देशाने जे पाहिले आणि अनुभवले ते शीर्षस्थ नेत्यांना पाहताच आले नाही, इतकेच काय ते घडले. त्याचा इतका कशाला बभ्रा करावा? नाही पाहता आले, त्याचा एवढा कशाला बाऊ करावा? शिवाय, ग्रहण पाहणे हे काही शीर्षस्थ नेत्यांचे घटनात्मक कर्तव्य नाही. तेव्हा राज्यघटनेचा कुठेही भंग झालेलाच नाही आणि कर्तव्यात कसूर करतील तर ते शीर्षस्थ नेते कसले? कर्तव्यात आपण जनसामान्यच कसूर करू शकतो.. नाही ना खरे वाटत? मग तुम्हीच शहानिशा करून पाहा.. विचारा आपल्या सहप्रवाशांना किंवा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरच भेटणाऱ्या दूरच्या आप्तेष्टमित्रांना.. ‘‘गुरुवारी देशभर दिसले, ते तुम्ही पाहिले का?’’

बहुतेकांना कळणारच नाही की नेमके काय दिसलेले नाही. प्रश्नच कळणार नाही त्यांना! बरे, तुम्ही त्यांना विचारलेला प्रश्न साधाच आहे, तो काही देशापुढला प्रश्न वगैरे नाही.. काल जे देशभर दिसले, ते पाहिले की नाही एवढा साधा प्रश्न.. तरीही कळत नाही? काय म्हणावे याला! अशांना खरे तर ‘कर्तव्यच्युत’ अशी सभ्य  आणि संसदीय शिवी हासडणेच अगदी योग्य; पण हे असे सामान्यजन आपलेच नातेवाईक असतात. आता दूर असले आणि फक्त व्हॉट्सॅपादी समाजमाध्यमांवरच गाठीभेटी होत असल्या तरी आपलेच आप्तेष्ट असतात, म्हणून गप्प बसायचे इतकेच. पण विरोध व्यक्तीला नसून प्रवृत्तीला असला, तर तो सभ्य संसदीय भाषेत व्यक्त करावाच लागेल.

त्यापुढली पायरी म्हणजे व्यक्ती, प्रवृत्ती असा शब्दच्छल करून प्रवृत्तीला ठेचून काढण्यात आनंद न मानता, व्यक्तींना स्पष्ट आणि नेमकी माहिती देऊन शहाणे करणे. तेव्हा ‘देशभर काल दिसले ते तुम्ही पाहिले का?’ हा प्रश्न ज्यांना खरोखर कळणार नाही, त्यांना नेमके काय पाहण्या-न पाहण्याबद्दल हा प्रश्न आहे, याची माहिती आपापल्या आप्तेष्टांना आपापल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून द्यावी लागेल. तोवर काही अतिउत्साही लोकांनी ‘मंदी काही काल नाही आलेली’.. किंवा ‘उत्तर प्रदेशात पोलीसच वाहने फोडताहेत हा व्हिडीओ खरा कशावरून?’ अशी उत्तरे जरी घाईघाईने देऊन टाकलेली असली तरीही शांत राहून, आपला प्रश्न ‘सूर्यग्रहण’ या विषयाबद्दल होता याची माहिती द्यावी लागेल.

आता वातावरण निवळलेले असेल! ग्रहण गुरुवारी सकाळी भारतभरातून दिसू शकत होते; महाराष्ट्रात ते खंडग्रास, तर दक्षिणेतील काही ठिकाणी कंकणाकृती ग्रहण म्हणून दिसले; मात्र अनेक शहरांमध्ये आकाशात ढगांचीच दाटी असल्याने खराब वातावरणामुळे ते दिसू शकले नाही. त्याबद्दल आपला प्रश्न होता हे सर्वानाच कळेल..

कदाचित दूरच्या एखाद्या अमेरिकास्थ आप्ताला या प्रश्नामुळे ‘‘धिस टाइम आम्ही इंडियातला हॉलिडे मिस केला.. नाही तर मीपण पाहिलं असतं’’  –  अशासारखी हळहळ मनापासून व्यक्त करण्याची संधी मिळेल.. पण या झाल्या नैमित्तिक प्रतिक्रिया.

थोडक्यात काय तर, प्रश्न नेमका काय होता याची जाणीव साऱ्यांना होईल आणि वातावरण निवळेल. आपापल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर जे होऊ शकते, ते इतकेच.

इथे शीर्षस्थ नेत्यांचा काय संबंध, असा प्रश्न अनेकांना पडेल. काही जण ‘हे शीर्षस्थ नेते कोण?’ अशीही पृच्छा करतील. त्यांना सांगावयास हवे की शीर्षस्थ नेते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीच. त्यांना ग्रहण पाहायचे होते, पण कोणत्याच चष्म्यातून ते दिसेना. कारण दिल्लीचे आभाळ काळवंडलेले होते. ढगांच्या त्या दाटीवर उपाय म्हणून मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट कोळिकोडहून ग्रहणाची दृश्ये पाहिली. याविषयीच्या एका साध्याशाच, व्यक्तिगत ट्विप्पणीतून बभ्रा किंवा बाऊ न करता, जनसामान्यांना (नागरिक असलेले आणि नसलेले, दोघांना) ग्रहण पाहण्याच्या विज्ञाननिष्ठ कर्तव्याची जाणीव त्यांनी करून दिली!