News Flash

जेथे चमत्कार घडतात..

आपण मराठी माणसे कुठल्याही क्षुल्लक मुद्दय़ांचा कीस काढत बसतो.

आपण मराठी माणसे कुठल्याही क्षुल्लक मुद्दय़ांचा कीस काढत बसतो. अगदी ताजा मुद्दा ‘कोल्ड प्ले’ या जगप्रसिद्ध ब्रिटिश वाद्यवृंदाचा. या वाद्यवृंदाचा कार्यक्रम ‘ग्लोबल सिटिझन’ या संस्थेच्या वतीने, ‘ग्लोबल इंडिया कल्चर फेस्टिवल’अंतर्गत येत्या १९ नोव्हेंबरला मुंबईतील बीकेसी येथे होतोय. हे ऐकल्यावर आपण ‘कोल्ड प्ले’चे एखादे गाणे आठवून गिरकीच घ्यायला हवी; पण त्याऐवजी आपले भलतेच. या कार्यक्रमाचा करमणूक कर माफ करण्याची बाब किती क्षुल्लक आणि बीकेसीचे मैदान ‘ग्लोबल इंडिया कल्चरल फेस्टिवल’साठी महिनाभर फुकटात देण्याचा मुद्दाही किती छोटासा; पण त्यावर आपली कुरकुर. म्हणे, करमणूक करातून माफी द्यायची तर कार्यक्रम सामाजिक कार्यासाठी आयोजित केलेला असणे आवश्यक आहे किंवा तो शास्त्रीय संगीताचा हवा, असा नियम आहे. आता संगीताच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यावरून त्यांच्या रोजच्या सव्यापसव्यी जगण्याचे ओझे घटकाभरही उतरवणे ही किती मोठी समाजसेवा. दुसरा मुद्दा शास्त्रीय संगीताचा. तर, संगीतात असा वर्णभेद करणेच चुकीचे. संगीताची स्वत:ची अशी भाषा असते आणि तिला देशांच्या, प्रदेशांच्या सीमांचे अडसर नसतात. हा कार्यक्रम आयोजित करणारी संस्था आहे ‘ग्लोबल सिटिझन’. अशा नावाची संस्था जागतिक कार्यक्रमच करणार ना? की ती ‘मराठी असे आमुची मायबोली..’ पद्धतीची गाणी सादर करणाऱ्या संस्थेचा कार्यक्रम आयोजणार? शिवाय, एवढा मोठ्ठा कार्यक्रम करायचा तर त्याची तयारीही तशीच खाशी आणि परिपूर्ण हवी. त्यासाठी बीकेसीचे मैदान दिले समजा संस्थेला महिनाभर मोफत तर काय एवढे बिघडते? ‘कोल्ड प्ले’च्या मैफलीसोबत हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंतांचा सहभाग असलेल्यांचा एक छानदार कार्यक्रमही तेथे होईल. या कार्यक्रमासाठी देशविदेशातूनही किती तरी लोक मुंबईत येतील. त्यातून सरकारच्या तिजोरीत जवळपास १३० कोटींची भर पडेल. ही तर कौतुकाचीच गोष्ट. तरीही घोडे अडलेय. चंद्रकांत पाटील यांच्या महसूल विभागाने करमणूक कर माफ करण्याचा मुद्दा आणि एमएमआरडीएने बीकेसी मैदान मोफत देण्याचा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे टोलवलाय. हे अनुचित आहे. चंद्रकांतदादा काय किंवा एमएमआरडीए काय, त्यांनी आपापल्या पातळीवर निर्णय घ्यायला हवा. ते घेत नसतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनहितासाठी तातडीने ते निर्णय घेऊन चमत्कारी कार्यक्षमतेचा दाखला द्यावा. ‘कोल्ड प्ले’चा नवा अल्बम ‘अ हेड फुल ऑफ ड्रीम्स’मध्ये एक गाणे आहे. ‘मी अशा जगात आलोय.. जेथे चमत्कार घडतात’ असा त्या गाण्याचा मराठी भावार्थ. ‘कोल्ड प्ले’वाला ख्रिस मार्टिन वा जॉनी बकलॅण्ड यांना मराठी समजण्याचा प्रश्नच नाही; पण येत्या १९ नोव्हेंबर रोजी झगझगत्या व्यासपीठावरून त्यांच्या कार्यक्रमात जेव्हा हे गाणे सादर होईल तेव्हा, ‘होय हे असेच जग आहे, जेथे चमत्कार घडतात’, अशा भावनेने मुख्यमंत्र्यांचा ऊर अभिमानाने नक्कीच भरून येईल. बस्स! आणखी काय हवे?

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2016 2:39 am

Web Title: coldplay is playing in india on november
Next Stories
1 यज्ञास कारण की..
2 कशासाठी? उद्यासाठी..
3 गिऱ्हाईक!
Just Now!
X