बातमी तर पक्की होती, लिंक तरी नक्की होती, मग असे काय घडले की सारेच निर्णय फिरले? त्याला या प्रश्नाचे उत्तर उशिरा का होईना, मिळाले. पण त्यानंतरही, पत्नीला कसे तोंड दाखवू, तिला काय सांगू या विचाराने त्याला छळले. घडले असे की, ‘ट्विटर आणि फेसबुकनं आपल्या कर्मचारीवर्गाला पुढल्या आठवडय़ाभरात घरी बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे’ असा मेसेज व्हॉट्सॅप विद्यापीठाच्या कुलगुरूतुल्य अशा एका अमेरिकास्थ मित्रातर्फे त्याला कालच आला होता. दिल्ली दंगलीनंतर कोणाहीवर विश्वास ठेवण्याची त्याची इच्छाच मेली असल्याने, या अमेरिकास्थ मित्राच्या मेसेजवरही ‘खरंच का रे?’ असा प्रतिप्रश्न त्याने करून पाहिला. त्यावर ‘पाहा तूच तपासून’ असे मित्राचे उत्तर. सोबत एक लिंकसुद्धा! उगाच संशय घेतो आपण.. किती सज्जन असतात माणसे.. अशा भावनांचा गहिवर मोठय़ा प्रयासाने आवरून त्याने मित्राला ‘ओके’ कळविले. आभाराचा अंगठाही अर्पण केला. आणि मग जणू एकलव्यासारखा नेम धरून, तोवर फलाटावर पोहोचलेल्या लोकलमधून तो उतरला. ही सारी आदल्या दिवशीची घडामोड. म्हणजे सोमवार दिनांक २ मार्चच्या संध्याकाळची. घरी येताच पत्नीने विचारले, ब्रेड विसरलास ना? तरी ऑनलाइन होतास, व्हॉट्सअ‍ॅपवर. म्हणून मी तिथं मेसेज केला होता.. तुला झालंय काय? हल्ली पूर्वीसारखा बोलतही नाहीस, घुम्यासारखा राहतोस. नीट वागत नाहीस.. काय झालंय? बरं, मोबाइल तर सोडत नाहीस.. बस्स! त्याच क्षणी त्याच्या मेंदूत असा काही रसायनकल्लोळ झाला की तो बोलत नसला तरी त्याची बुद्धी तल्लखच आहे हे सिद्ध होणार होते. त्याच्यावर मौनीपणाचा आरोप करणारी ती, आधी अचंबित होणार होती आणि नंतर आनंदी उत्साहात, त्याच्या मनासारखे वागणार होती.. हे सारे विचार क्षणार्धात झाले.. तिच्या नजरेला नजर भिडवत तो म्हणाला, ‘बास.. आता बघ, येत्या रविवारपासून मी व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक सारं सोडणार.. फक्त तुझ्याचकडे लक्ष देणार.. माझ्या डोक्यात घोळतच होतं तसं, त्याला तू आकार दिलास! ती खरोखरीच आनंदली, पण.. ‘इतकं नको हं करायला.. पण तुझं काही सांगता येत नाही.. देशीलही सोडून.’ सुखी संसारातली संभाषणं आणखी काय वेगळी असतात? पण आज, ३ मार्च रोजी नेमका घरी जातानाच या संभाषणात बिब्बा पडला होता. ‘घरी बसवण्याचा निर्णय’ ही ती सोमवारची बातमी खोटी नव्हती, पण त्यानं लिंक उघडून न वाचल्यामुळे घोटाळा झाला होता. ‘ट्विटर आदी समाजमाध्यम कंपन्यांनी, करोना विषाणूच्या भयामुळे कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले’ अशी खरी बातमी होती. आता घरी काय सांगायचे? हा प्रश्न पुन्हा तिच्या नजरेला नजर भिडवताच सुटला, ‘‘अगं गंमत केली मी.. रविवारी महिला दिन ना? म्हणून फक्त तुझ्याचसाठी वापरणार हं मी त्या दिवशी मोबाइल’’ तो म्हणाला. ती ‘हुं:’ म्हणत ‘तुझं काही खरं नाही’ असे नजरेनेच सांगत आत गेली.