भारतचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग हा गेले दोन-चार दिवस एका वाईट गोष्टीमुळे चर्चेत आहे. करोनाच्या लॉकडाउनमध्ये युवराज सोशल मीडियावर अनेकदा लाइव्ह आला. पण सोमवारी रोहित शर्मासोबत लाइव्ह असताना त्याने फिरकीपटू युझवेंद्र चहलची खिल्ली उडवताना एक जातीवाचक उल्लेख केला. अतिशय सहज त्याच्या तोंडून तो शब्द निघाला आणि त्यावर रोहित शर्माही फारसा व्यक्त झाला नाही. पण त्या शब्दामुळे एका ठराविक समाजाचा अपमान झाल्याचे मत काही नेटकऱ्यांनी व्यक्त केले आणि ट्विटरवर #युवराज_सिंह_माफी_मांगो हा हॅशटॅग ट्रेंड झाला. तसेच, हरयाणामध्ये युवराजवर पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली. या साऱ्या प्रकारानंतर युवराज घडलेल्या प्रकाराबद्दल माफीनामा प्रसिद्ध केला.

युवराजने आपल्याकडून अनावधनाने घडलेल्या चुकीसाठी साऱ्यांची ट्विटरच्या माध्यमातून माफी मागितली. “मी कधीही जात, वंश, वर्ण असा कोणताही भेद मानलेला नाही. मी सदैव मनुष्यकल्याणाच्या दृष्टीनेच विचार केला आहे. मी मित्राशी (रोहितशी) बोलताना माझ्या तोंडून निघालेल्या शब्दांमुळे काही जण दुखावले गेले असतील, तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सर्व भारतीय माझ्यासाठी सारखेच आहेत आणि माझं सर्व भारतीयांवर मनापासून प्रेम आहे”, अशा आशयाचा माफीनामा त्याने ट्विट केला आहे.

युवराज सिंगने माफी मागावी अशी मागणी नेटकऱ्यांनी केल्यानंतर युवराज विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. झी न्यूजच्या वृत्तानुसार, दलित समाजातील मानवाधिकार कार्यकर्ते अॅडव्होकेट रजत कळसन यांनी युवराज विरोधात हरयाणाच्या हिसार जिल्ह्यातील हंसी गावात तक्रार दाखल केली. कळसन यांनी तक्रार दाखल केल्यावर रोहितवरही निशाणा साधला. युवराजने केलेल्या बेजबाबदार वक्तव्यावर रोहितने विरोध दर्शवायला हवा होता, परंतु तो हसला आणि त्यावर सहमत असल्याचे दर्शवले. अशा शब्दात कळसन यांनी रोहितवरही निशाणा साधला. याशिवाय, पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर युवराजच्या अटकेचीही त्यांनी मागणी केली.

नक्की काय आहे प्रकरण

लाइव्ह सत्रादरम्यान युवीने युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांना ‘भंगी’ असं संबोधलं. युवराजच्या या शब्दाचा अयोग्य वापर झाल्यावर अनेक यूजर्सनी युवीवर टीका केली. युवराज सिंग याने लॉकडाउनदरम्यान अनेकदा लाइव्ह चॅटच्या माध्यमातून खेळाडू आणि चाहत्यांशी संवाद साधला. विविध खेळाडूंशी संवाद साधताना त्याने काही प्रश्नांची उत्तरंदेखील दिली. रोहित शर्मा आणि युवराज सिंग यांच्यामध्ये लाइव्ह चॅट सुरू होता. त्यावेळी रोहित शर्मा म्हणला की, सर्वजण निवांत आहे. चहल, कुलदीपही ऑनलाइन आले आहेत. त्यावर बोलताना युवराजने मस्करीत चहलबद्दल आक्षेपार्ह शब्द उच्चारला. त्यावर रोहितनेही हसत हसत तो विषय सोडून दिला. त्यानंतरच नेटकऱ्यांनी युवराजला धारेवर धरत #युवराज_सिंह_माफी_मांगो अशी मागणी ट्विटरवरून केली होती.