‘एका जटिल समस्येचा निवाडा कसा करावा या चिंतेत एकदा राजा भोज जंगलात फिरत असताना एका झाडाखाली त्याला काही मुले न्यायदानाचा खेळ खेळताना दिसली, म्हणून उत्सुकतेने राजा भोज तिकडे वळला. त्या झाडाखाली न्यायाधीश होऊन बसलेला एक मुलगा कितीही अडचणीच्या समस्यांना योग्य न्याय देत आहे असे दिसल्याने भोज राजाने त्याला आग्रहाने आपल्या दरबारी नेले आणि आपल्यासमोरील समस्येचा निवाडा करण्याची विनंती केली. पण जंगलाजवळच्या खेडय़ात राहणारे ते गुराख्याचे अडाणी पोर कमालीचे गोंधळले आणि पळून घरी आले. राजा दुसऱ्या दिवशी पुन्हा जंगलात गेला असता, त्याच झाडाखाली तेच गुराख्याचे पोर न्यायाधीश होऊन योग्य निवाडा करीत होते. राजा त्याच्यासमोर गेला आणि गुडघे टेकून त्याने आपली समस्या मांडली. गुराख्याच्या पोरानेही चुटकीसरशी ती समस्या सोडविली. न्याय मिळाल्याच्या आनंदात राजा दरबारात गेला आणि त्याने त्या दिवशी त्या समस्येचे समाधानकारक निराकरण केले!’.. ही गोष्ट आहे विक्रमादित्याच्या सिंहासनाची! त्या सिंहासनावर बसणाऱ्या कुणालाही अयोग्य निवाडा करताच येणार नाही, अशी त्याची पुण्याई होती, असे सांगणारी ही गोष्ट लहानपणी प्रत्येकानेच ऐकली असेल. त्या झाडाखाली विक्रमादित्याचेच सिंहासन पुरलेले होते, अशी त्यामागची आख्यायिका! असे म्हणतात की, नंतर अनेकांनी त्या सिंहासनाचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, पण ते सापडलेच नाही. पुढे न्यायव्यवस्थेला वळण लावणाऱ्यांनी त्याचाही नाद सोडून दिला असेही म्हणतात. आधुनिक काळातला न्याय कायद्याप्रमाणे चालतो. सामान्य माणसाला कायद्याविषयी आदर असतो की कायद्याचा धाक असतो, हे स्पष्ट झालेले नाही, पण कधी तरी राग अनावर झाला की तोच कायदा हातात घ्यावा असे त्यालाही वाटू लागते. पण कायद्याचे हात तर खूपच लांब असतात आणि सामान्य माणसाचे हात तोकडे. मात्र उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचे हात म्हणजे जणू कायदाच. तेव्हा रस्त्यावरील एखाद्या खोदकामाचा आवाज असह्य झाला म्हणून ते काम करणाऱ्या मजुरांच्या ‘कानाखाली मारावी’ असे न्यायमूर्तीना वाटले, तर त्यांनी तसे करण्यास काय हरकत? कायदा हातात घेणे सामान्य माणसाला जमत नाही हे खरे. पण ज्याचे हात मुळातच लांब असतात, त्याला कायदा हातात घेणे जमू शकते. शिवाय आजकाल एखाद्या कुणी आपल्या लांब हाताने कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला, तर त्याच्याविषयीही सामान्याला धाकयुक्त आदरच वाटू लागतो. आणि कायदा हातात घेणे ही सोपी गोष्ट नसल्याने तसे करणारा जो कुणी असेल, तो महान ठरू लागतो.. किती महान? सिंहासन गमावलेल्या विक्रमादित्यालाही हेवा वाटावा, एवढी!
संग्रहित लेख, दिनांक 21st Sep 2017 रोजी प्रकाशित
कायद्याचे हात, हातातील कायदा..
सिंहासन गमावलेल्या विक्रमादित्यालाही हेवा वाटावा, एवढी!
Written by लोकसत्ता टीम

First published on: 21-09-2017 at 03:08 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi articles on indian law system