महाकुंभ पर्वणी साधून प्रयागराजच्या संगमतीर्थावर स्नान केले तर पापे धुऊन निघतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी  पूजाअर्चा केली, नंतर लगेचच कुंभनगरीतील खास मंडपात मंत्रिमंडळाची बैठक घेतली. लवकरच होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसंदर्भात चर्चा केली, आणि काही निर्णय घेऊन मंत्रिमंडळाची बैठक आटोपताच, मंत्रिमंडळातील २२ सहकाऱ्यांसह संगमाच्या पात्रात पवित्र कुंभस्नान केले. पर्वकाळातील गंगास्नानामागील पापमुक्तीची श्रद्धा आणि योगी आदित्यनाथ यांचे सह-मंत्रिपरिवार गंगास्नान यांचा तसा परस्परांशी संबंध असेलच असे नाही. तरीही, गंगास्नानानंतरचा सत्संग आटोपून लगेचच योगीजी लोकसभा निवडणुकीच्या आखाडय़ात उतरण्यासाठी सज्ज होणार अशा बातम्या सुरू होणे हा मात्र एक योगायोग म्हणावा. पवित्र कुंभनगरीत हजेरी, कुंभनगरीतील राज्य मंत्रिमंडळाची बैठक आणि गंगास्नानानंतर साधुसंतांच्या सहवासातील सहभोजन हा तर सरकारच्या शिष्टाचार विभागाने त्यांना आखून दिलेला कार्यक्रम असल्याने, या खात्याच्या हेतूबद्दल, म्हणजे, मंत्रिमंडळ बैठकीनंतर लगेचच सर्वानी गंगास्नान का केले असावे, वगैरे अकारण शंका उपस्थित करण्यात हंशील नाही. मुळात प्रयागराजमधील अर्धमहाकुंभ आणि लोकसभेच्या आगामी निवडणुका हा काही योगायोग नाही. कुंभ ही पूर्वनिश्चित परंपरा आहे, तर लोकसभा निवडणुका ही पंचवार्षिक प्रथा आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांसह तमाम मंत्रिगणांनी गंगास्नान केल्याने समाजात काय संदेश जाईल तो ज्याच्या-त्याच्या श्रद्धा आणि समजुतीनुसार करावयाच्या चर्चेचा मुद्दा असतो. त्याच्या राजकीय विश्लेषणानंतर उमटणारी अभिव्यक्ती हा ज्याचा-त्याचा हक्क असल्याने, गंगास्नानानंतरची पापमुक्ती आणि नव्या निवडणुकांची प्रचारसिद्धता यांची सांगड घालण्याचा विचार अभिव्यक्तीच्या त्या स्वातंत्र्यानुसार कोणाच्या मनात आलाच, तर त्याचा प्रत्येकाने आदरच करावयास हवा. म्हणजे असे, की, काँग्रेस नेते शशी थरूर यांना या गंगास्नान सोहळ्यात आदित्यनाथांच्या पापमुक्तीचा प्रयत्न दिसला, तर अन्य कोणी त्यांच्या श्रद्धाभावाने भारावून गेले. इकडे गंगेचे शुद्धीकरण सुरू असताना आपली पापे धुण्यासाठी तिच्या पात्रात डुबक्या घेतल्या जात असल्याचा चिमटा थरूर यांनी काढला खरा, पण आता प्रियंका गांधी आणि कुटुंबीयदेखील जेव्हा गंगेच्या संगमावर महाकुंभ पर्वणीच्या मुहूर्तावर डुबकी घेतील, तेव्हा थरूर यांच्या अभिव्यक्तीचे वारू कोणत्या दिशेने दौड करतील, हा प्रश्न कोणास पडला, तर तोदेखील ज्याच्या-त्याच्या अभिव्यक्तीचाच हक्क असू शकतो. योगी आदित्यनाथ असोत, किंवा प्रियंका गांधी व त्यांचे कुटुंबीय असोत, पावन पर्वाच्या मुहूर्तावर पुण्य पदरी जोडण्याच्या उद्देशाने गंगेत डुबक्या घेणार असतील, तर त्यावर शंका घेण्यात अर्थच नाही. कुंभस्नानात कुणाला राजकारण दिसेल, तर तो सरकारी शिष्टाचार आहे असे कुणाला भासेल.. काहीही असले तरी अखेर डुबकीने पुण्य पदरात पडणार असेल, तर त्यात गैर काय?.. तसेही, गंगेची शुद्धीकरण मोहीम तर सुरूच राहणार आहे.