आपल्या पक्षात यापुढे निवडणूक प्रक्रियेत कमालीची पारदर्शकता पाळली जाईल आणि निवडणुकीचे वातावरण असेपर्यंत सगळीकडेच पारदर्शकता असावी यासाठीही आपला पक्ष आग्रही असेल, असे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी कार्यकर्त्यांच्या एका बैठकीत सुरुवातीसच स्पष्ट केले, तेव्हा बैठकीतील एकही वाक्य बाहेर कुणाला कळता कामा नये, अशी तंबीही त्यांनी दिली होती. त्याच बैठकीत, त्यांनी ‘पारदर्शकतेसाठी पाळावयाची पथ्ये’ या विषयावर मार्गदर्शनही केले होते. पण यातील एकही मुद्दा बाहेर कुणाला कळणार नाही असे बजावूनही, त्याची साधी दक्षता घेणेही कार्यकर्त्यांना जमलेले दिसत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशीष शेलार यांनी ज्यासाठी वेळात वेळ काढून कित्येक तास गुप्त खलबते केली, पारदर्शकतेची मूलतत्त्वे निश्चित केल्याखेरीज त्याचा गौप्यस्फोट करावयाचा नाही याची खबरदारी पाळली, त्याला पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हरताळच फासून टाकला. गुप्तता राखण्याचे सक्त आदेश थेट वरूनच आलेले आहेत, हेदेखील गुप्त राहू शकले नाही. भाजप हा मुळातच, ‘पार्टी विथ डिफरन्स’ असा पक्ष असल्याने, पारदर्शकतेचा आग्रह धरायलाच हवा, असा आग्रह पक्षात अनेकांनी धरल्याने त्याच्या अंमलबजावणीसाठी पक्षाने अत्यंत गुप्ततापूर्वक नेत्यांची एक नवी फळीदेखील उभी केली. राजकारणात अशा बाबी शक्यतो गुप्त ठेवाव्याच लागतात. त्याची फार वाच्यता झाली, तर कौतुक होण्याऐवजी खिल्ली उडविली जाण्याची शक्यताच अधिक. त्यामुळे, नव्या फळीतील माणसेही विश्वासाची असावीत यावरही भर देण्यात आला. अर्थात ही मोहीम पुरेशी गुप्तता पाळूनच पार पडल्याने त्याची फारशी वाच्यता झाली नाही आणि पारदर्शकतेच्या आखणीची मोहीम गुप्तपणे पार पडल्याचा आनंद पदाधिकाऱ्यांनाही झाला. गुप्ततेच्या तत्त्वाची तंतोतंत अंमलबजावणी व्हावी यासाठी कार्यालयाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे सदैव सुरू राहावेत, असे आदेशही देण्यात आले. कथ्थक भवनाच्या बाहेरच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी गुप्तपणे एक पथक सज्ज झाले, तरीही पारदर्शकतेचाच विजय झाला. उमेदवारांची पहिली यादी फुटलीच, आणि कॅमेरे असूनही, गुप्ततेचा भोपळा कसा फुटला, हे मात्र गुप्तच राहिले. एक खरे आहे, की, उमेदवारांच्या याद्या तयार करताना नाइलाजानेच गुप्तता पाळावीच लागते. यादी अंतिम करून ती जाहीर करताना त्यावर पारदर्शकतेची झालर चढवायची असते. पण भाजपच्या संभाव्य उमेदवारांची अत्यंत गुप्तपणे तयार केलेली यादी पारदर्शकपणाने जाहीर करण्याआधीच फुटली आणि गुप्तता पाळण्याच्या आदेशाच्या पुरत्या चिंधडय़ा उडाल्या. आता पुन्हा अत्यंत गुप्तता पाळून संभाव्य उमेदवारांची यादी तयार करणे आणि पारदर्शकपणाने ती जाहीर करणे यासाठी हातात फारच थोडा वेळ उरल्याने, फडणवीस-शेलार यांनी कंबर कसली असली, तरी पारदर्शक यादी तयार होईपर्यंत, या बैठकीच्या जागेबाबत मात्र कमालीची गुप्तता पाळण्यात येणार असल्याचे समजते. कारण बाहेर काहीही बोलायचे नाही, असे या नेत्यांनी सर्वानाच गुप्त बैठकीत बजावल्याची जोरदार चर्चा आहे!