भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग येत्या ३० नोव्हेंबरला अभिनेत्री हेजल कीच हिच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे. या लग्नसोहळ्याला सर्व क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अशातच युवराज सिंग यांने पंतप्रधान नरेंद्र मोदींनादेखील लग्नची पत्रिका दिली. मात्र या लग्न पत्रिकेत युवराजने फारच मोठा घोळ घातला, त्यामुळे ही लग्न पत्रिका मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वाचा : युवराज सिंगच्या लग्नात वडील राहणार गैरहजर
नोटाबंदीच्या निर्णयामुळे संसदेत गोंधळाचे वातावरण गेल्या आठवड्यात पाहायला मिळाले. अशातच गुरूवारी युवराज सिंग यांनी मोदींना भेटण्यासाठी संसद परिसरात उपस्थिती लावली. आपल्या लग्नाचे निमंत्रण मोदींना देण्यासाठी तो संसद परिसरात आला होता. त्यामुळे, लग्न पत्रिका घेऊन आलेल्या युवराजचे फोटो व्हायरल झाले होते. पण, उत्साहाच्या भरात लग्न पत्रिकेवरील मोठी चूक मात्र कोणाच्याच लक्षात आला नाही. या लग्न पत्रिकेवर मोदींचे नाव चुकीचे लिहिले होते. ‘नरेंद्र मोदी’ लिहण्याऐवजी पत्रिकेवर ‘नरेंदर मोदी ‘ असे छापले होते. ‘honourable prime minister shri narender modi’ असे त्या पत्रिकेवर छापण्यात आले होते, त्यामुळे सोशल मीडियावर युवराजची ही लग्न पत्रिका मोठ्या प्रमाणत व्हायरल झाली आहे. याआधी युवराजच्या लग्न पत्रिकेचीही खूपच चर्चा झाली. पारंपारिक पत्रिकेपेक्षा या पत्रिकेची डिझाईन्स फार वेगळी होती. अर्थात अष्टपैलू क्रिकेटरचा हा विवाह सोहळा आहे. त्यामुळे, या लग्न पत्रिकेत क्रिकेटची झलक पाहायला मिळाली नाही तर नवलंच. म्हणूनच युवराजची लग्न पत्रिका ही खास क्रिकेट या थीमवर आधारलेली आहे. यात हेजल आणि युवराजचे खास व्यंगचित्र दाखवण्यात आले आहेत.
वाचा : .. अशी आहे युवराज सिंग-हेजलच्या लग्नाची पत्रिका
युवराज आणि हेजल कीच हिचा विवाह सोहळा ३० नोव्हेंबरला चंदीगढ येथील एका गुरूद्वारामध्ये होणार आहे. याशिवाय, २ डिसेंबरला हिंदू प्रथेनुसार गोव्यामध्ये ते पुन्हा विवाहबद्ध होणार आहेत. गोव्यातील हा सोहळा खूप शाही थाटात असणार आहे. २ डिसेंबरला गोव्यात विवाह समारंभ पार पडल्यानंतर ७ डिसेंबरला दिल्लीतील एका सेव्हन स्टार हॉटेलमध्ये शानदार रिसेप्शनही होईल. या सोहळ्याला नेते मंडळी, क्रिकेटर्स, बॉलीवूडचे कलाकार देखील उपस्थित राहणार आहे. नुकेतच ११ नोव्हेंबर रोजी हेजल आणि युवराजचा साखरपुडा झाला.