Viral Video : एका महिलेने तिला आलेला धक्कादायक अनुभव इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत शेअर केला आहे. या महिलेने व्हिडीओत आरोप केला आहे की सात वर्षांच्या एका मुलाने तिची छेड काढली. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत या महिलेने हा धक्कादायक अनुभव सांगितला. सुरुवातीला तिला वाटलं की कदाचित ही मस्करी असावी. पण त्या मुलाने तिची छेड काढण्याच्या उद्देशानेच एक वाक्य उच्चारलं असं या महिलेने व्हिडीओत सांगितलं.
काय म्हटलं आहे महिलेने व्हिडीओत?
“माझ्याबद्दल काहीही अभद्र टिपण्णी करण्याआधी जरा मी काय सांगते आहे नीट ऐका आणि पाहा. मी पायापर्यंत स्कर्ट परिधान केला आहे आणि लाल रंगाचा टॉप घातला आहे. हा ड्रेस परिधान करुन मी मंदिरात गेले होते. त्यानंतर मी माझ्या इमारतीच्या परिसरात वॉकसाठी गेले. जे मी रोज न चुकता करते. माझ्या इमारतीच्या आतमध्ये जो वरांडा आहे त्या भागात मी रोज न चुकता चालायला जाते. या ठिकाणी भाडे तत्त्वावर जर फ्लॅट घेतला तर ५० हजार ते ७० हजारांच्या घरात ते आहे. त्यामुळे मी एका उच्चभ्रू सोसायटीत राहते आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आज मला आलेला अनुभव धक्कादायक होता. मी वॉक ला गेले तेव्हा लहान मुलं तिथे होती. त्यापैकी एक लहानसा मुलगा मला बघू म्हणाला ओ लाल परी, किथ्थे चली? त्यानंतर ते सगळे हसायला लागले. आधी तर काय झालं ते मलाही नीटसं कळलं नाही. कारण तो लाल परी म्हणाला, मला वाटलं की मी अतिविचार करते आहे. त्यानंतर सुरक्षा रक्षकाला मी विचारलं की हे ती मुलं मला चिडवत आहेत ना? तर तो हो म्हणाला. तो ही म्हणाला जाऊदेत लहान मुलं आहेत. मी पुन्हा जेव्हा दुसऱ्या राऊंडला तिकडे पोहचले तेव्हा पुन्हा तो मुलगा मला म्हणाला कौन है तू, चलेगी क्या? मला त्याचे शब्द ऐकून धक्का बसला. हा प्रकार माझ्या सोसायटीत घडला. माझा विश्वासच बसत नाहीये की एका चांगल्या घरातला मुलगा मला हे काय विचारतो आहे? मी त्या मुलाला म्हणालेही की तू चांगल्या सोसासयटीत राहतोस, चांगल्या घरातला आहेस, चांगल्या शाळेत जातोस. तुझ्या आई वडिलांनी तुला संस्कार शिकवले नाहीत. त्यानंतर सुरक्षा रक्षक आला त्याने सॉरी म्हणायला सांगितलं तेव्हा तो मुलगा कान पकडून सॉरी म्हणाला आणि पळून गेला. इमारतीचा सुरक्षा रक्षक मला म्हणाला या मुलाचे आई वडील खूप चांगले आहेत. मला आधी वाटलं की गंमत चालली आहे. एक मुलगा जो माझ्यापेक्षा उंचीलाही छोटा आहे. तो मला विचारतो चलती है क्या? मी ओव्हर रिअॅक्ट करत असेन तर सांगा. पण मला आलेला हा धक्कादायक अनुभव होता.” असं या मुलीने म्हटलं आहे.
नेटकरी काय म्हणत आहेत?
या महिलेची पोस्ट व्हायरल झाली आहे आणि नेटकरी त्यावर कमेंट करत आहेत. तू काहीही चुकीचं केलं नाहीस. तू उलट त्या मुलाच्या आई वडिलांना फोन करुन सांगायला हवं होतं की तो मुलगा काय म्हणतो आहे किंवा त्याच्या घरी जाऊन तक्रार करायला हवी होती असं एकाने म्हटलं आहे. तू सुरक्षा रक्षकाला तो मुलगा कुठे राहतो विचार आणि त्याच्या घरी जाऊन त्याच्या आई वडिलांना घडलेला प्रकार सांग असंही काहींनी म्हटलं आहे. एका महिलेने म्हटलं आहे की तिलाही असाच अनुभव आला. ती मेडिकलमध्ये चालली होती तेव्हा कुणीतरी चुकीच्या पद्धतीने तिला पाठीमागून स्पर्श केला. तिने चटकन तो हात पकडला तर तो एका ८ ते ९ वर्षांच्या मुलाचा होता. त्याची आई तिथेच होती. मी लगेच तिला तक्रार केली. तिला सांगितलं की तुमचा मुलगा काय करतोय. मला वाटतं की तू देखील त्या मुलाच्या आई वडिलांना सांगायला हवंस असं एका महिलेने म्हटलं आहे. मला अजिबातच धक्का बसला नाही हे हल्ली घडतं, तू शांत बसू नकोस आवाज उठव असंही या महिलेला काहींनी सांगितलं आहे. तू त्या मुलाला थोबाडीत का ठेवून दिली नाहीस? असाही प्रश्न काही नेटकऱ्यांनी विचारला आहे. लहान मुलं जे सभोवताली पाहतात आणि ऐकतात त्याचंच अनुकरण करतात. या मुलानेही कुणाचं तरी ऐकून तुला असं म्हटलं असणार, तू त्याच्या आई वडिलांशी बोल असंही एका युजरने म्हटलं आहे.