एका बाजूला संस्कृतीचा ऱ्हास आणि दुसरीकडे संस्कृतीचे पुनरुज्जीवन असा एक अभूतपूर्व संघर्ष सध्या समाजात उफाळलेला असताना, पुनरुज्जीवनाच्या दिशेने आशेने पाहता यावे असे एक ‘स्टार्टअप’ केवळ संकल्पनेच्या अवतारात असतानाच झाकोळले आहे. आपणा सर्वाना अलीकडच्या काळात संस्कृतीचे आणि परंपरेचे महत्त्व एव्हाना तंतोतंत पटून गेले असणार हे गृहीत धरून, हाच वारसा पुढच्या पिढय़ांच्या शिरावर सोपवावा या उदात्त हेतूने काही करावयास जावे, तर चहुबाजूंनी त्यावर हल्ले सुरू होतात! याचाच फटका बनारस हिंदू विद्यापीठास बसला आणि त्यांच्या स्वप्नातील एक संस्कारी योजना सुरू होण्याआधीच ‘हे आमचे नाही’ असे सांगत हात झटकण्याची वेळ या विद्यापीठावर आली. इकडे  महानगरी मुंबईत विवाहेच्छू तरुणांच्या मनात भरलेली कोणतीही मुलगी उचलून त्याच्या हवाली करण्याची एक नवी योजना भाजपच्या आमदार-प्रवक्त्याने  जाहीर केली हे एव्हाना साऱ्या जगास माहीत झाले आहे. तर, अशा योजनेतून एखादी वधू एखाद्या संस्कृतिपूजकाच्या घरात आणली, तर तिला ‘आदर्श सून’ बनविण्यासाठी तिच्या मनावर संस्काराचे नवे घडे ओतावे लागणार आणि आपणास अपेक्षित असलेल्या संस्कृतीचा सारा वारसा तिच्या शिरावर देणार हे वेळखाऊ काम सोपे करण्याची योजना तिकडे बनारस हिंदू विद्यापीठाने आखली होती. दोन दिवसांत त्याचा मोठा गाजावाजा झाला. इकडे महाराष्ट्रात राम कदम यांनी त्यांची ‘बेटी भगाओ’ योजना जाहीर केली, त्याच्या एकदोन दिवस आधीच तिकडे आदर्श बहू प्रशिक्षणाचा एक पाठय़क्रमही जाहीर होत होता. बनारस हिंदू विद्यापीठाच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘आदर्श बहू’ प्रशिक्षणाचा एक कार्यक्रम तयार होत आहे, हे कानोकानी झाले आणि गदारोळ माजून हा ‘दैवी योगायोग’ विस्कटून गेला.. अविवाहित मुलींनी ‘आदर्श सून’ म्हणून कसे वागावे याचे प्रशिक्षण देण्याची ही योजना या गदारोळामुळे गुंडाळावी लागली, असा कोणताच पाठय़क्रम आमच्या विचाराधीनही नव्हता, तो आमच्या आवारात चालणार असला तरी खासगी आहे, असेदेखील जाहीर करून सपशेल माघार घेण्याची वेळ विद्यापीठावर आली. ..संस्कृतीच्या भवितव्याच्या दृष्टीने हे चिंताजनक आहे. संगणक वापरण्याच्या सरावापासून ‘मैरिज स्किल्स’पर्यंत सारे काही या खासगी आणि तीन महिन्यांच्या अभ्यासक्रमात शिकवले जाईल. अशा योजना जागोजागी सुरू झाल्या, तर प्रशिक्षित आदर्श सुनांना घरोघरी मोठी मागणी येईल. असे झाले की राम कदमांच्या योजनेतील लाभार्थीना निवड करण्यासाठी चांगला पर्याय उपलब्ध होईल आणि अशी आदर्श सून उचलून आणण्याची जबाबदारी पार पाडल्यास, संस्कृतिरक्षणाच्या कामात हातभार लावल्याचे पुण्यदेखील या आधुनिक रामाच्या पदरी जमा होईल. तसेही या रामाच्या मनगटावर साठ हजार बहिणींच्या राख्यांचे ओझे आहे. राज्यात त्यांचे सरकारही आहे. आपल्या ‘बेटी भगाओ’ योजनेस साह्य़भूत ठरण्यासाठी बनारस हिंदू विद्यापीठाचा सुरू होण्याआधीच बंद पडलेला तो प्रशिक्षणक्रम महाराष्ट्रात आणण्याचा विचार मुख्यमंत्र्यांनी केला, तर राम कदमांचे काम सोपे होऊन त्यांचे नावही होईल. निवडणुकीच्या काळात अशा योजनांचा पक्षाला फायदा होतो!