प्रति, मा. अजितदादा व मा. चंद्रकांतदादा, नमस्कार, आपण दोघेही राज्याचे महत्त्वाचे नेते आहात याविषयी आमच्या मनात तिळमात्र शंका नाही. तुम्हा दोघांचा आदर्श ठेवून वाटचाल करणारा एक मोठा वर्ग या राज्यात राहातो. अनुकरणप्रियता हे आपल्या समाजाचे महत्त्वाचे लक्षण; त्यामुळे तुमचे अनुकरण करणाऱ्यांचीही संख्या राज्यात मोठी आहे हे तुम्हाला ठाऊक असेलच. अलीकडे तुम्ही दोघांनीही एकमेकांशी वाद घालताना झोपेचा मुद्दा अग्रक्रमावर आणला. त्यामुळे मानसोपचारतज्ज्ञांना सध्या व्यवसाय करताना एका नव्याच अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. आता आमच्याकडे झोप न येण्यासाठी औषधे द्या असे म्हणणारे रुग्ण अचानक वाढले आहेत. आम्ही सखोल चौकशी केली असता तुम्हा दोघांच्या वक्तव्यांनी प्रेरित होऊन हे लोक असे पाऊल उचलत असल्याचे लक्षात आले. हे आरोग्यासाठी घातक आहे. सुखी व स्वस्थ जीवनासाठी झोप आवश्यक आहे हे तुम्हाला माहिती आहेच. राजकारणी लोकसुद्धा कमी काळ का होईना, पण झोप घेतातच. या काळात काहीही अघटित घडू नये अशी साऱ्यांचीच अपेक्षा असते. तरीही तुम्ही दोघांनी ‘झोपेत सरकार पडेल’, ‘झोपेत बोलले’ अशी वक्तव्ये करणे सुरू केल्याने अनेकांची झोप उडाली आहे. तरीही ज्यांना ती आवरत नाही असे लोक उपचारांसाठी आमच्याकडे गर्दी करू लागले आहेत. झोप न येण्यासाठी कोणतेही औषध देणे नीतीला धरून नाही असे आमच्या काही व्यवसायबंधूंनी त्यांना सांगून बघितले. तरीही अनेकांचा आग्रह कायम असतो व यातून रुग्ण व डॉक्टरांमध्ये भांडणे उद्भवू लागली आहेत. राज्यात आतापर्यंत १६ ठिकाणी असे प्रसंग घडले व आमच्या दोन सहकाऱ्यांना तर अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागले. दोन वर्षांपूर्वी पहाटे घडलेला राजभवनातला प्रसंग ताजा असल्याने झोपेत काहीही घडू शकते याची भीती अजूनही अनेकांच्या मनात आहे. अशा वेळी आपण सजग असले पाहिजे या भावनेतून हे लोक उपचारासाठी आमच्याकडे आग्रह धरतात असेही संघटनेच्या लक्षात आले. करोनामुळे आम्ही आधीच ताणात असताना हा नवा ताण सहन करण्याची शक्ती आमच्यात आता उरलेली नाही. त्यामुळे कृपा करून आपण दोघांनीही या झोपेसंबंधीच्या वक्तव्यांवर तातडीने खुलासा करावा, अशी विनंती आम्ही या निवेदनाद्वारे करीत आहोत. सरकार टिकवणे वा पाडण्यासाठी राज्यभरातल्या कार्यकर्त्यांनी जागे राहण्याची व झोपमोड करण्याची काही आवश्यकता नाही. पक्षाच्या कोअरग्रुपमधील लोक यासाठी समर्थ आहेत. तेव्हा इतरांनी त्यांच्या झोपेचे खोबरे करू नये अशा स्पष्ट शब्दात हा खुलासा व्हावा अशी तुम्हा दोघांनाही आमची हात जोडून विनंती आहे.

सत्ताधाऱ्यांना सरकार टिकवणे व विरोधकांना ते पाडण्याची घाई असते व अशी कामे उत्तररात्रीच केली जातात याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे तुम्हा दोघांच्याही प्रयत्नाच्या आड येण्याचा आमचा हेतू नाही. मात्र अशी कामे तडीस नेण्यासाठी व या काळात कुणीही झोपच काय, पण साधे पेंगायलाही नको ते बघण्यासाठी तुम्ही पक्षातर्फे पाहिजे तर निद्रानाशक पथके नेमा. त्यातून बेरोजगारांना काम मिळेल. पण समाजावर परिणाम होईल अशी झोपेविषयीची वक्तव्ये आवरा. यामुळे आमच्यासमोर नवेच संकट उभे ठाकले आहे. भयग्रस्त झालेल्या आमच्या व्यवसायबंधूंना आपण कृतीतून दिलासा द्यावा या अपेक्षेसह आम्ही मानसोपचारतज्ज्ञ सामूहिकपणे आपल्याला हे विनंतीपत्र धाडत आहोत.