काही लोकांना नसेल मान्य; पण त्यांच्यासारखा दूरदृष्टी असलेला महात्मा एकच! चिमूटभर मिठात काय ताकद असते हे केवळ त्यांना ओळखता आले. त्यांनी मीठ उचलले नसते तर स्वातंत्र्याच्या लढय़ाला गती आलीच नसती ना! मग त्यांचे अंधानुकरण आजचे राजकारणी करत असतील तर त्यात वावगे ते काय? आता आपले दादाच बघा ना! पत्रपरिषदेत कांजूर मार्ग, मेट्रो असा विषय आला रे आला की खिशातून लगेच मिठाचा पुडा काढून दाखवतात म्हणे! रोज तेच तेच बोलण्यापेक्षा असा पुडा दाखवला की संपले. टीव्हीवाले त्याच्या अर्थाचा अनर्थ करायला मोकळे. आजकाल तर दादा सकाळी घरीसुद्धा ‘नमस्ते सदा’ गुणगुणण्याऐवजी ‘उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया’ असेच म्हणतात. दांडीयात्रेतून इंग्रजांना हाकलायचे होते व यांना महाआघाडीला. दोन्ही ठिकाणी प्रतीक म्हणून मीठच. आता दादांची तरी चूक काय? खाल्ल्या मिठाला त्यांनी नाही तर कुणी जागायचे? भलेही त्यांनी तेव्हा फाइलवर सही केली असेल पण सत्ता गेली की सारे संदर्भ बदलतात, हे टीकाकार लक्षातच घेत नाहीत. स्वातंत्र्य मिळाल्यावर मीठ हा विषय कुणाच्या अखत्यारीत राहील याचा निवाडा गांधींनीच देऊन टाकायला हवा होता. आजचे भांडण तर टळले असते ना! या भांडणाने सारे राजकारणच मीठमय करून टाकले आहे. कडवटपणाची जागा खारटपणाने घेतली आहे. ते सावंतांचे सचिन रोज मीठमसाला लावून विषय मांडत असतात. पण आशीषराव तर पक्के मीठबाज. आरोपाची प्रत्येक फैर पलटवून लावतात. यामुळे त्यांच्या शरीरातील मिठाचे प्रमाण तर वाढत नाही ना, अशी शंका आता काहींना यायला लागली. दादा असो वा राव, या साऱ्यांचा रोष उद्धवजींवर. काय तर खाल्ल्या मिठाला जागले नाही म्हणून! आता तेच जर मिठाचा खडा टाकू नका म्हणत असतील तर हे सत्ताहरणाच्या जखमेवर मीठ चोळणेच नव्हे काय? तसेही ते काडीमोड झाल्यापासून मीठ कमीच खातात म्हणे! दुधाचे दही करतानासुद्धा मीठ वापरू नका, अशा सूचनाच त्यांनी मातोश्रीवर दिल्या म्हणे! युतीत राहून सत्तेचे मीठ चाखण्यात काही मजाच नव्हती, जी महाआघाडीत अनुभवायला मिळत आहे याचा साक्षात्कारही त्यांना झाला म्हणे!

आता राहिला प्रश्न मेट्रोचा. ती कुणाला हवी आहे हो! प्रत्येकाला सत्ता मात्र हवी आहे.

ती मिळवण्यासाठी मिठाचा वापर केला तर त्यात वाईट काय? आता काही म्हणतात, यात केंद्राने पडायला नको होते. अहो, का नाही मध्ये पडणार? शेवटी प्रश्न परिवाराने एकत्र बसून खाल्लेल्या मिठाचा आहे ना! मग सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी त्यांनी लावला एखादा फलक तर बिघडले कुठे? मिठाला जागणे यालाच तर म्हणतात. तरीही करोनामुक्त झालेल्या देवेंद्रभाऊंनी यात अजून उडी घेतलेली नाही. रोज मिठाच्या गुळण्या घेत त्यांचा सध्या अभ्यास सुरू आहे म्हणे! मी निवडलेली जागा बदलता काय असे म्हणत देशातील मिठागरांच्या सद्य:स्थितीवर त्यांचा अभ्यास सुरू आहे म्हणे! ते एकदा मैदानात आले की मग मिठाचे आणखी काही नवे अर्थ समोर येतीलच. तरीही त्यांचे एक चुकले.. जुन्या काळी लोक यात्रेला जायचे तेव्हा घरातले सोने शेजाऱ्याकडे ठेवून त्याला एक मिठाचा खडा खायला द्यायचे. उद्देश हाच की परत आल्यावर शेजाऱ्याने खाल्ल्या मिठाला जागत सोने परत करावे. सत्ता सोडताना देवेंद्रभाऊंनी हा माझा प्रकल्प, मी पुन्हा येईन तोवर सांभाळा त्याला असे म्हणत एक मिठाचा खडा हातावर ठेवला असता तर एवढे रामायण घडलेच नसते ना!