News Flash

एक धागा सुखाचा..

गोष्टी ऐकायला आणि वाचायला सगळ्यांनाच आवडतात.

गोष्टी ऐकायला आणि वाचायला सगळ्यांनाच आवडतात. त्यातही, मीठमसाला लावलेली, चटपटीत गोष्ट असेल, तर आणखीनच मजा येते. अशीच एक ही गोष्ट.. एकदा नरेंद्रभाई आणि सुलभसुविधाजनक बिन्देश्वरदादा बंगल्याच्या हिरवळीवर गप्पा मारत बसले होते. नरेंद्रभाईंना झोपाळ्यावर झुलायला खूप आवडते. म्हणून ते हिरवळीवरच्या झोपाळ्यावर हलका झोका घेत झुलत होते आणि बिन्देश्वरदादा त्यांच्या पायाशी बसून उद्याच्या भारताची स्वप्ने रंगवत होते. बोलता बोलता गप्पांचा धागा सुख या विषयावर पोहोचला. ‘दादा, सुख म्हणजे काय रे भाऊ?’.. नरेंद्रभाईंनी बिन्देश्वरदादांना विचारले, आणि बिन्देश्वरदादांना आपल्या आयुष्यातील ती खडतर सकाळ आठवली. केवढी पंचाईत झाली होती त्या वेळी.. आसपास कुठेच काही सोय दिसत नव्हती. अचानक एका गलिच्छ एस्टी स्टँडवर मागच्या बाजूला ती पाटी दिसली आणि दादा आत शिरले. काही वेळाने बाहेर आले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर कमालीचे सुख विलसत होते. मग त्यांनी ठरविले, या सुखाचा अनुभव देशातल्या प्रत्येकाला मिळाला पाहिजे. तोदेखील अत्यंत सुलभपणे.. त्यासाठी कोणतेही कष्ट असू नयेत. मग बिन्देश्वरदादा कामाला लागले, आणि गावागावांत सुखाची सुलभ सुविधा सुरू करण्याचा सपाटा लावला.. नरेंद्रभाईंनी विचारलेल्या प्रश्नावर बिन्देश्वरदादांना ते दिवस आठवले, आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ते म्हणाले, ‘भाई, सुलभपणे सारे सुरळीत होणे हेच खरे सुख’.. मग नरेंद्रभाईंचे डोळे चमकले. ‘अच्छा.. म्हणजे, ईझ ऑफ डुईंग हा आपला उपक्रम सुख आणि सुलभतेचा समान धागा ठरणार तर..’ नरेंद्रभाई गालात हसत बिन्देश्वरदादांना म्हणाले आणि दोघांनीही समाधानाने मान हलविली.. या गप्पा मनात साठवतच बिंदेश्वरदादा घरी परतले. पुढे एकदा बिन्देश्वरदादांना नरेंद्रभाईंशी झालेले ते बोलणे आठवले आणि ईझ ऑफ डुईंगमध्ये आपलाही सुलभ सहभाग हवा असे वाटून त्यांनी हरयाणातील एक खेडेगाव दत्तक घेतले. तेथे सुलभ सुविधांचे जाळे उभे केले आणि त्यांनी नरेंद्रभाईंना फोन लावला. नरेंद्रभाई तेव्हा अमेरिकेत ट्रम्पभैयांसोबत न्याहारी करत होते. बिन्देश्वरदादांनी त्यांच्या ईझ ऑफ डुईंगचे संपूर्ण वर्णन केले आणि ट्रम्पभैयाही खूश झाले. अशा कर्तबगारांसाठी आपल्याकडेही पद्मभूषणसारखा काही तरी किताब ठेवायला हवा, असा विचार ट्रम्पभैयांच्या मनात चमकला आणि त्यांनी तो मोठय़ाने बोलून दाखवला. बिंदेश्वरदादा फोनला कान लावूनच होते.. लगेचच त्यांनाही एक कल्पना सुचली. त्यांनी गावालाच ट्रम्पग्राम असे नाव दिले. सुखाची पहिली सुविधा पोहोचल्यामुळे सुखी असलेल्या ट्रम्पग्रामवासींनी ट्रम्पभैया आणि नरेंद्रभाईंनाही गावाला भेट देण्याचे आवतण धाडले आहे. गावातल्या मायबहिणींकरवी दोघांनाही राखी पाठवून मैत्रीचे धागे बळकट करण्याचा घाट दादांनी घातला आहे. ज्या गप्पांमधून सुलभ सुविधांचा धागा सापडला, त्या धाग्याने सुखाचा स्वर्ग शोधण्यासाठी आता दादा सज्ज झाले आहेत, अशी वदंता आहे.. खरेखोटे देवास ठाऊक!

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2017 12:11 am

Web Title: donald trump to receive rakhis from haryana village
Next Stories
1 बावरलेली बाकडी..
2 दांडी : मारणे आणि उडणे
3 संध्याछाया..
Just Now!
X