करोना महामारीमुळे लष्करात गेल्या दोन वर्षांत भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे तरुणांमध्ये प्रचंड नाराजी आहे. भरती प्रक्रिया थांबल्यामुळे राजस्थानच्या चुरू, झुंझुनू, सीकर आणि नागौर जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. या जिल्ह्यांमध्ये नोकरभरती सुरू करण्यासाठी सोशल मीडियावर प्रचारापासून ते धरणे निदर्शनं केली जात आहेत. या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नागौर येथील सुरेश भिचर याने सीकर ते दिल्ली हा प्रवास धावत पूर्ण केला. २९ मार्च रोजी रात्री ९ वाजता सीकरच्या जिल्हा स्टेडियममधून निघालेला सुरेश २ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजता दिल्लीला पोहोचला. जिथे त्यांनी खासदार हनुमान बेनिवाल यांना निवेदन दिले. सुरेशने ३५० किमीचा प्रवास एकूण ५० तासांत पूर्ण केला.

सुरेश भिचर हा सीकर येथील संरक्षण अकादमीतून प्रशिक्षण घेत आहे. त्याला २०१५ पासून सैन्यात भरतीसाठी प्रयत्न करत आहे. पण कोणत्या ना कोणत्या कारणाने त्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. सुरेशच्या स्प्रिंट शर्यतीच्या चर्चा आजूबाजूच्या जिल्ह्यांतही रंगतात. नागौर येथे २०१८ मध्ये झालेल्या सैन्य भरतीमध्ये त्याने १६०० मीटरची शर्यत ४ मिनिटे ४ सेकंदात पूर्ण करून विक्रम केला होता. पण तळहाताला जास्त घाम आल्याने सैन्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या अनफिट असल्याचं सांगण्यात आलं होतं. सुरेशने दिल्लीत आल्यानंतर सांगितलं की, “मला भारतीय सैन्यात भरती व्हायचं आहे. दोन वर्षांपासून भरती झाली नाही. नागौर, सीकर, झुनझुन येथील तरुणांचं वय हातून निघत आहे. तरुणांचा उत्साह वाढवण्यासाठी मी धावून दिल्लीत आलो आहे. सैन्य भरतीसाठी २३ ही वयोमर्यादा आहे. सरकारने वयात सवलत द्यावी”

विशेष म्हणजे राजस्थानमधील नागौर, सीकर, झुनझुन येथील तरुण सैन्य भरतीत उत्साहाने भाग घेतात. मागच्या दोन वर्षात भरती न झाल्याने सिनकर-झुंझुनू जिल्ह्यांतील १.१० लाख तरुणांचे वय निघून गेलं आहे, त्यामुळे सैन्यात भरतीच्या मागणीबाबत तरुणांमध्ये नाराजी आहे.