमान विलक्षण होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओने लाखो लोक भावूक झाले. आतापर्यंत ८.८ दशलक्षापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिृीओ पाहिला असून, तनिष्काचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तनिष्काने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले – जणू आयुष्य पूर्ण झाल्यासारख वाटलं. माझ्यासाठी आई-वडिलांनी केलेला त्याग, आजी-आजोबांनी केलेल्या प्रार्थना आणि सतत दिलेला आधार या सगळ्याचं फळ आजच्या या क्षणाला मला मिळाले आहे. त्यांच्या डोळ्यांत अभिमान होता आणि माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू. मी फार कृतज्ञ आहे. त्यानंतर तिने कुटुंबीयांसोबतचे काही फोटोसुद्धा शेअर केले. विमानासमोर आणि विमानतळाच्या आवारात आई-वडील आणि आजी-आजोबांसोबत उभे राहून घेतलेले फोटो पाहून सर्वांच्याच मनात आनंद उसळला.

तिने लिहिले की, आजचा दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. माझ्या विमानात आई-वडील आणि आजी-आजोबा बसले – आणि माझं मन भरून आलं. लहानपणीच्या त्या आठवणी लगेच डोळ्यांसमोर आल्या… उन्हाळ्याच्या सुटीत नानू-नानीकडे जाण्याचा आनंद, बाजारातून आणलेले माझे आवडते काजू-कतली आणि गोलगप्पे, माझं हसू टिकविण्यासाठी त्यांनी घेतलेली प्रत्येक छोट्या छोट्या बाबतीतली काळजी या आठवणी आजही माझ्या मनात आहेत.

येथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ पाहून अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या. एक सहकारी पायलट म्हणाला, तुझ्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघ… मला आठवतं, मी माझ्या आई-वडिलांना पहिल्यांदा विमानात बसवलं होतं तेव्हाही असाच क्षण होता. कायम जमिनीवर राहा. यशस्वी प्रवासासाठी हेच महत्त्वाचं आहे.

टीव्ही निर्माती गुल खान यांनी या पोस्टवर कमेंट करीत लिहिलं, पुन्हा पुन्हा पाहिल्याशिवाय राहवत नाही. खूप सुंदर आणि हृदयाला भिडणारं दृश्य! खरंच, पालक आणि आजोबांना आपल्या मुलीला पायलटच्या गणवेशात पाहताना जेव्हा अभिमानाने डोळे भरून आले, तेव्हा तो क्षण फक्त त्यांच्या नव्हे, तर सगळ्यांच्या मनात कायमचा कोरला गेला. मुलगी मोठी होताना तिच्या प्रत्येक पावलावर सोबत उभ्या राहणाऱ्या कुटुंबासाठी हा क्षण आयुष्यभर जपून ठेवण्यासारखा आहे.