21 October 2018

News Flash

.. निराशेचं मळभ दूर झालं!

अहाहा! चौकाचौकांत सनई-चौघडे वाजताहेत..

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

अहाहा! चौकाचौकांत सनई-चौघडे वाजताहेत.. वाफाळलेल्या दुधाच्या कढयांभोवती घोळके जमा होऊ  लागले आहेत.. मसालेदार दूध पिऊन आनंद साजरा करण्याची ही आगळी रीत सगळ्यांना भारीच आवडलेली दिसते आहे. सरत्या वर्षांला सोनेरी पाण्यानेच निरोप देण्याच्या आजवरच्या पद्धतीला हे खास मराठमोळे उत्तर. ‘इयर एंड’ आहे की दसरा दिवाळी असा प्रश्न पडावा. दिवाळीत भल्या पहाटे उठून कार्यक्रमांना गर्दी करणारे हेच ते पुणेकर सरत्या वर्षांला निरोप देताना हाती गरम दुधाचे ग्लास घेऊन उभे असल्याचं चित्र मौजेचं आणि यापूर्वी कधी न दिसलेलं. गरम गरम दूध पिऊन चितळेंच्या दुकानात खवा आणि चक्का मिळवण्यासाठीच्या रांगेत स्थानापन्न व्हायचंच काय ते बाकी. एरवी अशा रांगा रस्तोरस्ती असलेल्या अनेक ‘वाइन शॉप’समोर असतातच की वर्षभर. कुणी कुणाला दुखावत नाही. तू पुढे कसा गेलास, म्हणून गळा पकडत नाही. फक्त पुण्यातच दूध पिण्यासाठी रांगा लागू शकतात, असा वृथा अभिमान बाळगणाऱ्या पुणेकरांनी ठरवून नववर्षांचं स्वागत करताना मद्यसंस्कृतीला झिडकारण्याचा प्रयत्न तरी केलाच. गेल्या काही दिवसांत निदान वर्षांच्या शेवटच्या दिवशी तरी दारूबंदी करावी, अशी मागणी पुण्यात जोर धरू लागलीच होती म्हणा. सह्य़ांची मोहीम सुरू झाली त्यासाठी. मोहिमेत सहभागी व्हायचे की नाही, यावरून वादंगही माजले पुण्यात. म्हणजे ३१ डिसेंबरला दारूबंदी करायची की १ जानेवारीला, या विषयावर सार्वमत घ्यायला हवं, असं सगळ्यांचं मत पडलं. ३१च्या रात्री बारा वाजेपर्यंत दारूबंदी केली, तर त्यानंतर येणारे उधाण कोण आवरणार? असा प्रश्नही उपस्थित झाला. त्यावर चर्चासत्र घडवून आणणे हा एकमेव मार्ग असल्याचंही अनेकांनी सांगून पाहिलं. चर्चा करणे आणि कोणत्याही निर्णयाप्रत न येणे हा जसा पुण्याचा मूळ स्वभाव, तसाच सगळ्यात पहिल्यांदा काही नवं करणं हाही. त्यामुळे दारूबंदी करण्याचा मान फक्त पुण्याचाच असायला हवा, असं म्हणेपर्यंत पनवेलकरांनी थेट पालिका आणि पोलीस यांच्यामार्फत तिथं दारूबंदी लागू करण्यास भागही पाडलं. ३१ डिसेंबरला मद्यपान हे नवं कर्मकांडच, पण सरत्या वर्षांला निरोप देताना येणारी व्याकूळता आणि नव्या वर्षांचे स्वागत करण्यासाठीची अधीरता, अशा संमिश्र भावाकुल परिस्थितीत कुणाला मद्याचा आधार हवासा वाटू शकतो. काय गमावलं, याची चर्चा मद्याच्या चषकाच्या सोबतीनं करणं कित्येकांना अधिक आवडू शकतं. तरीही दारूबंदीचा आग्रह धरत शेवटचा दिस गोड होण्यासाठी जी सही मोहीम हाती घेण्यात आली, त्यामागे खास हेतू असणारच. आपल्याकडे नव्या वर्षांच्या स्वागताला गुढय़ा तर पश्चिमेकडे निरोपाचा सण. म्हणूनच नववर्षांचं स्वागत खास मराठमोळ्या पद्धतीनं करण्याच्या उदात्त हेतूंनी प्रेरित होऊन ही सही मोहीम हाती घेण्यात आली. त्याचं कौतुक करण्याऐवजी नतद्रष्टांनी त्याला नाना विघ्नं आणण्याचा प्रयत्न केला. सह्य़ा घेऊन का कुठे समाज बदलतो? त्यासाठी मानसिकता बदलायला हवी. त्यासाठी अथक प्रयत्न करायला हवेत, अशी नाना मुक्ताफळे ऐकवली गेली पुण्यात. पण तरीही मद्यालये भरून वाहिलीच. दु:खाचे डोंगर त्या पेल्यात बुडवले गेलेच. निराशेचं मळभ दूर होऊन मनाचं आकाश निरभ्र झाल्याचा आनंदही साजरा झालाच.

 

First Published on January 1, 2018 3:27 am

Web Title: alcohol ban in pune