‘अच्छे दिन’ हा ‘चुनावी जुमला’ आहे असे आपले नेते कितीही सांगत असले, तरी ते खरे नाही. अच्छे दिन खरोखरीच अस्तित्वात असतात आणि त्यांचे थेट ‘लाभार्थी’देखील असतात. आपल्याकडे आहे त्याहून अधिक काही तरी प्राप्त करणे ज्याला जमले, त्याला ‘अच्छे दिन’ लाभले असेच म्हणायला हवे! आज भाजपच्या मार्गदर्शक मंडळात असलेल्या नेत्यांनी दोन दशकांपूर्वी तेच स्वप्न पाहिले होते. फक्त तेव्हा त्याचे नाव ‘रामराज्य’ असे होते. नव्या सरकारने अनेक जुन्या योजना नव्या नावाने अमलात आणल्या त्या सत्ताप्राप्तीनंतर.. त्याआधीच, रामराज्य नावाची संकल्पना अच्छे दिन या नव्या नावाने लोकप्रिय केली. त्यामुळे वास्तवात असंख्य लोक केवळ हातावर हात घेऊन अच्छे दिन धुंडाळत बसले असले, तरी ते प्रत्यक्षात पाहण्यासाठी स्वत:ला काही तरी करावे लागते, याचा मात्र त्यांना विसर पडला. ज्यांना हातपाय हलविण्याची संधी मिळाली, त्यांनी ते अच्छे दिन स्वत:समोर खेचून आणले. एकीकडे बेरोजगारीने ग्रासलेला युवा वर्ग आंदोलने करीत आपल्या निराशेला वाट करून देत असताना, राज्याच्या कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष असलेल्या पदाधिकाऱ्याने स्वकर्तृत्वाच्या बळावर अच्छे दिन स्वत:कडे खेचून आणले हे पाहता, अच्छे दिन मिळविण्यासाठी हातपाय हलवावे आणि डोकेदेखील चालवावे लागते हे सिद्ध झाले आहे. कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष राम खच्रे यांनी स्वत:च स्वत:च्या सहीने स्वत:स पदोन्नती देणारा आदेश २०१६ च्या सप्टेंबरात काढला, पदावर हक्कप्रस्थापित केला आणि कायद्यातील तरतुदी वाकवून स्वत:च्या शिरावर राज्यमंत्र्याच्या दर्जाचा राजमुकुटही चढवून घेतला. या कर्तबगारीला महाराष्ट्रात तोड नाही.

असे अधिकारी आणि त्याच्या उभ्या कर्तबगारीबद्दल अनभिज्ञता दाखवीत कानावर हात ठेवणारे मंत्री ज्या ठिकाणी जन्म घेतात, त्या ठिकाणी ‘अच्छे दिन’ प्राप्त करून ‘लाभार्थी’ होणे अवघड नाही. लहानसहान मागण्यांसाठी जिवाला त्रास देत उन्हातान्हात आंदोलने करणारा बेरोजगार तरुणवर्ग पाहिला, की या कर्तबगारीचे महत्त्व आपोआपच अधोरेखित होते. राम खच्रे यांनी स्वत:चे असे रामराज्यच कृषी खात्यात स्थापन केले आहे. शेवटी, रामराज्य ही कल्याणकारी व्यवस्थेची संकल्पना आहे. राम खच्रे यांच्या रामराज्यात त्यांचे कल्याण झाले आहे. आता कृषिमंत्र्यांना त्याबद्दल काहीच कल्पना नाही, ही बाब अलाहिदा! सरकारने अशा लहानसहान बाबींत लक्ष घातलेच पाहिजे, ही अपेक्षा गरच असते. सरकारला अस्तित्वाची कसरत करण्याचा मोठा व्याप पाठीशी असताना, कुणी स्वत:च आपली नियुक्ती करून स्वत:स राज्यमंत्र्याचा दर्जा प्राप्त करून घेऊ पाहात असेल, तर त्यामुळे सरकारी व्यवस्थेतील फायलींच्या प्रवासाचे किती तरी फाटे टळून तो सहज सोपा होऊन जात असतो. राम खच्रे यांनी सरकारी यंत्रणेतील अनेकांना आपापले रामराज्य कसे स्थापन करता येऊ शकते याचा वस्तुपाठ घालून दिला आहे. सरकार कानावर हात ठेवून बसले आहे, तोवर ज्यांना ज्यांना शक्य आहे, त्यांनी कायद्याचा बारकाईने अभ्यास करून, अडसर नाही ना याची खात्री करून घेऊन  स्वत:च्या पदोन्नतीचे आदेश काढून घेऊन लवकरात लवकर त्या पदाचा ताबा घेतल्यास, महत्त्वाची पदे तातडीने भरली जातील आणि रिक्त पदांपायी येणारा धोरणलकवा टाळणे सोयीचे होईल. मुख्यमंत्री आणि संबंधित खात्यांचे मंत्री यांनी केवळ ‘मला काहीही माहिती नाही’ असा आशीर्वाद द्यावा, बाकी पदोन्नती आणि नेमणुका आपल्या आपण होत राहतील!