वेगवेगळी वृत्तपत्रे वाचून सुचलेली निरीक्षणे एका वहीत नोंदवून ठेवणे हा तात्यांचा तसा जुना छंद. करोनाकाळात तर या छंदाला उधाण आलेले. टाळेबंदीच्या काळात तसेच ती उठवण्याचा भास निर्माण केल्यानंतर सरकारी सूचनांचा पाऊस पडायला सुरुवात झाली आणि तात्यांच्या नोंदवह्या पटापट संपू लागल्या. सुरुवातीच्या काळात तात्या ही निरीक्षणे त्यांच्या नेहमीच्या पार्कातील कट्टय़ावर सर्वाना वाचून दाखवायचे. नंतर सरकारी यंत्रणांनी या सूचनांमध्ये एवढा घोळ घालायला सुरुवात केली की त्याचा अर्थ लावताना तात्यांच्याच डोक्याचा फ्यूज उडू लागला. अलीकडे तर तात्या जाम वैतागलेले दिसतात. केंद्र म्हणते चित्रपटगृहे आणि मंदिरे सुरू करू, राज्य म्हणते नाही. या करोनाने घाबरण्याचेसुद्धा वेगवेगळे प्रकार विकसित केलेले दिसतात. त्यामुळे तात्यांची चिडचिड वाढलेली. त्यात भर पडली ती शेजारच्या नानासाहेबांनी केलेल्या कृतीची. देवदर्शनाशिवाय राहू शकत नसलेले नाना असह्य झाल्यावर वाहन काढून थेट कर्नाटकात गेले व मनोभावे दर्शन घेऊन परतले. पत्नीने मोडता घातल्याने तात्यांना जाता आले नाही. तीच गोष्ट व्यायामशाळांची, उपनगरी रेल्वेची, चित्रपटगृहांची, नाटय़गृहांची, आता पुढे तर शैक्षणिक संस्थांच्या बाबतीतही हेच घडणार असे दिसते. केंद्राने मान्यता द्यायची व राज्याने अडवणूक करायची.

‘अरे, हे चालवले काय? कशाचा सूड उगवताय तुम्ही आमच्यावर? म्हणजे मुंबईचा माणूस पुण्याला जाऊ शकणार पण बदलापूरला नाही. सरकारी बाबूंची डोकी आहेत की खोकी?’ तात्या तारस्वरात ओरडू लागले तसे स्कीममधले सगळेच धावले. त्यांची अवस्था बघून पत्नी तर घामाघूम झाल्या. मग सारेच तात्यांची समजूत काढू लागले. तुम्ही कशाला इतके मनावर घेता असाच साऱ्यांचा सूर. दीर्घकाळ मुक्काम ठोकणारा करोना अनेकांची मानसिक स्थिती बिघडवेल असे सर्वानाच आधी वाटले होते. तात्यांची अवस्था बघून सर्वाना त्याची आठवण झाली. तेवढय़ात कुणीतरी निरोप दिल्याने एक डॉक्टरही तिथे आले. तात्यांची दिनचर्या जाणून घेतल्यावर त्यांनी घरातल्या साऱ्या निरीक्षण नोंदवह्या फेकून देण्याचा आदेश दिला. झोपेच्या दोन गोळ्या देऊन ते निघून गेले, पण तात्यांची विमनस्क अवस्था काही जाईना. आता त्यांच्या मनात निर्माण होणारे प्रश्नच त्यांना छळू लागले होते. एकीकडे करोनासोबत जगायला शिका असे सांगतात व दुसरीकडे जगण्यासाठी काही व्यवस्थाच उभी राहू देत नाहीत, हे कसे? एका राज्यात एक सुरू तर दुसऱ्या राज्यात त्यावर बंदी हा काय प्रकार आहे? रस्त्यावर फिरा पण व्यायाम करायचा नाही, यात कसले आलेय गृहीतक? तुम्ही सांगितले, टाळेबंदीवर विश्वास ठेवा, आम्ही ठेवला. त्याचा फायदा झाला नाही हा आमचा दोष कसा? तुमच्या अपयशी ठरणाऱ्या उपाययोजनांची शिक्षा आम्हा सामान्यांना कशाला? केंद्राने लालूच दाखवायची व राज्याने वाकुल्या, हे कुठवर चालणार? ..असंख्य प्रश्नांनी तात्यांचा मेंदू पार शिणून गेला.

‘अरे, जगू द्या आम्हाला आमच्या पद्धतीने, वाचलो तर तुम्हाला मत देण्याच्या कामी येऊ आणि मेलो तर त्याचा दोष तुमच्यावर टाकणार नाही.’ तात्यांचे हे चढय़ा आवाजातले बोलणे ऐकून पत्नी घाबरल्या. त्यांनी तात्यांना थेट रुग्णालयात नेले. तिथे सर्वात आधी केलेली करोनाची चाचणी ‘निगेटिव्ह’ आली. तात्यांची पार्श्वभूमी जाणून घेतल्यावर डॉक्टरांनी निर्णय दिला. हे खरे ‘सरकारग्रस्त’!