कालच्याप्रमाणेच आजही सचिवांनी यादी साहेबांच्या टेबलावर ठेवली आणि सवयीप्रमाणे ते हात बांधून समोर उभे राहिले. साहेबांनी यादी उचलली. त्यांची नजर यादीवरून फिरू लागली आणि स्वत:शी दचकलेच ते. हेसुद्धा कालच्याप्रमाणेच झाले. त्यांनी सचिवांच्या तोंडाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले, तर सचिव महाशय निर्विकार उभेच. कालच्याप्रमाणे ते औपचारिकसुद्धा दचकले नव्हते. तेव्हा साहेबांनीच विचारले, ‘‘एवढे बदल करायचे? एकाच वेळी?’’ सचिव निर्विकारपणे म्हणाले, ‘‘अं? – करावेच लागतील. मागच्या आपल्या शासन निर्णयाच्या तीन-अ मध्येच म्हटले आहे तसे. परिस्थितीनुसार बदल हे करणेची परिस्थिती आल्यास त्या-त्या परिस्थितीस अनुसरून शासन निर्णयाच्या अधीन राहून बदल करावेत.’’ साहेब एवढे अभ्यासू, परंतु त्यांनीही मान वर करून पाहिले. तर सचिवांचे बोलणे तेथून म्हणजे डोक्यावरून चालले होते. त्यांनी पुन्हा अभ्यासू चेहरा केला. म्हणाले, ‘‘हं-! ठिकाय. परंतु आपण आधीच फूलप्रूफ योजना केली होती ना? – मग?’’ या योजनेवर आपण कसा रात्र रात्र जागून अभ्यास केला होता. किती बैठका घेतल्या होत्या. रात्रीच कशी ती जाहीर केली.. सारे साहेबांच्या नजरेसमोरून चमकून गेले. सचिव महोदय ढिम्मच होते. म्हणाले, ‘‘योजना तीच आहे. निकष आणि नियम किंचित बदलावे लागतील. म्हणजे तुम्हीच तसा आदेश दिला आहे.’’ साहेब वैतागले. ‘‘अहो पण, एक निकष बदला म्हटले मी.. तुम्ही तर यादीच ठेवलीय.’’ सचिव महोदय ढिम्मच निर्विकार. म्हणाले, ‘‘सर – आहे ना तो बदललेला निकष यात. बाकीची यादी नंतर बदलायच्या निकषांची आहे.’’ साहेबांनी पुन्हा यादीत लक्ष घातले. ‘‘अं-? हं! हं! पण नंतरही निकषांत बदल करावे लागतील?’’ सचिव म्हणाले, ‘‘तसा केंद्राचा जीआरच आहे साहेब. योजना फूलप्रूफ आहे आपली नोटाबंदीसारखीच, पण त्या वेळीही तसेच केले होते. सर, ५६ बदल केले होते तेव्हा. आपल्याला किमान ५-६ तरी करावे लागतील ना सर. ते केले नाही तर योजना अभ्यास करून जाहीर केली नाही असं व्हायचं सर. विरोधकांना काय तेवढंच..’’  ‘‘हं! हं! समजलं! – आपला अभ्यास दिसलाच पाहिजे. बदला हा निकष. बाकीचे निकष हळूहळू बदलता येतील. परिस्थितीनुरूप बदलणे यातच पारदर्शीपणा असतो. आणि असं करा, जरा आतापर्यंत बदललेल्या निकषांची आकडेवारी काढून ठेवा. आकडे फेकले तोंडपाठ की विरोधकांना गप्प करता येते. आपला अभ्यास दिसतो त्यातून.. ते महत्त्वाचे. काय-?’’