अस्माकं बदरीचक्रं युष्माकं बदरीतरू:। बादरायणसंबंधात यूयम् यूयम् वयम् वयम्। अर्थात्- आमच्या गाडीला बोरीच्या लाकडाचे चाक आहे. तुमच्या दारात बोरीचे झाड आहे. तेव्हा तुमचा आणि आमचा बादरायण संबंध आहे. संस्कृत वाङ्मयातील एका चलाख गाडीवानाची ही कथा. एका गावात त्याला गाडी सोडायला जागाच मिळेना. अखेर त्याला एक वाडा दिसला. त्यात बोरीचे झाड होते. त्याने सरळ त्या झाडाखाली गाडी सोडली. वाडामालकाला प्रश्न पडला की, हे कोण बुवा पाहुणे? त्याने विचारले. तेव्हा त्या गाडीवानाने चलाखीने त्याच्याशी बादरायण संबंध जोडून टाकला. ही कहाणी आठवण्यास कारण म्हणजे आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी. अलीकडेच त्यांनी आसामशी असाच बादरायण संबंध जोडून टाकला. पूर्वी मी आसामचा चहा विकत असे. त्यामुळे आसामशी माझे खास संबंध आहेत, असे निवडणूक प्रचारसभेत सांगून तेथील चहा कामगारांची मने जिंकली. चहा आणि चाह अशा कोटय़ाही त्यांनी केल्या. याबाबत त्यांचा हात येथील पट्टीचे जाहिरातगुरूही धरू शकणार नाहीत हे मान्य करायलाच हवे. ‘हाती धरून झाडू तू संघकार्यालय झाडिलेसी’ असे तरुण मोदीजींचे एक छायाचित्र लोकसभा निवडणूक काळात बरेच गाजले. ते छायाचित्र ही फोटोशॉपची किमया असल्याचे नंतर अन्य कुणाच्या छायाचित्रानिशी स्पष्टही झाले. मोदीजींच्या चहाविक्रेता प्रतिमेबद्दलही तसेच काहीसे करण्याचा प्रयत्न झाला होता. मोदीजी रेल्वे फलाटावर चहा विकत असल्याचा कसलाही पुरावा नसल्याची धक्कादायक माहिती प्रभूंच्या रेल्वे मंत्रालयाने माहिती अधिकारात दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. असे असले तरी खुद्द मोदी यांचे विधान हाच त्याचा सर्वात मोठा पुरावा असल्याने त्यावर श्रद्धा ठेवणे देशवासीयांचे कर्तव्य ठरते व म्हणून आसामी मतदारांनीही मोदींचा आसामशी बादरायण संबंध असल्याचे मान्य करणे अत्यावश्यक ठरते. मनमोहन सिंग हे आसाममधून राज्यसभेवर निवडून आले असल्याने त्यांचे आणि आसामचे जितके घट्ट नाते आहे, तेवढाच मोदींचाही आसामच्या चहा कामगारांशी (ब्रूक)बॉण्ड आहे हे मानावेच लागेल. या आधी मोदींनी अशीच विधाने केली आहेत. त्या-त्या राज्यांत जाऊन मुंबई, हरयाणा, हिमाचल प्रदेश ही माझी दुसरी घरे आहेत, असे ते म्हणाले आहेत. त्यामुळे लिम्का बुकमध्ये त्यांची सर्वाधिक घरे असलेले पंतप्रधान अशी नोंद करण्याचेही घाटत असल्याची कुजकट चर्चा सुरू आहे. पण म्हणून त्यांचे आसामशी असलेले नाते खोटे ठरत नाही. किंबहुना या एका विधानामुळे जगभरातील अब्जावधी लोक मोदींचे नातेवाईक ठरले आहेत. शिवाय हे नातेसंबंधही आजचे नाहीत. तीन हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये चहाचे सेवन केले जात असल्याचे उल्लेख आहेत. किमान तेव्हापासूनचे हे नातेसंबंध आहेत. अजित डोवल संचालित परराष्ट्र खात्याने याची नोंद घेणे आवश्यक आहे. परराष्ट्र धोरणात चायचुस्कीचे संबंध अशी संकल्पना आणून नवे ऐतिहासिक ‘चायशील’ त्यांना निर्माण करता येईल. मोदींच्या चहामध्ये नक्कीच ही ताकद आहे. त्याशिवाय का त्याने निवडणूक काळात अवघ्या देशास उत्तेजना दिली होती. आजही ती कमी झालेली नाही. एकूण कॅफीन चहातील असो वा राजकारणातील, त्याचा परिणाम हा असा होतोच.