राज्यसभा म्हणजे संसदेतील वरिष्ठ सभागृह. त्याने राज्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे, आशीर्वाद द्यावेत, ही आणि एवढीच अपेक्षा. त्यापलीकडे त्यांनी राज्यकारभारात दखल देऊ नये. कारण अखेर राज्यसभेचे सदस्य म्हणजे काही लोकांचे थेट प्रतिनिधी नव्हेत. त्या अर्थाने ते लोकसभा सदस्यांहून कनिष्ठच. लोकसभेतील एखादा मॅट्रिक अनुत्तीर्ण वा तिहार-ग्रॅज्युएट सदस्यही राज्यसभेतील येल पदवीधारकाहून वरिष्ठ गणला जातो. कारण त्याच्यामागे मतदार बंधुभगिनींचे पाठबळ असते. राज्यसभेने आपली ही पायरी ओळखून वागण्याची आवश्यकता असते. परंतु अलीकडच्या काळात वरिष्ठांच्या या सभागृहाला आपल्या दर्जाचा विसर पडला आहे. ते केवळ लोकसभेने मंजूर केलेल्या विधेयकांच्या मार्गातील अडथळाच बनत आहे असे नव्हे, तर त्याने भारताचा विश्वगुरुत्वाकडील प्रवासच खंडित केला आहे. हे थांबवायचे असेल, तर त्याकरिता खरेतर हे सभागृहच बरखास्त करून टाकण्याचा उपायच रामबाण ठरला असता. मात्र त्याआड राज्यघटना येत असल्याने तो मार्ग काहीसा अवघड आहे. त्याऐवजी अन्य काही उपाय करता येतील. या सभागृहात राष्ट्रपती केंद्र सरकारच्या सल्ल्याने काही सदस्यांची नियुक्ती करीत असतात. त्यांची संख्या वाढवून हे संपूर्ण सभागृहच राष्ट्रपती नियुक्त सदस्यांचे केले तर ते चालू काळात अत्यंत योग्य व चालू लोकशाहीस धरूनच होईल. येथे प्रश्न असा उपस्थित होईल, की राष्ट्रपतींना केंद्राने कोणत्या व्यक्तींची नावे राज्यसभा सदस्यपदासाठी सुचवावीत? यावर अनेकांची अनेक मते असू शकतील. परंतु याचे उत्तर खुद्द केंद्र सरकारनेच कालच्या बुधवारी देऊन टाकले आहे. हे उत्तर दडले आहे डॉ. प्रणव पंडय़ा यांच्या नियुक्तीमध्ये. त्यांच्यापूर्वी केंद्र सरकारच्या शिफारशीवरून राष्ट्रपतींनी सुब्रह्मण्यम स्वामी, नरेंद्र जाधव, नवज्योतसिंग सिद्धू, सुरेश गोपी, स्वपन दासगुप्ता आणि मेरी कोम यांची राज्यसभेवर नियुक्ती केली. अभिनेत्री रेखा, सचिन तेंडुलकर यांच्याप्रमाणेच या सर्वाच्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा देशास होईल यात शंका नाही. परंतु त्यातही सर्वोत्तम नाव आहे ते डॉ. प्रणव पंडय़ा या ६५ वर्षीय महापुरुषाचे. ते हरिद्वारातील ऑल वर्ल्ड गायत्री परिवार या संस्थेचे प्रमुख आहेत. ध्यानाच्या माध्यमातून मनुष्यप्राणी आणि भूमाता यांच्यातील संवाद प्रस्थापित करून जगामध्ये ‘रिदम’ अर्थात लय निर्माण करून सर्व दु:खांचा नाश करणे हे त्यांचे एक ध्येय आहे. प्राचीन ऋषी हेच काम करीत असत असे मानले जाते. तेव्हा त्या अर्थाने पंडय़ा हे ऋषीच आहेत. त्यांच्या या कामाने प्रभावित होऊन मोदी सरकारने त्यांना उन्नत भारत अभियानात सहभागी करून घेतले असून, सध्या ते आयआयटी दिल्लीसमवेत ग्रामीण भारताच्या उत्थानाचे काम करीत आहेत. अशा रीतीने अध्यात्म आणि विज्ञान भारतात आता एकत्र नांदू लागले आहे. ही नमोक्रांती सर्वच पातळ्यांवर होण्याची आवश्यकता असून, त्यादृष्टीने राज्यसभा हे अशा ऋषींचा आश्रम व्हावा, असे खऱ्या देशभक्तांचे हार्दिक मत आहे. आज समाजात असे अनेक ऋषी आहेत. उदाहरणार्थ रामदेवबाबा, श्रीश्री रविशंकर, प. पू. आसारामबापू, अनिरुद्धबापू वगैरे वगैरे. या सर्वाना वरिष्ठ सभागृहावर घेतले तर ते प्राचीन भारतीय संस्कृतीस धरूनच होईल, यात काही शंका नाही.