संधी केव्हाही समोर उभी राहील आणि दार ठोठावेल. त्या वेळी आपण झोपलेले किंवा बेसावध असू नये म्हणजे झाले! नाही तर आपलाही परेश रावल होऊ शकतो. या बहुगुणी अभिनेत्याला राजकारणातल्या संधी अशाच चकवा देत आहेत. भाजपचे सरकार सत्तेवर आले त्याला तीन वष्रे होऊन गेली. त्याच्या किती तरी अगोदर, परेशभाईंनी आपल्या लेखणीला धार काढून मोदीस्तुतीची स्तोत्रे ट्विटरमाध्यमावर रचिली होती. कधी कधी तर त्यांचा एवढा विक्रम घडला की, परेश रावल यांना देशवासी जनता ‘भाजपचे दिग्विजयसिंह’ असेही म्हणू लागली. खरे म्हणजे, हे जरा जास्तच होते. असेलही घसरली कधी परेशभाईंची लेखणी, निसटले असेल उत्साहाच्या अतिरेकात लेखणीचे भान आणि पडलाही असेल विसर सामाजिक सभ्यतेचा.. म्हणून लगेचच दिग्विजयसिंह वगरे म्हणणे हा त्या दोघांचाही अपमानच ठरतो. अशी माणसे खरे तर, समर्पणवृत्तीचा चालताबोलता आदर्श असतात. त्यांची लेखणी, त्यांचे विचार केवळ ज्यांच्या चरणी स्वत:स वाहून घेतलेले असते त्यांच्यासाठीच झिजत असतात. त्यामुळे त्यांच्या लेखणीमागील किंवा विचारामागील निखळ स्वामिनिष्ठा लक्षात घेतली, तर कुणीही या दोघांवरही टीका करणारच नाही. पण राजकारण वाईटच असते. दिग्विजयसिंहांना त्यांच्या योग्यतेनुसार पक्षाने स्थान तरी दिले होते. परेशभाईंवर मात्र, अपार निष्ठा दाखवूनही सातत्याने अन्यायच होत आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून मोदीस्तुतीचा अखंड जप आणि विरोधकांवर यथेच्छ लाथाळ्या झाडूनही परेशभाई हे केंद्रीय मंत्रिपद अथवा कोणत्याही अन्य पदापासून उपेक्षितच राहिले आहेत, याचे त्यांच्या गुणांची कदर असलेल्या कुणासही वाईटच वाटेल. परेशभाई ही एक समजूतदार असामी आहे. यावर मतभेद असू शकतात, हे माहीत असूनही हे मत धाडसाने मांडावे लागते; कारण ट्विटरसारख्या माध्यमावरून जेव्हा ते एखादा अभिरुचीहीन उल्लेख करतात, तेव्हा त्यावरील प्रतिक्रियांची कदर करण्याचा दिलदारपणा त्यांच्याकडे आहे. आता ‘चायवाला’ या टीकेवर उत्तर देताना त्यांच्यासारख्या निष्ठावंताचे रक्त उसळले नसते, तरच नवल! परेशभाईंनी लगोलग

‘बारबाला’ असा खणखणीत जबाब देऊन टाकला आणि काही वेळाने त्यांच्या लक्षात आले की काही तरी चुकले.. मग त्यांनी ते ट्वीट रद्द केले, वर दिलगिरीही व्यक्त केली! इथे परेशभाई दिग्विजयसिंहांपेक्षा सरस ठरतात; पण मुद्दा तो नाही. एवढी वष्रे अविरतपणे स्तुतिस्तोत्रे गाऊनही, त्यांच्या पदरात मात्र काहीच भरघोस पडत नाही, हा त्यांच्यावर अन्याय आहे, हेच खरे! याउलट, अनुपमजी पाहा.. त्यांना एफटीआयचे अध्यक्षपदही मिळाले. परेशभाईंची एक संधी तेव्हा हुकली होती. आता पुन्हा संधी हुकू नये, यासाठी त्यांनी तयार राहिले पाहिजे. त्यासाठी मोदींना गौतम बुद्ध म्हणा, सरदार पटेलांचा अवतार म्हणा आणि विरोधकांवर तुटून पडा! त्यांना वानर म्हणा आणि शब्द मागेही घ्या.. परेसभाई, तमेपण मळसे मळसे!