अखिल आंग्ल वृत्तरंजनवाहिन्यांच्या प्रचंड म्हणजे सुमारे साडेतीन टक्के रसिक प्रेक्षकांमध्ये जगविख्यात असलेले ज्वलज्जहाल राष्ट्रपत्रवीर, वृत्तपीयूषाचे अर्णव जे की अर्णब गोस्वामी यांच्यावर आज जणू आकाशस्थ देवताही अभिनंदनाचा वर्षांव करीत आहेत. एरवी मुंबईत पाऊस येण्याचे तसे काय कारण होते? वरुणराजाचे माहीत नाही, परंतु भारतमातेच्या सुपुतांचे कोटीकोटी कंठ मात्र गोस्वामीजी यांच्या अभिनंदनाने एक तर कलकल करीत आहेत किंवा दाटून आले आहेत. प्रसंगच तसा आहे. अगदी देवांनाही दुर्लभ अशी एक गोष्ट गोस्वामीजी यांना परवाचे सुदिनी लाभली. त्यांस चक्क महामहीम न. दा. मोदी (पंतप्रधान, भारत सरकार) यांची याचि देही याचि डोळा मुलाखत घेण्याची संधी मिळाली. वस्तुत: मोदीजी तसे कोणा पत्रकारूनारूच्या हाती न येणारे. ते एक तर फारसे बोलतच नाहीत. तशात पत्रकारूनारूंशी तर नाहीच नाही. हे लोक म्हणजे शुद्ध पत्रगेशा. त्यांस कां कोणाचे चांगले काही दिसते? अशा लोकांशी अट्टीकट्टी बाराबट्टी केलेलीच चांगली, असे त्यांचे मत. तेव्हा ते बोलतच नाहीत. एवढय़ात कोणी त्यांना बोलताना ऐकले आहे? ते फक्त मन की बात करतात. कधी नभोवाणीवरून, तर कधी सभांमधून. कां की बोलण्यापेक्षा काही करून दाखविण्यावरच त्यांचा अटल विश्वास आहे. असे असताना व असंख्य पत्रकारूनारू त्यांच्यासाठी गळ टाकून बसले असताना त्यांची मुलाखत मिळविणे हे ऐतिहासिकच कार्य. खुद्द गोस्वामींनीही त्या ऐतिहासिकतेचा डंका पिटलाच. (त्यात नंतर तथ्यांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले, परंतु वृत्तरंजनकारांना तथ्यांचे रोजी सात खून माफच असतात!) बरे ही काही साधी मुलाखत नव्हती. नदाजी नेहमीच मन की बात करतात. तेव्हा आता त्यांच्या अंतर्मनाला हात घालणे भाग होते, पण गोस्वामींनी ते बरोब्बर साधले. त्यांची ती कलाकारी ही आता इतिहासाच्या पानांवर (कदाचित गोस्वामींच्या हातातील पेन्सिलनेच) नक्की लिहिली जाईल यात शंका नाही. त्यांनी काय केले, तर मोदीजींच्या अंतर्मनात घुसून आधीच सगळी उत्तरे जाणून घेतली आणि मग एकदा उत्तरे काय असणार हे माहीत असल्यावर अत्यंत खोचक, अडचणीत टाकणारे प्रश्न विचारणे हा तर गोस्वामींच्या डाव्या हाताचा खेळ. त्यांनी मग, तुमचे परराष्ट्र धोरण किती गडे छान आहे, तुमच्या काळात कसा ना एकही घोटाळा झालेला नाही असे परखडपणे विचारून मोदीजींना भंडावूनच सोडले. पण मोदीजीही या मुलाखतीत छानच बोलले. त्यांचे एकेक विधान, खास करून रघुराम राजनांवरून त्यांनी काही रजकांना दिलेल्या कानपिचक्या हे म्हणजे सार्वजनिक जीवनातील टेन कमांडमेन्टमध्येच दाखल होईल. मोदीजींनी राजनांवरील टीकेबद्दल जी नापसंती व्यक्त केली, ती तर राजकारण्यांहून पत्रकारांनी शिरोधारी घ्यावी अशीच होती. ज्यांनी ही गोडपरखड गोस्वामीकृत मुलाखत पाहिली नाही त्या दुर्भाग्यांनी, विशेषत: पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी ती नक्कीच पाहावी. त्यातून बाकी काही नाही, पण त्यांना प्रसिद्धी खात्यातील कामकाज कसे चालते हे तरी समजू शकेल.