बाबा रामदेव सर्वाचेच आहेत याबद्दल आमच्या मनात कधी म्हणजे कधीही शंका नव्हती. तरीही सोलापूरमध्ये रामदेव यांनीच जे जगप्रसिद्ध स्पष्टीकरण दिले, त्याचे स्वागत केलेच पाहिजे. आम्ही शनिवारपासून खासगीत ते करीतच होतो, पण जाहीरपणेसुद्धा स्वागतच केले पाहिजे. हे झाले एक कारण. दुसरे म्हणजे, रामदेव बाबांच्या स्पष्टीकरणानंतरही नाके मुरडली जातील आणि भिवया वर होतील.. अशाने आपण आपल्याच सेल्फीसारखे दिसू लागतो हे या टीकाकारांच्या ध्यानीही येणार नाहीच; पण मुद्दा तो नाही. रामदेव यांच्या स्पष्टीकरणानंतर आता बाकीच्यांनी विनम्रता अंगी बाणवायला हवी, हे सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच. बाकीच्यांकडे वळण्यापूर्वी रामदेव यांचे स्पष्टीकरण म्हणजे काय, हे थोडक्यात समजावून घेऊ. सोलापूरच्या योग शिबिरासाठी बाबा तिथे आलेले असताना पत्रकार परिषद झाली.  ‘हित्तं बोलून टाका’ किंवा ‘हिंगे हेळबिडु’ पद्धतीचा प्रश्न याच नगरीतून येतो, तसा तो आला. संघ-भाजपबाबत आपण पक्षपात का करता, अशा अर्थाचा तो थेट प्रश्न. बाबांनी त्याला खुलासेवार उत्तर दिले. ‘मी फक्त भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नाही तर सर्वपक्षीय समर्थक आहे. कोणत्याही एका राजकीय पक्षाशी बांधील नाही,’ हे ते जगप्रसिद्ध स्पष्टीकरण. ‘राहुल गांधींनी त्यांच्या अमेठीत शिबिराचे निमंत्रण दिल्यास तेथेही जाईन’ हे शब्द तर रामदेव यांच्या महानतेची खूण! रामदेव बाबांनी ते उद्गार काढले, आणि भारतवर्षांची गरिमा वाढली. शिवाय विरोधकांना- म्हणजे ‘कोणत्याही एका पक्षा’च्या विरोधकांनादेखील त्यांच्या जबाबदारीची जाणीव बाबांनीच दिली. एक तर, रामदेव यांच्यावर टीका म्हणजे मोदी सरकारवरच टीका, असे छुपे आणि चोरटे समाधान मिळवण्याचा मार्ग आता बाबांनीच बंद केला आहे. दुसरे असे की, चोरटे समाधान मिळवण्याऐवजी करायचे काय, हे रामदेव यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. रामदेव बाबांनी २०१२ साली जसा योग शिबिरांचा धडाका लावला होता, तसा याही वर्षी लावला आहे. त्या वेळी भाजप हा केंद्रात आणि महाराष्ट्रातही सत्ताधारी पक्ष नव्हता. लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने २०१२ मध्येच सुरू केली हे खरे असले तरीही रामदेव बाबांचा करिश्माच असा की, भाजपचे स्थानिक पदाधिकारी म्हणा, आमदार म्हणा, त्याही वेळी रामदेव यांच्या स्वागताला येत असत, शिबिराच्या मंचावरही हजेरी लावत. आता भाजप सत्तेत आहे. पण रामदेव यांच्याप्रति असलेली विनम्रता या पक्षाने सोडलेली नाही. अगदी २०१८ सालातही, जालन्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रपुरात नक्षलवाद्यांच्या कर्दनकाळ पूनमताई महाजन यांनी, तर सोलापुरात राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले.  हे सारे माणूस विनम्र असतो याचे द्योतक आहे. ‘२५ वर्षे भाजपचेच राज्य’ असे २०१४ मध्ये केलेले भाकीत अमित शहा यांनी राष्ट्रीय अध्यक्ष (भाजपचे) म्हणून इतकी कारकीर्द झाल्यानंतरही मागे घेतलेले नाही. तेव्हा अमेठीतल्या अमेठीत उरलेली २० वर्षे काही काम करायचे असेल तर काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांनी आधी रामदेव यांच्यापुढे विनम्र व्हावे, हे बरे. तशी संधी बाबांनीच तर सोलापुरातून दिली आहे.