जगभरामध्ये करोनाने थैमान घातलं आहे. १८० हून अधिक देशामध्ये करोनाचा संसर्ग झाला आहे. मागील अनेक आठवड्यांपासून करोनासंदर्भातील बातम्यांनी भीतीचे वातारण निर्माण झाले असे. अस असतानाच ऑस्ट्रेलियामधून मात्र एक आनंदाची बातमी समोर आली. ही बातमी आहे लॉकडाउनच्या काळात घरात अडकलेल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषयासंदर्भात म्हणजेच इंटरनेटसंदर्भात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी इंटरनेटचा विश्वविक्रमी वेग साध्य करण्यात यश मिळवलं आहे. येथील संशोधकांनी ४४.२ टेराबाइट्स पर सेकंदापर्यंत इंटरनेटचा वेग वाढवण्यात यश मिळवलं. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर या वेगाने डाऊनलोड केल्यास एका सेकंदात एक हजार हायडेफिनेशन चित्रपट डाऊनलोड करता येतील. मोनॅश, स्वीनबर्ने आणि आरएमआयटी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी ‘मायक्रो कोम्ब’ ऑप्टीकल चीपच्या मदतीने हे साध्य केलं आहे. या चीपच्या माध्यमातून इन्फ्रारेड लेझर किरणांच्या मदतीने सध्या मेलबर्नमध्ये अस्तित्वात असणाऱ्या इंटरनेटच्या नेटवर्कमधून त्यांनी ४४.२ टेराबाईट वेगाने डेटा ट्रान्सफर केला. यासंदर्भातील वृत्त युनायटेड किंगड्ममधील ‘इंडिपेंडंट’ने दिलं आहे. सध्या जगभरामध्ये व्यवसायिक स्तरावरील सर्वाधिक इंटरनेट स्पीड हा सिंगापूरमध्ये आहे. सिंगापूरमधील सरासरी डाऊनलोड स्पीड १९७.३ मेगाबाईट्स पर सेकंद (एमबीपीएस) इतका आहे. यासंदर्भातील संशोधनाचा अहवाल ‘नेचर्स कम्युनिकेशन’ या मासिकामध्ये छापून आला आहे.

ज्या ऑस्ट्रेलियामध्ये हा विक्रमी वेग नोंदवण्यात आला त्या देशामध्ये सध्या इंटरनेटचा सरासरी वेग हा ४३.४ एमबीपीएस इतका आहे. हा वेग वैज्ञानिकांनी सध्या गाठलेल्या वेगापेक्षा १० लाख पटीने कमी आहे. भारतामधील इंटरनेटचा सरासरी वेग हा ३९.६९ एमबीपीएस इतका आहे. “व्यवसायिक स्तरावर हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी सध्या जागतिक पतळीवर स्पर्धा सुरु आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मायक्रो कोम्ब तंत्रज्ञानाच्या मदतीने सध्या अस्तित्वात असणाऱ्या गोष्टींच्या वापराने इंटरनेटचा वेग वाढवता येणार आहे,” असं विश्वास मोनॅश विद्यापिठाचे डॉ. बील कॉर्कोरॅन यांनी व्यक्त केला आहे. “या तंत्रज्ञानाचा वापर करणारी यंत्रे आमच्या संशोधनासंदर्भातील प्रयोगशाळेत पुढील दोन तीन वर्षात दिसतील. तर व्यवसायिक स्तरावर हे तंत्रज्ञान पुढील पाच वर्षांमध्ये उपलब्ध होईल,” अशी आशा बील यांनी, ‘इंडिपेंडंट’शी बोलताना दिली आहे.

करोनामुळे लॉकडाउन जारी करण्यात आल्याने जगभरामध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने इंटरनेट यंत्रणेवर ताण आला आहे. युरोपमध्ये तर ऑनलाइन व्हिडिओ सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील व्हिडिओ स्ट्रीमींगचा दर्जा (एचडी, अल्ट्रा एचडी) कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इंटरनेट सेवांवरील ताण कमी व्हावा आणि अधिक युझर्सपर्यंत पोहचता यावे म्हणून नेटफ्लिक्स आणि युट्यूबने आपल्या सेवांमधील व्हिडिओच्या दर्जावर बंधने घातली होती. मात्र ‘मायक्रो कोम्ब’ तंत्रज्ञानामुळे या अशा अडचणी भविष्यात येणार नाही असा विश्वास शास्त्रज्ञांना आहे. “युकेमध्ये दिवसाच्या वेळी इंटरनेटची मागणी दुप्पटीने वाढली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी विशेष उपाययोजना आणि तडजोड करावी लागत आहे. यामुळे उद्भवलेल्या अडचणींमधून भविष्यामध्ये इंटरनेटचा वापर वाढल्यानंतर सध्याच्या नेटवर्कच्या क्षमतेवर किती परिणाम होणार आहे याचा अंदाज बांधता येतो. भविष्यात फाइव्ह जी तंत्रज्ञान, स्वयंचलित वाहने, इंटरनेट ऑफ थिंग्ससारख्या गोष्टी दैनंदिन जिवनाचा भाग होणार असल्याने नेटवर्कवरील ताण अजून वाढणार,” असं डॉ. बील यांनी सांगितलं.

“या क्षमतेसंदर्भातील अडचणीवर मात करण्यासाठी आपल्याला अगदी छोट्या आकाराच्या म्हणजे अगदी आपल्या नखाच्या आकाराच्या यंत्रणांची गरज लागणार. ज्यांच्या माध्यमातून आपण अस्तित्वात असणाऱ्या नेटवर्कच्या माध्यमातून वेगाने डेटा पाठवू शकू. डेटा पाठवण्याबरोबर कमी ऊर्जा, कमी जागा आणि कमी पैशामध्ये हे साध्य करणं आवश्यक आहे. आमच्या संशोधनामध्ये सध्याच्या उपलब्ध सेवांचा वापर करुन इंटरनेटच्या डेटा ट्रान्सफरचा वेग वाढवता येईल असं दिसून आलं आहे. हे खूपच सकारात्मक आहे,” असं डॉ. बील यांनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worlds fastest internet speed download speed 1 million times faster than current speed can download 1000 hd movies in a 1 second scsg
First published on: 28-05-2020 at 15:44 IST