हे नकारात्मक नतद्रष्टहो, चांगले काही पाहणार नाही, चांगले काही ऐकणार नाही, चांगले काही लिहिणार नाही, असा पणच केला आहे का तुम्ही? डोळ्यांत मोदीबिंदू का पडला आहे तुमच्या? कोणी काहीही बोलो – आणि काहीही म्हणजे काहीही बोलणारच ना लोक? अखेर सत्ता आहे आपली! – पण कोणी काहीही बोलो, तुम्हाला त्यातील वाईटच दिसणार. पहिल्यापासून तुमचे असेच आहे म्हणा. पण पूर्वीची – म्हणजे मो. स. पूर्वीची (नाही समजले ना? अहो, अच्छय़ा दिनांच्या कॅलेंडरातली कालगणना आहे ही! मो. स. पूर्वी म्हणजे मोदीसन पूर्वी! काय समजलेंत?) – तर मो. स. पूर्वीची गोष्ट वेगळी होती. तेव्हा कशावरही टीकाच करणे ही काळाची गरज होती. कारण तेव्हाची सगळी माणसे वाईटदुष्टच होती. पण आता कॅलेंडर बदलले आहे. कली बदलला आहे. नवा भारत उभा राहिला आहे. त्यास नवी दिशा देण्याचे काम आपले नवनवे नेते करीत आहेत. आजवर  त्यांचे विचार कोंडून ठेवले होते त्यांच्या-त्यांच्या कुंजामध्ये. परंतु आता बुलंद भारताचे हे बुलंद नेते गप्प बसणार नाहीत! ते बोलणार, उद्गारणार, प्रतिपादणार.. वेळप्रसंगी बरळणार! अहो काकवंशीयांनो, भगीरथ प्रयासांनी आमच्या नेत्यांच्या मेंदूंतील विचारगंगा आज तुमच्या डोक्यावर आदळवण्यात येत आहे. पण तुम्ही असे कद्रू की तुम्हास त्या गंगेच्या पवित्र जलाऐवजी त्यातील प्रदूषणच दिसते. कुठे फेडाल ही पापे? हे अभक्तांनो, देववाणीमध्येही तुम्हास खोट दिसावी?.. विप्लव देव. या राष्ट्रास पडलेले एक गोड स्वप्न. लालदैत्यसंहारक, त्रिपुराउद्धारक, राष्ट्रविचारक, बुद्धीचे सागर. ते सांगतात, की या देशात मो. स. पूर्वी हजारो वर्षांपासून इंटरनेट होते. महाभारतात इंटरनेट होते, तेव्हा त्यांना सांगायचे असते, की ते पाहा आणि त्यातच खूश व्हा. हे दु:खी आत्म्यांनो, तुम्हांस तो दिसणार नाही. ते जेव्हा सांगतात, की सिव्हिल इंजिनीअरांनी सिव्हिल सव्‍‌र्हिसमध्ये यावे. मेकॅनिकल इंजिनीअरांनी येऊ  नये, तेव्हा त्यावर टीका होते. येथेच चुकते तुमचे लोकहो. यामुळेच आज देशात कोटय़वधी डॉक्टर असूनही येथील आरोग्यसेवा कमकुवत राहिली आहे. हा देवविचार जर आपण आधीच जाणला असता, तर येथील पीएचडी डॉक्टर आज बेरोजगार राहिले नसते. खेडय़ापाडय़ातल्या रुग्णाईतांवर ते इलाज करीत फिरले असते. आम्ही तर म्हणतो, सिव्हिल इंजिनीअरांनी सिव्हिल कोर्टातसुद्धा प्रॅक्टिस केली पाहिजे. पण कितीही टीका झाली, अगदी प्रधानसेवकांनी येऊन सांगितले, की तोंडाचे कांडपमशीन करून मसाला देऊ  नका माध्यमांना, तरी आमचे नेते आता गप्प बसणार नाहीत.  पेशवाईतल्या साडेतीन शहाण्यांना एका झटक्यात पाणी पाजतील असे आमचे हे एकेक नेते. कोणी तरुणांना भजी तळून, कोणी पानपट्टी टाकून रोजगार कसा निर्माण करावा याचे ज्ञान देत आहे. कोणी ‘साली’ शेतकरी आत्महत्येची समस्या एका झटक्यात दूर करीत आहे. होय, शंकासुरांनो होय! आमच्या मध्य प्रदेशचे शेतीमंत्री बालकृष्ण पाटीदारांनी ही पाटी टाकलेली आहे विचारांची. आत्महत्येची कारणे केवळ आत्महत्या करणाऱ्यालाच माहीत असतात असे सांगून त्यांनी किती तरी चौकशी समित्यांचे काम एका मिनिटात करून दाखविले. अशा बृहस्पतींवर टीका करता तुम्ही? करा. जरूर करा. पण लक्षात ठेवा, हे नेते हेच आता या देशाचे भवितव्य आहे!!