थोडेथोडके नाही तब्बल तीनशे प्राणवायू प्रकल्प त्यांनी उभारलेत. शिवाय प्रत्येकावर वेळेत उपचार, औषधांचा पुरेसा साठा, गाव तिथे रुग्णवाहिका, तरीही मृत्यू झालाच तर कठडेबंद स्मशानभूमीची सोय. साथीच्या आजारात आणखी काय हवे? आता हे झालेले काम लोकांपर्यंत पोहोचवायचे तर प्रचार हवा! मग तो त्यांच्यावर अतोनात प्रेम करणाऱ्यांनी केला तर त्यात गैर काय? उगीच ते टूलकिटचे दुखणे त्यांच्यामागे कशाला लावता? ते योगी आहेत.. अशी माणसे निरपेक्ष भावनेने काम करत असतात. मग त्यांच्या कामाची प्रसिद्धी कुणी करत असेल तर त्यात त्यांचा दोष कसा? तुम्हाला गंगेतून वाहून जाणारी प्रेते दाखवायला मुभा आणि त्यांच्या समर्थकांनी थोडीफार काय त्यांच्या कामाला प्रसिद्धी दिली की लगेच तुम्ही आक्षेप घेणार? नाही नाही, हा दुटप्पीपणा आता चालणार नाही. काय गरज होती त्या निवृत्त सनदी अधिकाऱ्याला हे सर्व समोर आणण्याची? पेन्शन घ्यायचे व गप्प बसायचे ना! हा काडीबाज धंदा कशाला?  हे प्रचाराचे काम ज्यांनी ‘सेवाभावी’पणे हाती घेतले ते आधुनिक युधिष्ठिर आहेत हे ठाऊक नाही का या सर्वाना! असली ‘सत्यवादी’ माणसे चुकीचे वागूच शकत नाही यावर ठाम विश्वास आहे जनतेचा.. भले तुमचा नसला तरी! आणि बातम्या काय तर त्या टूलकिटवाल्या मनमोहनसिंहांना नोकरीतून काढले. सिंग असोत की सिंह, सारे मनमोहन इथून तिथून सारखेच. त्यांनी बोलू नये, हेच बरे. हा नवा मनमोहन सिंहसुद्धा, ‘माझी खामोशीच सर्व प्रश्नांची उत्तरे देईल’ म्हणतो. बघा, भाषा कशी सारखी आहे ती. मग अशा शांततावाद्यांना बाहेरचा रस्ता दाखवला तर समविचारी कंपनीचे चुकले कुठे? तरीही तुम्ही त्याचा बादरायण संबंध योगींशी जोडता. किती वेदना होत असतील त्या मठाधिपतींना? चेहरा रागीट दिसत असला तरी मनाने हळवे आहेत हो ते. मागे दिल्लीत किती ओक्साबोक्शी रडले होते. तिथूनच तर प्रेरणा घेतली अनेकांनी त्यांच्या या रूदनाची आणि केला तो प्रकार लोकप्रिय साऱ्या देशभर. काहीही झाले तरी ‘जनतेचे राजे’ आहेत ते. सामान्यांप्रती कळवळा हा स्थायीभाव आहे त्यांचा. मग त्यांची चांगली कामे  पोहोचायला नकोत का सर्वत्र?  त्यासाठी जल्पकांना नेहमीच्या ४० पैशांऐवजी प्रतिट्वीट दोन रुपये दिले तर एवढा गजहब? प्रश्न कार्यप्रसाराचा आहे हे तरी लक्षात घ्या!

तरीही समजले नसेल तर ही कथा ऐका..  अकबराकडे त्याच्या आवडीचे एक मांजर असते. कालांतराने ते फारच नासधूस करायला लागते. त्रस्त राजा त्याला जंगलात सोडण्याचा विचार बिरबलाकडे बोलून दाखवतो. तो त्याच्या लिलावाची कल्पना सुचवतो. राजा म्हणतो याची किंमत काय येणार? बिरबल सांगतो एक रुपया किंवा १० लाख. हे ऐकून राजाची उत्सुकता चाळवते. मग लिलाव सुरू होतो. सुरुवातीला कुणीही १० रुपयाच्यावर बोली लावत नाही. मग बिरबलाची माणसे गर्दीत शिरतात व हे मांजर गुप्तधनाचा शोध घेण्यात माहीर आहे अशी अफवा पसरवतात. लगेच लाखांची बोली लागायला सुरुवात होते व अकरा लाखात मांजर विकले जाते.

कळले ना तात्पर्य? लोकांनी प्रचार केला नसता, तर मांजराची किंमत वाढली असती का? तसेच हल्ली जनकल्याणकारी योजनांचे असते. प्रचार करावाच लागतो.  मग ४० पैशाचे दोन रुपये केले तर त्यात चुकले काय? किमान या प्रसाराच्या नावावर तरी लोकांचे भले होईल ना! असा सारासार विचार सोडून याला ‘योगींचा टूलकिट’ म्हणणे हा अपप्रचारच.. शुद्ध कांगावा.