27 May 2020

News Flash

काळ्या ढगांची रुपेरी किनार..

लोकसभेत जेमतेम एक सदस्य असलेला पक्ष सत्ताधारी बाकांवर बसलेला देशाने पाहिला.

(संग्रहित छायाचित्र)

पाच वर्षांपूर्वी सत्ताधाऱ्यांच्या मुखातून निघालेला काँग्रेसमुक्तीचा नारा लोकसभेच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा उभ्या देशात दुमदुमू लागल्यामुळे अगोदरच विकलांग होत चाललेल्या काँग्रेस आणि समविचारी विरोधकांची गात्रे दिवसागणिक शिथिल होऊ लागली असताना, आशेचा एक लुकलुकता किरण पश्चिमेच्या दिशेने चमकू लागला आहे. कर्नाटकातील काँग्रेस-जद (ध.) सरकार संपुष्टात येऊन तेथे भाजपची सत्ता प्रस्थापित होताच दक्षिण दिग्विजयाची द्वारे खुली झाल्याच्या आनंदात भाजप कार्यकर्त्यांच्या मनामनांत रोषणाई सुरू झाली, तेव्हा त्या झगमगाटात त्या प्रत्येकाच्या डोळ्यांपुढे मध्य प्रदेश आणि राजस्थानचे काँग्रेसी झेंडे मिरविणारे नकाशे चमकत होते. कर्नाटकपाठोपाठ या दोन राज्यांची काँग्रेस सरकारे खिळखिळी करून तेथे ‘भगवा’ फडकविण्याचा मुहूर्त आता फार दूर नाही, अशी हवा पक्षाच्या दिल्लीच्या कार्यालयापासून गावोगावीच्या भाजपच्या तंबूंमध्येही खेळू लागली. एका बाजूला काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न साकार होणार अशा विचाराच्या उकळ्या भाजपमध्ये फुटू लागल्या असतानाच, काँग्रेस आणि समविचारी विरोधी पक्षांचे काय होणार या हताशेची हवा विरोधकांच्या तंबूत प्रबळ होत होती. भाजपच्या आक्रमक झंझावातापुढे टिकाव कसा धरायचा, अशा भयाने गलितगात्र झालेल्या काँग्रेसच्या तंबूतील उरल्यासुरल्या फौजादेखील भाजपमध्ये डेरेदाखल होत होत्या आणि विरोधक अस्तित्वात तरी राहणार का, असे वातावरण तयार झाले. मग पुन्हा तोच, ‘पर्याय आहेच कुठे’ हा जुनाच प्रश्न आ वासून उभा राहण्याची तयारी करू लागला. कोणत्याही क्षणी राजस्थानचा डळमळता गड सर होईल या भयाचे सावट काँग्रेसवर पसरले. पण राजकारणात कधी कधी चमत्कार होतात, ही अंधश्रद्धा नाही. भारताच्या राजकारणाने असे अनेक चमत्कार याआधी अनुभवलेले आहेत. लोकसभेत जेमतेम एक सदस्य असलेला पक्ष सत्ताधारी बाकांवर बसलेला देशाने पाहिला. गेल्या शतकात तो एक सर्वात मोठा चमत्कार लोकशाहीने पाहिला होता. महाराष्ट्राच्या राजकारणात चमत्कारावरील श्रद्धा जागृत ठेवण्याचे मोठे श्रेय शिवसेनेकडे जाते. बाळासाहेब ठाकरे यांनी चमत्कारावर विश्वास ठेवून अखंड परिश्रम घेतले आणि अखेर त्यांना हवा असलेला सत्ताप्राप्तीचा चमत्कार घडला. सध्या हताशपणे आणि पराभूत मानसिकतेने राजकारणात वावरणाऱ्या काँग्रेसलाही राजस्थानात अशाच एका अचानक चमत्काराचा साक्षात्कार झाला आहे. बहुमताच्या काठावरील सरकारचा गाडा हाकणे ही कसरत असते. राजस्थानात अशोक गेहलोत यांच्या काठावरच्या काँग्रेस सरकारभोवती असेच अस्थिरतेचे काळे ढग दाटले होते. २०० सदस्यांच्या सभागृहात जेमतेम १०० सदस्यसंख्येनिशी आणि काही अपक्षांच्या पाठिंब्याचा पांगुळगाडा घेऊन पावले टाकणाऱ्या या सरकारभोवती कोणत्याही क्षणी झंझावात घोंघावत येईल आणि आहे-नाहीच्या कुंपणावर कसरत करणारे ‘काठावरचे सरकार’ पालापाचोळा होईल, अशी भीती असताना अचानक त्याच काळ्या ढगांना रुपेरी कडा लाभल्या आहेत. ध्यानीमनी नसताना आणि भाजपचा दिग्विजयी रथ घोडदौडीच्या तयारीत असताना, अचानक मायावतींच्या बहुजन समाज पक्षातील सहा आमदारांचा संपूर्ण गट राजस्थानात काँग्रेसमध्ये विलीन झाला, गेहलोत यांच्या नेतृत्वावर स्तुतिसुमने उधळू लागला आणि भाजपच्या विरोधात बाह्य़ा सरसावून उभाही राहिला. गेहलोत सरकारला मिळालेली ही संजीवनी आता सावटासमान दाटून राहिलेल्या काळ्या ढगांची रुपेरी किनार ठरली आहे. आता भाजपचा वारू राजस्थानच्या दिशेने दौड करताना अडखळेल.. काँग्रेसमुक्तीचा नारा राजस्थानच्या सीमा भेदून आत शिरकाव करताना अडखळेल.. म्हणून, ‘चमत्कार ही अंधश्रद्धा असते’ असे राजकारणात तरी कुणीच म्हणणार नाही. कारण राजस्थानच्या राजकारणाने तो चमत्कार ‘करून दाखविला’ आहे! इथे एका दगडात तीन पक्ष्यांचा निशाणा साधला गेला आहे. हा दगड कोणी मारला, याचा शोध आता सुरू झाला असेल..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2019 12:02 am

Web Title: 6 bsp mla merge with congress in rajasthan abn 97
Next Stories
1 साहेब, एवढं ऐकाच..
2 बा तू देवा म्हाराज्या..
3 तोचि ‘नेता’ ओळखावा..
Just Now!
X