सावधान.. विश्राम.. चलो सब लाइन में खडे हो जाओ!..  नवी दिल्लीच्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या संकुलात ही आज्ञावली ऐकताच सर्व जण एका रांगेत उभे राहतात. ‘आय एम अ डिस्को डान्सर’च्या सुरावटीवर मुख्य प्रशिक्षक मिथुन चक्रवर्ती धरतीमातेला वंदन करून समोर अवतरतात. त्याच्या साथीला प्रभुदेवा, गोविंदा, जावेद जाफ्री अशी बॉलीवूडमधील एकापेक्षा एक खंद्या साहाय्यक मार्गदर्शकांची फौज! मिथुन सर्वामधील अंगार फुलवण्यासाठी अभिभाषण करतो – ‘‘धरतीमैय्या की कसम, इस बार ऑलिम्पिक मेडल अपनाही होगा.’’ गोविंदाही चेहऱ्याच्या आणि डोळ्यांच्या हावभावानेच ‘अखियोंसे गोली मारे’ असा इशारा करीत सर्वाना प्रेरित करीत असतो. प्रभुदेवा आणि जावेदच्या शरीराच्या हालचाली मात्र अविरत सुरूच..  कधी एकदा या ऑलिम्पिकेच्छू डान्सपटूंसह ठेका धरतो, असे त्यांना झालेले. मिथुन कर्णधाराला समोर बोलावतो.. ‘मै ऐसा क्यूं हूं’च्या सुरावटीवर ऋतिक रोशन शांतपणे सर्वाना सामोरा जातो- ‘‘लाइफ बहोत छोटी है दोस्तो, हमें देश के लिए कुछ करने का ये मौका मिला है..!’’ पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीसाठी ऋतिक नुकताच अमेरिकेच्या मायकेल जॅक्सन अकादमीत दोन महिन्यांचे विशेष प्रशिक्षण घेऊन आला. या संघात टायगर श्रॉफ, वरुण धवन, मलायका अरोरा, श्रद्धा कपूर, अमृता खानविलकर, मानसी नाईक यांचाही समावेश आहे. ‘आय एम अ स्ट्रीट डान्सर..’ हे गाणे लावायची आज्ञा देत गोविंदाने सरावाला प्रारंभ केला. संघनायक ऋतिकने टायगरला सूचना केली, ‘‘अबे टायगर पहले तू करके दिखा!’’ टायगरनं हिमतीनं पुढे सरसावत सुनावलं, ‘‘ये जो तेरा टॉर्चर है, वो मेरा वॉर्मअप है.’’ टायगरने दिल्खुलास नृत्य संपण्याआधीच वरुण घुसला आणि नाचायला प्रारंभ केला. ‘बूगी, वूगी’ असे ओरडत जावेदजींनी गाणे थांबवण्याचे आदेश दिले- ‘‘जब दो हाथोंसे टाली बज रही हो, तो बीच में मुँह नही घुसेडते बच्चे.. उंगलियाँ छप सकती है गालोंपे.’’!  वरुणने दिलगिरी प्रकट केली. नंतर अर्थातच सरावासाठी मलायका अरोराला मिथुनदांनी सूचना केली. ‘मुन्नी बदनाम हुई, डार्लिग तेरे लिए..’ गाणे सुरू झाले. पण दुरावलेल्या अर्जुन कपूरच्या आठवणीनं मलायका स्तब्धपणे उभीच राहिली. वातावरणाचे गांभीर्य समजून गाणे थांबवून घेत प्रभुदेवा पुढे गेला, ‘उर्वशी, उर्वशी, टेक इट इझी उर्वशी..’ मलायका लगेच सावरली आणि तिने विद्युल्लतेपेक्षाही वेगाने ठेका घेत प्रशिक्षकांना ऑलिम्पिक पदक निश्चितच आपले असेल, याची ग्वाही दिली. तोच, घडय़ाळाकडे पाहणाऱ्या अमृताकडे नजरेचा कटाक्ष टाकत जावेदने दरडावले, ‘‘अभी डान्स प्रॅक्टिस बहोत बाकी है. त्यामुळे मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा..’’ हे चालणार नाही. तिनेही ‘होय, सर’ म्हणत पुन्हा सरावाकडे लक्ष केंद्रित केले. एवढय़ात, उशीर झाल्याने पळतच मानसी नाईक अवतरली. मिथुनजींनी कारण विचारताच तिने सुरू केलं, ‘प्रॅक्टिसला यायला उशीर झाऽला, बघतोय रिक्षावालाऽ..’ इतका काळ शांत असलेल्या गोविंदाने ‘सायलेन्स प्लीज’ करीत शांतता निर्माण केली. ‘ऑलिम्पिकच्या आधी इंडियन ब्रेकडान्स प्रीमियर लीग सुरू करूया’ अशी घोषणा गोविंदा करीत असताना, ‘पॅरिस ऑलिम्पिकमधल्या ‘ब्रेकर्स’ या ब्रेकडान्स-आधारित खेळासाठी थांबण्यापेक्षा हे बरे’ अशाच सार्वत्रिक भावनेने वातावरणात आनंदीआनंद पसरला, ‘धूम मचाले, धूम मचाले’च्या ठेक्यावर सामूहिक सराव संपलादेखील!