News Flash

सोयरे सकळ..

मोदी हे माझ्या मोठय़ा भावासारखे आहेत असे उद्धवजींनी विनयाने जाहीर करावे,

(संग्रहित छायाचित्र)

राजकारणातील नेत्यांची नाती हे सामान्यांसाठी एक मोठे गूढ असते. कुणी कुणाच्या फारच जवळ जाऊ लागले, गळ्यात गळा घालू लागले, की आता त्यापैकी कुणी तरी एक जण दुसऱ्याचा केसाने गळा कापणार असे आडाखे बांधले जाऊ लागतात. तसेच होणार असा दावा करीत पैजाही लावल्या जातात आणि त्या नात्याची अखेर खरोखरीच कशी होते याकडे साऱ्या नजरा लागून राहतात. काल एखादा नेता ज्याच्यावर आगपाखड करतो, तो नेता आज त्यालाच परमपूज्य मानत त्याच्यासाठी जनमत गोळा करीत गावगन्ना फिरताना दिसतो, तर कालपर्यंत ज्यांचे एकमेकांशी विळ्याभोपळ्याचे नाते असते, ते आज गळ्यात गळे घालत एकमेकांच्या गळ्यात स्तुतिसुमनांचे हार घालताना दिसतात.

नेहमीच असे होत असल्याने, या नात्यांचे गूढ उकलले नाही तरी त्याचे काही विशेष वाटेनासे झाले आहे. अशा गदारोळात, शिवसेना आणि भाजपचे नाते मात्र, वेगळेपणामुळे उठून दिसते. महाराष्ट्रात भावाभावांतील, भावाबहिणींतील, पितापुत्रांतील, काका-पुतण्यातील राजकीय संघर्ष विकोपास जाऊन एकमेकांशी केवळ विळ्याभोपळ्यापुरते नाते उरल्याची अनेक उदाहरणे आहेत, पण आम्ही एकमेकांचे भाऊच आहोत यावर सातत्याने एकमत व्यक्त करणारे नाते केवळ शिवसेना आणि भाजप यांच्यामध्येच रुजलेले दिसते. हे या दोन पक्षांचे वेगळेपण जवळपास प्रत्येक निवडणुकीत अधिक गडद होत असते. या नात्याचे गूढ मात्र आजवर कुणालाही उकललेले नाही. हे दोन पक्ष एकमेकांचे भाऊ आहेत, पण दोघांनाही कधी कधी एकच कोडे पडते, ‘मोठा भाऊ कोण?’.. कधी आपण मोठा भाऊ आहोत असे शिवसेनेस वाटू लागते, तर कधी तोच दावा भाजप करू लागते. मग त्यांच्यात या वादाच्या ठिणग्या पडू लागल्या की एकमेकांशी विळ्याभोपळ्याचेच नाते आहे की काय असा सामान्य जनतेस भास होऊ लागतो. मग पुन्हा, त्यांच्या नात्यावर पैजा लागतात, आणि साऱ्या नजरा त्या नात्यासंबंधीच्या निकालाकडे लागतात. राजकारणात काही निकाल कोणाच्याच हातात नसतात.

असे नाते हा त्यापैकीच एक!.. भाजप आणि शिवसेना यांच्यातील नात्याच्या वादाने टोक गाठल्यावर, नात्याचे हे गूढ अधिकच गडद होऊन कधीच सुटणार नाही असे वाटू लागलेले असतानाच अचानक दोघांनाही आपल्या नात्याचा साक्षात्कार होतो, आणि वादावर पडदाही पडतो. लोकसभा निवडणुकीआधी दोघेही जेव्हा एकमेकांना खरोखरीच पाण्यात पाहत होते, तेव्हाही हाच वाद रंगला होता. शिवसेना हाच मोठा भाऊ आहे एवढीच एक अट भाजपसमोर होती. ती मान्य केली की युती झालीच अशी परिस्थिती असतानाही, भाजपने सेनेस ‘पटकाविले’ आणि त्याचा अर्थ उमगण्याआधीच दोघांनी एकमेकांचे हात हातात धरून उंचावत जनतेस सामुदायिक अभिवादनही केले.

आता शिवसेना हा मोठा भाऊ असल्याचे भाजपने मान्य केले असावे असे वाटते तोवर, मोदी हे माझ्या मोठय़ा भावासारखे आहेत असे उद्धवजींनी विनयाने जाहीर करावे, आणि उद्धव माझ्या धाकटय़ा भावासारखे असे सांगत मोदींनी त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे झाले. पुन्हा एकदा नात्याचे गूढ गडद झाले. त्याची उकल हे तुमच्याआमच्यासाठी गूढ असले, तरी निवडणुका तोंडावर आल्या की त्या नात्याची उकल होते, एवढे आता एकमेकांना आणि मतदारासही माहीत झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 12:56 am

Web Title: lok sabha elections 2019 pm modi calls uddhav thackeray younger brother
Next Stories
1 डिजिटल राष्ट्रवाद
2 जीभ घसरण्याचा ‘हक्क’
3 दुष्काळात तेरावा..
Just Now!
X