पतंगराव कदमांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवरील पोटनिवडणुकीत मतदारांची मन की बात ओळखून सर्व राजकीय पक्षांनी सहमतीने सहानुभूतीचा उमेदवार निवडला व राजकारणाच्या सध्याच्या तथाकथित बजबजपुरीतही एक नवा, वेगळा आदर्श निर्माण केला. भाजपने रिंगणात उतरविलेल्या उमेदवाराचे नाव ‘संग्रामसिंह’ असले, तरी ‘विश्वजीत’ नावाच्या उमेदवाराच्या पाठीशी असलेले ‘सहानुभूतीचे बळ’ पाहता, संग्रामसिंहास रणांगणात पायचीत व्हावे लागण्यापेक्षा माघार घेऊन विश्वजीत हे नाव  सार्थ करण्यातच राजकीय शहाणपण आहे हे ओळखून भाजपने संग्रामसिंहांना रणांगणातून माघारी बोलाविले, ही निवडणुकीच्या राजकारणातील सध्याच्या काळातील सर्वोत्तम चाल म्हणावी लागेल. आपला लोकप्रतिनिधी कोण असावा, विधिमंडळात आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व कोणत्या राजकीय पक्षाने वा व्यक्तीने करावे हे ठरविण्याचा व त्यानुसार मतदानातून त्या व्यक्तीस निवडून देण्याचा अधिकार खरे म्हटले, तर मतदारांचा असतो. पण राजकीय पक्ष समंजस असतील तर किती तरी किचकट प्रक्रिया सोप्या होऊन जातात. तेच पलूस-कडेगाव मतदारसंघात  घडले. संग्रामसिंहांना माघारी घेऊन विश्वजीत कदम यांना बिनविरोध विजयी करण्याच्या राजकीय पक्षांच्या सामूहिक संकल्पांतून             राजकीय उदात्त भूमिकेचे दर्शन तर देशाला घडलेच, पण आपला प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान केंद्रांवर रांगा लावण्याचे मतदारांचे कष्टदेखील वाचले. शिवाय, एकाहून अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील तरी कोणा एकाच उमेदवारास विजय मिळत असल्याने, अन्य उमेदवारांना निवडणुकीच्या प्रचार आदी कामांसाठी करावा लागणारा खर्च अखेर पराभवामुळे वाया जात असतो, हे ओळखून त्याचीही बचत राजकीय पक्षांनी परस्परच करून दिली, हे या निवडणुकीचे आणखी एक वेगळेपण. मतदार हा राजा असतो, तो जागरूकपणे मतदान करून आपला प्रतिनिधी निवडतो, नको असलेल्या राजकीय पक्षास किंवा व्यक्तीस नाकारणारा स्पष्ट जनादेश देऊन त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची ताकद त्याच्या  एका मतामध्ये असते, वगैरे सारी वाक्ये मूल्य म्हणून ठीक असली, तरी राजकीय पक्षांनीच एखाद्या मतदारसंघात, तेथील मतदारांसाठी सहमतीने एक उमेदवार निवडून देण्याच्या निर्णयामुळे, मतदारांच्या मनाचा कल राजकीय पक्षांना आता उमगू लागला असल्याचेच स्पष्ट झाले आहे. या प्रथेची पुनरावृत्ती अन्य निवडणुकांमध्ये केली, तर मतदानाचा हक्क बजावण्याचे मतदाराचे कष्ट नक्कीच वाचतील. अशा तऱ्हेने निवडणुकीआधीच आपापसांत जागावाटप करून सामंजस्याने निवडणूक लढविण्याची प्रथा सर्वत्र सुरू झाली, तर मतदारराजाची मनधरणी करत घरोघरी फिरण्याचे कष्टदेखील वाचतील. मतदानाचा हक्क ही एक अंधश्रद्धा आहे, यावर शिक्कामोर्तब व्हायलाच हवे.