Woman Post : घरकाम करणाऱ्या बायका हा विषय सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. घरकाम करणाऱ्या बायका म्हणजेच ज्यांना गृहसेविका असं म्हटलं जातं त्यांच्यावर अनेक नोकरदार महिला अवलंबून असतात. त्यांच्यावर अनेकदा घर आणि घरातल्या जबाबदाऱ्या टाकून या महिला नोकरीसाठी जातात. ‘नाच गं घुमा’ हा मराठी चित्रपटही याच विषयावर होता. दरम्यान सध्या सोशल मीडियावर एका महिलेने लिहिलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. ही महिला चेन्नईहून दिल्लीला शिफ्ट झाल्यानंतर गृहसेविका कशा वेगळ्या असतात याबाबत तिने लिहिलं आहे. या महिलेची ही पोस्ट व्हायरलल झाली आहे.

काय आहे महिलेची पोस्ट?

चेन्नईत चार वर्षे राहिलेल्या नैना पाठक यांनी दिल्लीत शिफ्ट झाल्यानंतर LinkedIn वर एक पोस्ट लिहिली आहे. त्या म्हणतात, “घरकाम करणाऱ्या महिला या चेन्नईत जास्त शिस्तप्रिय आहेत. मात्र दिल्लीत तसं नाही. सुट्टी घेणं, बेशीस्त वर्तन, वेगवेगळी कारणं सांगून कामावर येणं टाळणं, पगार कापण्याच्या विरोधात असणं असल्या सवयी दिल्लीतल्या गृहसेविकांना आहेत. त्या आपल्या घाईच्या दिवशी आल्या नाहीत आणि त्यांचा पगार कापला तर आपल्यावरच ओरडतात. दिल्लीत ही वाईट परिस्थिती आहे. चेन्नईत मात्र तसं नाही.”

चेन्नईतल्या गृहसेविका प्रामाणिक आहेत

नैना पाठक पुढे म्हणतात, “मी चेन्नईत चार वर्षे होते. तेव्हा मी पाहिलं आहे आमच्याकडे किंवा इतर कुणाकडेही येणाऱ्या गृहसेविकांचा दिवस सकाळी ६.३० ला सुरु होतो. त्या दुपारी एक पर्यंत पाच ते सहा घरांमध्ये सगळं घरकाम करतात. त्यानंतर महापालिकेचं स्वच्छतेचं काम दुपारी २ ते रात्री ९ पर्यंत करतात. शनिवार आणि रविवार जेव्हा असतो तेव्हा शिवणकाम करणं, हार तयार करणं अशी जास्तीची कामंही त्या घरकामाशिवाय करतात. त्यांना त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे. आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडायचं आहे त्यासाठी त्या कष्ट घेतात आणि वेळेवर जाण्याची शिस्त पाळतात. तसंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या वागणुकीतही प्रामाणिक असतात आणि कामात तर प्रामाणिक असतातच. चेन्नईत माझ्याकडे घरकाम करणाऱ्या महिलेने मला स्पष्टच सांगितलं होतं की मी महिन्यातून दोन सुट्ट्या घेईन जर त्यापेक्षा जास्त सुट्ट्या घेतल्या तर माझा पगार कापा. असं त्या स्वतःहून सांगतात. दिल्लीत मात्र असं नाही.”

दिल्लीतल्या घरकाम करणाऱ्या बायका बेशीस्त

“मी जेव्हा दिल्लीला शिफ्ट झाले तेव्हापासून आत्तापर्यंत मी सहा घरकाम करणाऱ्या बायका बदलल्या आहेत. इथल्या बायका काहीही कल्पना न देता रजा घेतात. आज काय कुणी वारलंच आहे, कुणाला चक्करच आली, आज बरंच नाही, आज माझ्या नात्यातलं कुणीतरी हॉस्पिटलमध्येच आहे एक ना हजार कारणं देतात. शिस्तप्रिय नाहीत, वेळ पाळत नाहीत. तुम्ही त्यांच्याशी वाद घातला की तुम्ही व्हिलन. मग त्या घरकाम करणाऱ्या बायका तुम्हाला ऐकवतात. पगार कापला तर आपल्याला दुषणं देऊन मोकळ्या होतात. उरलेलं जेवण वाया जाऊ नये म्हणून त्यांना दिलं तर ते पण नाकारतात. त्यांना जेवण न्याल का असं विचारलं तरी फणकारा येतो. अहंकार दाखवत नेणार नाही असं सांगतात. दिल्लीत घरकाम करणाऱ्या बायकांची स्थिती चेन्नईच्या अगदी विरुद्ध आहे. मी काय उत्तर आणि दक्षिण असा वाद घालत नाही. पण जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणते. चेन्नईत शिकलेल्या घरकाम करणाऱ्या बायका आहेत. दिल्लीत त्याबाबतीतही दिव्याखाली अंधारच आहे.” असं पाठक यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय. यानंतर त्यांच्या पोस्टवरुन सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

सोशल मीडियावर येणाऱ्या प्रतिक्रिया काय?

काही युजर्सनी नैना पाठक यांची दिल्ली आणि चेन्नईतली निरीक्षणं योग्य असल्याचं म्हटलं आहे. तर काही युजर्स म्हणतात तुम्ही ही पोस्ट करण्याचा उद्देश आहे तरी काय? तुम्ही तुमच्या घरी काम करणारी बाई उरलेलं अन्न नेईल ही अपेक्षाच कशी ठेवता? शिवाय तुम्ही त्यांच्याबद्दल इथे लिहिलं आहे त्यांची बाजू कोण मांडणार? त्यांचीही बाजू कळली पाहिजे. अनेकदा काम करणाऱ्या महिलांना गृहीत धरुन त्यांच्यावर अन्यायच केला जातो. कमी पगार, उरलेलं अन्न देणं, शिळं अन्न खायला देणं, जुने कपडे घेऊन जायला सांगणं हा तुमच्याकडून त्यांच्यावर केलेला अन्यायच नाही का? असे प्रश्न एका युजरने विचारले आहेत. एका युजरने म्हटलं आहे मी बंगळुरुत राहायचो तेव्हा माझ्या घरी एक घरकाम करणारी बाई यायची. अनेकदा ती माझ्या पाकिटातले पैसे चोरुन न्यायची. मला ते सुरुवातीला कळलंच नाही. दिल्लीत माझा अनुभव अगदी वेगळा होता. दिल्लीत माझ्या घराच्या सोफ्याखाली ५०० ची नोट घरकाम करताना सापडली तिने ती मला परत केली. ती तिने नेली असती तरी मला कळलं नसतं. LinkedIn वर ही एकतर्फी पोस्ट आहे असं मला वाटतं असं आणखी एका युजरने म्हटलं आहे.