पुण्यात एका वेळेच्या भोजनाकरिता तब्बल पाच लाख पोळ्यांचा पुरवठा करण्यात येतो, हे वृत्त वाचून अनेकांच्या ओठांचे चंबू झाले, काहींच्या दातांखाली बोटे गेली, तर काहींच्या भृकुटय़ा उंचावल्या. पुण्यनगरीतील पुण्यपुरुषांनी त्याकडे नेहमीप्रमाणेच ‘हॅ:, त्यात काय विशेष?’ म्हणून दुर्लक्ष केल्याचेही वृत्त आहे. अर्थात पुण्यनगरीच्या पुण्यपालिकेच्या सभागृहातच ‘हॅ:, त्यात काय विशेष?’ हे ब्रीदवाक्य गुप्तशाईने लिहिलेले असल्याने आम्हांस पुण्यनगरकरांच्या प्रतिक्रियेचे काहीही विशेष वाटले नाही.  याचे कारण वेगळेच असून, ते थेट इतिहासाशी संबंधित आहे. आता शहर पुणे म्हटले की त्यातील कोणत्याही गोष्टीचा  संबंध हा थेट इतिहासाशीच असतो. त्या न्यायाने पुण्यातील या पाच लक्ष पोळ्यांचा संबंधही इतिहासाशी आहे. म्हणजे असे पाहा, की या पुण्यातील नाना पेठांतून एके काळी सहस्रच काय, लक्ष लक्ष भोजनाच्या पंक्ती उठलेल्या आहेत. त्यात वाढली जात ती ताटे. थाळ्या ही फार नंतरची, रेशनोत्तर कालखंडातील गोष्ट. त्या पंक्ती, त्यातील एका बसणी डझनावारी लाडूंचा फडशा पाडणारे लाडूसम्राट हे सर्व ध्यानी घेता जिज्ञासूंनी हिशेब करून पाहावा की तेव्हा किती लक्ष पोळ्या हाणल्या जात असतील? या पोळ्यांचा पुरवठा करण्यासाठी किती पाकगृहे ओव्हरटाइम करीत असतील? आहे काही अंदाज? आमच्या गाढ इतिहासप्रेमामुळे या अशा घटनांची लेखी नोंद झालेली नाही. अन्यथा ‘पार्सलच्या पोळ्यांना पुणेकरांची पसंती’ असे वृत्त देण्याची कोणाची काय बिशाद होती? अर्थात या वृत्ताची दुसरीही एक बाजू आहे व ती सवयीने आपण दुर्लक्षिली आहे हेही येथे नमूद करावयास हवे. ज्या पुण्यात पहिल्यांदा स्त्रीशिक्षणातून मुक्तीचे सुगंधी वारे भारतवर्षांत पसरले, त्याच पुण्यातून हे वृत्त येणे ही एक महत्त्वाची घटना आहे व तिचा संबंध पुन्हा थेट स्त्रीस्वातंत्र्याशीच आहे.  एखाद्या शहरात पोळ्यानिर्मितीच्या तब्बल ३५ कारखान्यांतील चिमण्या दिनप्रतिदिन धडधडत असणे ही बाब धादांत स्त्रीमुक्तीशीच निगडित आहे. या पाच लाख पोळ्यांनी या शहरातील कितीतरी महिलांची मुदपाकखान्यातील ओटय़ापासून सुटका केली आहे याचा अभ्यास खरे तर पालिकेने कंत्राट देऊन करावयास हवा. पुण्यातील रेस्तरां, हॉटेले, खानावळी यांच्या वाढत्या संख्येकडे पाहून या महान नगरीच्या खाद्यसंस्कृतीविषयी शेरेबाजी करणाऱ्यांच्या हे डोक्यातही येणार नाही, परंतु त्यांस हे सांगावयासच हवे की स्त्रीमुक्तीची वाटही पोटातूनच जात असते. ती अधिक सुकर करून देणाऱ्या खाद्यपानगृहवाल्यांची, त्यातही खासकरून पोळीभाजी केंद्र व्यावसायिकांची नोंद खचितच खाद्येतिहासात होईल याविषयी अमुच्या मनी शंका नाही. पुण्यात पावलोपावली खानपानगृहे नसती, तर वीकेण्डाचे डिनर हॉटेलात ही नूतन खाद्यसंस्कृती येथे रुजून संपूर्ण शहर हेच बादशाही खानावळीसम भासले असते का? आणि ती रुजली नसती तर स्त्रियांस किचनमुक्ती घडली असती का? तेव्हा या सर्व गोष्टींचा  विचार करूनच पोळ्यांच्या या वृत्ताकडे पाहिले पाहिजे. किमान त्याकरिता आपण पुणेकरांना हसता तरी कामा नये. किंबहुना आज या पुण्यवंत पुण्यनगरीत जे घडत आहे तेच उद्या महाराष्ट्रातील नगरानगरांत घडणार आहे, ही पुणेरी काळ्या पाटीवरील पांढरी रेघ आहे.