पावसाळ्यात वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी पर्यटक डोंगर-दऱ्या, गड-किल्ले, धबधबे- धरण, नदी-समुद्र किनारी भेट देतात. पण उत्साहाच्या नादात अनेकदा लोक स्वत:चा जीव धोक्यात घालतात. डोंगर-दऱ्या, गड-किल्ले, धबधबे- धरण, नदी-समुद्र किनारी अशा ठिकाणी निसर्ग सौंदर्याचा आनंद घेताना सावधगिरी बाळगावी लागते अन्यथा आपली एक चूक आपल्या जीवावर बेतू शकते. पावसाळ्यात धबधब्यावर होणार्या अपघातांचे कित्येक व्हिडिओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात जे पाहून काळजाचा थरकाप उडतो. असे असूनही लोक सावधगिरी बाळगत नाही. सध्या अशाच एका व्हिडिओची जोरदार चर्चा होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला धबधब्याजवळ फोटो काढण्यासाठी जाताना दिसत आहे पण तेवढ्यात तिचा पाय घसरतो. हा अपघात व्हिडीओमध्ये कैद झाला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पावसाळ्यात धबधबा, नदी, समुद्र किनारी असलेले खडकांवर शेवाळ तयार होते ज्यामुळे ते गुळगुळीत होतात. त्यामुळे त्यावर चालताना अत्यंत सर्तक राहावे लागते अन्यथा पाय घसरून मोठा अपघात होऊ शकतो. असेच काहीसे या महिलेबरोबरही झाले. शुभ्र, फेसळता धबधबा पाहून महिलेला फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. फोटो काढण्यासाठी महिला धबधब्याच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न करते पण त्याचवेळी ओल्या खडकांवरून तिचा पाय घसरतो आणि धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर खडकांवरून खाली वाहून जाते. महिलेचा जीव वाचला की याबाबत माहिती मिळालेली नाही पण व्हिडिओ पाहून क्षणभर काळजाचा ठोका चुकतो.
पावसाळ्यात पर्यटन करताना सावधगिरी बाळगा नाहीतर आपली एक चूक आपल्याच जीवावर बेतू शकते हे सांगणारा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. rathodanita234 नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
probreakingnews नावाच्या इंस्टा खात्यावरही हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले क आहे की,”एक महिला धबधब्याच्या जवळ उभी होती, कदाचित पर्यटक म्हणून दृश्याचा आनंद घेत होती. अचानक, तिचा तोल गेला आणि ती अनपेक्षितपणे धबधब्याच्या पाण्यासह खाली वाहत गेली. सुदैवाने, तिचे पडणे धोकादायक नव्हते आणि ती पूर्णपणे सुरक्षित होती.”
व्हिडीओवर कमेंट अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
एकाने लिहिले,” देवाचे आभार मानले पाहिजे. तिचा जीव वाचला.”
काहींनी महिलेच्या कृतीवर टिका करत म्हटले की, “तिच्याकडे कॉमन सेन्स देखील नाहीये.”