गेल्या तीन वर्षांपासून सतत कानावर आदळणाऱ्या एका शब्दापोटी आणि केवळ बोलबाल्यामुळे रांगेत ताटकळून तुम्हीआम्ही प्राप्त केलेल्या त्या कार्डावर पुन्हा गंडांतर येऊ घातलंय. किती अपेक्षेने आपण ते कार्ड खिशात जपून ठेवले होते. आपण या देशाचे नागरिक आहोत याची खूणगाठ पटविणारा तो एकमेव आधार आपल्या खिशात आहे, याचाच केवढा आधार प्रत्येकास वाटत होता. ‘माझा आधार, माझी ओळख’ असे दिलासादायक शब्द जेव्हा, लाखो, करोडो रुपये खर्चून तमाम भाषांमधील वर्तमानपत्रांच्या पानभर जाहिरातींमधून दिवसागणिक समोर नाचत असत, तेव्हा याच आत्मविश्वासाने ऊर भरून येत असे. आता जगाच्या पाठीवर कुठेही गेलो, तरी आपली ओळख कुणीच हिरावून घेऊ  शकणार नाही, याची खात्रीही नुकतीच कुठे वाटू लागली होती. आपल्याला ओळख देणारे, आपल्या नागरिकत्वाचा आधार ठरणारे एक लहानसे कार्ड आपल्या खिशात आहे, याची सुखावणारी जाणीव नुकतीच कुठे आकारास येत होती, तोवर आधारची परवड सुरू झाली. कधी डाटा चोरी होत असल्याच्या शंकेने तुम्हीआम्ही घाबरे झालो, तर आपल्या खासगी आणि आर्थिक तपशिलांच्या सुरक्षाभयाने खिशातल्या त्या कार्डाचा आधारच अवजड वाटू लागला. आधार नसेल तर आपल्या अस्तित्वालाच अर्थ उरणार नाही या भयाने ते टीचभर कार्ड मिळविण्यासाठी किती आटापिटा केला, किती खेटे घातले आणि प्रसंगी किती हात ‘ओले’देखील केले, त्याचे तुमचेआमचे, साऱ्यांचेच अनुभव सारखेच निघतील. अशा असंख्य कसोटय़ा पार करून मिळविलेल्या त्या कार्डाला जपण्यासाठी किती निगुतीने त्यावर प्लास्टिकचे आवरण चढविले, ‘लॅमिनेशन’सारख्या भुक्कड कामासाठीदेखील दोनशे-तीनशे रुपये मोजले आणि ते लॅमिनेटेड कार्ड हाती पडताच, मोठा आधार मिळाल्याच्या विश्वासाने समाधानाचा सुस्काराही सोडला होता.. हे सारे अनुभव सर्वाचेच आहेत आणि ते सारखेदेखील आहेत. आधार कार्ड मिळविणे ही तेव्हा प्रत्येकाचीच एक मोहीमच झाली होती. आधार कार्डासाठीच्या रांगेत उभे राहिल्यानंतर आपण या क्षणी पुरते निराधार आहोत, अशा भावनेने आक्रसलेले चेहरे, ते कार्ड मिळविल्यानंतर किती फुलले होते, हेदेखील प्रत्येकासच आठवत असेल. पण ते ‘सुखाचे माप’ अजूनही पुरते भरलेले नाही. मोठय़ा प्रयासाने कार्ड तर हाती पडले, आता मला माझी ओळख मिळाली असे काहीतरी वाटत असतानाच, आधारच्या अस्तित्वाला आव्हान देणाऱ्या प्रत्येक याचिकेसोबत आपला इवलासा जीवदेखील वरखाली होत राहिला. एवढय़ा कष्टाने मिळविलेला, अस्तित्वाचा पुरावा ठरणारा हा आधार आपल्याला खरोखरीच ओळख देणार आहे ना, हा प्रश्न सतत मनात घोळत राहिला आणि अजूनही तो पुसला गेलेलाच नाही. आधारच्या त्या टीचभर तुकडय़ालाच अद्याप स्वत:ची ओळख सापडलेली नाही. आता तर, खिशातल्या त्या लॅमिनेटेड कार्डाचीदेखील ओळख संपली आहे. ज्याच्या भरवशावर आपल्याला आपली ओळख सापडणार होती, त्यालाच आपली पुरती ओळख पटविण्याची धडपड करावी लागत आहे. जेव्हा ही ओळख पटेल, तेव्हा मात्र तो तुमचाआमचा आधार ठरेल. निदान, तशी श्रद्धा ठेवावयास हरकत नाही..