04 April 2020

News Flash

याचे लागले पीसे..

इतिहास संशोधक वा. सी. बेंद्रे यांच्या मते, ‘मंत्रगीता’ हे तुकोबांचे गीताभाष्य असल्याचा हा मोठा पुरावा आहे.

संत बहिणाबाईंचे हे उपकारच म्हणावयास हवेत की त्यांनी आत्मनिवेदन लिहिले. मराठीतील पहिल्या आत्मचरित्राचा मान रमाबाई रानडे यांच्या ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ला (१९१०) दिला जातो. पण त्याच्या तीन शतके आधी बहिणाबाईंचे आत्मनिवेदन आलेले आहे. त्या तुकोबांच्या समकालीन. तुकोबांचे दर्शन लाभलेल्या. तुकोबांबरोबर वावरलेल्या. त्यांचे अभंग त्यांच्याच तोंडून ऐकण्याचे भाग्य मिळालेल्या. ११६ अभंगांचे ते आत्मचरित्र त्यांनी लिहून ठेवले म्हणून आज आपणास तत्कालीन समाजाचा सनातनी विचारांमुळे विद्रुप झालेला चेहरा दिसू शकला. तुकोबांचे देहू कसे होते ते समजू शकले आणि मंबाजी गोसावी नावाचा खलपुरुष तुकोबांचा कशा प्रकारे छळ करीत होता हे कळू शकले. ते एक बरे झाले. अन्यथा आज आपल्या काही अभ्यासकांनी या मंबाजीलाही शुद्ध चारित्र्याचे प्रमाणपत्र देऊन टाकले असते! या मंबाजीवर तुकारामांनी उपकार केले होते. त्याला कसण्यासाठी विठ्ठलटिके नावाची जिराईत जमीन दिली होती. तरीही तो तुकोबांचा द्वेष करीत होता. त्याचे कारण केवळ व्यावहारिक होते? दोन शेतकऱ्यांनी जमिनीच्या बांधावरून भांडावे तसे ते होते? त्यामागील कारणांचा नीट उलगडा करण्यासाठी आपणास बहिणाबाईंच्या चरित्राकडे जावे लागते. कारण त्या घटनांच्या त्या एकमेव समकालीन साक्षीदार आहेत.
संत बहिणाबाई (जन्म १६२८) या वैजापूर तालुक्यातील देवगावच्या. ब्राह्मण कुटुंबातल्या. त्या तीन वर्षांच्या असताना गंगाधरपंत पाठक या तीस वर्षीय बिजवराशी त्यांचा विवाह लावून देण्यात आला. गृहस्थ हुशार. व्यवसाय भिक्षुकीचा. वैद्यकीही करीत. स्वभावाने मात्र भलतेच तापट आणि वेदांचे अभिमानी. बहिणाबाई सांगतात-
‘नामाचा विटाळ आमुचीये घरीं।
गीताशास्त्र वैरी कुळीं आम्हां।।
देव तीर्थ यात्रा नावडती हरी।
ऐसीयांचे घरीं संग दिला।।’
याचा ताप बाईंना फार झाला. लग्नानंतर काही वर्षांनी भाऊबंदकीमुळे बाईंचे आई-वडील, भाऊ आणि नवरा या सगळ्यांना गाव सोडावे लागले. तेव्हा बाईंचे वय साधारण नऊ वर्षांचे होते. तीर्थे करत करत ते सगळे पंढरपूरला आले. नंतर त्यांच्या भ्रताराच्या मनात आले की ब्राह्मणाचे गाव पाहून तेथे
राहावे. त्यानुसार ते रहिमतपूरला काही काळ राहिले. नंतर कोल्हापूरला आले. बहिणाबाईंना याच काळात हरिकथाश्रवणाची गोडी लागली. तेथे जयरामस्वामी गोसावी या कथाकारांनी तिच्यातील संतत्व ओळखले. बहुधा त्यांच्याकडूनच बहिणाबाईंच्या कानावर तुकारामांचे अभंग पडले असावेत. त्या अभंगांनी बाईंना जणू वेडच लावले. त्या सांगतात-
‘तुकोबाचीं पदें अद्वैत प्रसिद्ध।
त्यांचा अनुवाद चित्त झुरवीं।।
ऐसीं ज्याची पदें तो मज भेटतां।
जीवास या होतां तोष बहू।।’
अवघ्या बारा वर्षांची ती मुलगी. तुकोबांच्या भेटीचा तिने ध्यास घेतला. तुकोबांनी आपणास शिष्यत्व द्यावे यासाठी त्यांचे मन आक्रंदू लागले. एवढे, की त्यात त्या आजारीच पडल्या. ‘त्रिविध तापानें तापलें मी बहू। जाईना कां जीऊ प्राण माझा।।’ असे त्यांना झाले. त्या अवस्थेतच सात दिवस गेले आणि अचानक एके दिवशी तुकोबांनी त्यांना स्वप्नात दर्शन दिले. ही घटना १६४० मधील. त्या सांगतात-
‘ठेवोनीया कर मस्तकीं बोलींला।
मंत्र सांगीतला कर्णरंध्री।।
म्यांही पायांवरी ठेविलें मस्तक।
दिधलें पुस्तक मंत्र गीता।।’
इतिहास संशोधक वा. सी. बेंद्रे यांच्या मते, ‘मंत्रगीता’ हे तुकोबांचे गीताभाष्य असल्याचा हा मोठा पुरावा आहे. स्वप्नातील गुरूपदेशाच्या या घटनेनंतर बहिणाबाईंनी केलेले तुकोबाचे वर्णन पाहण्यासारखे आहे.
‘पांडुरंग- तुका पांडुरंग- तुका।
वेगळीक देखा होय केवीं।।
कलियुगीं बौद्धरूप धरी हरी।
तुकोबा शरीरीं प्रवेशला।।..
तुकोबाचे हात लिहिताती जें जें।
तेंचि तें सहजें पांडुरंग।।’
अशा तुकोबांचा छंद त्या बारा वर्षांच्या मुलीला लागल्याचे पाहून लोक नवल व्यक्त करू लागले. तिला भेटण्यासाठी येऊ लागले. ते पाहून बहिणाबाईंच्या पतीचा मात्र मस्तकशूळ उठला. तो बहिणाबाईंना छळू लागला.
‘भ्रतार हा माझा देखोनी तयासी।
माझीया देहासी पीडा करी।।
न देखवे तया द्वेषी जनाप्रती।
क्षणाक्षणा चित्तीं द्वेष वाढे।।
म्हणे ही बाईल मरे तरी बरें।
इस कां पामरें भेटताती।।’
हा केवळ आपल्या बायकोला मिळणारा मानसन्मान पाहून पेटलेला द्वेषाचा जाळ नाही. पुरुषत्वाचा गंड त्यात आहेच; परंतु त्यात वैदिक धर्माचा अभिमानही आहे. गंगाधरपंत बहिणाबाईंना सांगत होते-
‘भ्रतार म्हणतसे आम्हीं कीं ब्राह्मण।
वेदाचे पठण सदा करूं।।’
आपण ब्राह्मण आहोत. आपण वेदांचे पठण करायचे. तू कसली त्या शूद्राच्या नादी लागली आहेस!
‘कैचा शूद्र तुका स्वप्नींचे दर्शनीं। बिघडली पत्नी काय करूं।’
गंगाधरपंतांचे खरे दुखणे हे होते. त्यामुळे ते तिला सोडून निघाले. म्हणाले- ‘न पाहे मी मुख सर्वथा इयेचें। हीनत्व आमुचें कोण फेडी।।’
येथे पुन्हा तोच मुद्दा आहे. ब्राह्मणाने नीचाचे गुरुत्व स्वीकारण्याचा. ती नीच यातीची व्यक्ती तुकाराम असली म्हणून काय झाले? सनातन धर्म बुडालाच ना त्याने! ब्राह्मणाला हीनत्व आलेच ना त्याने!
दुसऱ्या दिवशी गंगाधरपंत घर सोडून जाणार, तर त्याच रात्री त्यांना ताप भरला. महिना झाला तरी औषधाचा गुण येईना. त्यांना वाटले, आपण तुकोबांची निंदा केली म्हणूनच हे झाले. पश्चात्तापाने त्यांचे मन निवले. बहिणाबाईंनी केलेल्या सेवेने ते आजारातून बरे झाले. आणि मग तेच म्हणू लागले-
‘होवो आतां कल्याण किंवा अकल्याण।
आम्ही तो संपूर्ण भक्ती करूं।।
तुकोबाचे गांवां जाऊनीया राहीं।
मनींचा दृढावा धरोनीया।।’
यानंतर बहिणाबाई सहपरिवार देहूला आल्या. इंद्रायणीत स्नान केले आणि तुकोबांच्या दर्शनाला देवळात गेल्या. त्या सांगतात-
‘तुकोबा आरती करित होते तेथ।
नमस्कारें स्वस्थ चित्त केलें।।
स्वप्नीं जो देखीला तेंच ध्यान तेथें।
देखीले नेमस्त पूर्ण दृष्टी।।’
बहिणाबाईंनी डोळे भरून तुकोबांचे दर्शन घेतले. कसे दिसत असत तुकोबा? बाईंनी त्याचे मात्र वर्णन केलेले नाही. ते केले आहे कचेश्वरभट्ट ब्रह्मे यांनी. ते चाकणचे. तुकारामभक्त. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या वार्षिक इतिवृत्तात (शके १८३५) पांडुरंग नरसिंह पटवर्धन यांनी त्यांचे समग्र आत्मचरित्र प्रसिद्ध केले आहे. या कचेश्वरांनी तुकारामांना प्रत्यक्ष पाहिलेले नाही. पण तुकोबांना ज्यांनी समक्ष पाहिले, त्यांना मात्र ते भेटले आहेत. त्यांनी तुकोबांच्या आरतीत जे वर्णन केले आहे त्यावरून तुकोबा वर्णाने सावळे होते, पोट जरा सुटलेले होते, नाक नीट सरळ होते आणि उंची सर्वसामान्य मराठी माणसासारखी मध्यम होती. कचेश्वर सांगतात-
‘सावळे रूप बापा, याचें लागलें पीसें।।
वर्तुळ दोंद पोट, नेत्र नासिका नीट।
देखिल्या दंत-पंक्ती, लघु आरक्त वोट।।
उंच ना ठेंगणें हो, ध्यान हेंचि हे राहो।’
बहिणाबाई आणि त्यांच्या पतीने या मूर्तीचे दर्शन घेतले. पण त्यांना काय माहीत, की यानंतर त्यांच्यासमोर कोणाचे दर्शन वाढून ठेवलेले होते. बाई तुकोबांच्या दर्शनाची आस घेऊन देहूस आल्या होत्या. आजवर नवऱ्याने त्यांना कमालीचे छळले, मारले होते. त्या सांगतात- ‘सोसियले क्लेश जिवें बहू फार..’ खूप कष्ट सोसले या जीवाने. पण आता तो नवरा वळणावर आला होता. परंतु तरीही बहिणाबाईंचे सोसणे संपणार नव्हते. कारण त्यांच्या राशीला मंबाजी गोसावी येणार होता..
तुलसी आंबिले – tulsi.ambile@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2016 1:20 am

Web Title: sant bahinabai abhang
Next Stories
1 बहु फार विटंबिले..
2 व्याघ्रवाडां गाय सापडली
3 चुकविला जनवाद!
Just Now!
X