अगदीच थोडक्यात सांगावयाचे तर जेथे जेथे म्हणून हवा आहे तेथे तेथे मोबाइलची रेंज यावी हाच खरा शाश्वत व चिरंतन विकास आहे. अखेर काळ जनसंपर्काचा आहे. माणसांनी सतत संवाद साधला पाहिजे एकमेकांशी.  डेटा रिचार्ज मारून एकमेकांना व्हाट्स्याप केलेच पाहिजे. त्याशिवाय मैत्र जिवांचे कसे जुळणार? दुनिया मुठीत कशी येणार? तेव्हा मोबाइलची रेंज ही आजची जीवनावश्यक बाब आहे. तुम्हांस सांगतो, एकवेळ जनधन अकौंटात शून्य बॅलन्स असला तरी चालेल, परंतु हातात मोबाइल आणि त्यात किमान दीडशेचं रिचार्ज मारलेले पाहिजेच. त्याशिवाय मनुष्य परिपूर्णच होत नाही.परंतु ज्या प्रमाणे केवळ शौचालय बांधून चालत नसते, तर त्यात पाणीही असावे लागते, त्याचप्रमाणे हातात केवळ मोबाइल असून चालत नसते, तर त्यात रेंजच्या कांडय़ाही असाव्या लागतात. सरकारकृपेने आणि थ्रीजी घोटाळ्यामुळे या कांडय़ांची मुबलकता वाढलेली आहे हे खरे असले, तरी ही रेंज आणि ‘ती येते आणिक जाते’मधली ती यांची प्रवृत्ती सारखीच. हे अर्थातच जमिनीवरचे वास्तव. आकाशात तर अवघी बोंबच. जेथे हे थ्रीजी आणि फोरजीचे स्पेक्ट्रम विहरत असतात तेथेच आपल्या मोबाइल दूरध्वनींची अवस्था भाकड म्हशीसारखी व्हावी? पण आता हे चित्र बदलणार आहे. आकाशातही आपले मोबाइल फोन रेंजदार होणार आहेत. होय होय संवादप्रिय मित्रहो, विमानात बसून खुर्चीची पेटी बांधताक्षणी काळजावर दगड ठेवून आपल्याला मोबाइल फोन ‘उड्डाणावस्थेत’ न्यावा लागत असे.  किती पंचाईत व्हायची अशा वेळी. महत्त्वाचे निरोप देणे-घेणे राहून जायचे. बोलण्याचे जाऊ दे एकवेळ. पण व्हाट्स्याप! एवढय़ा सेल्फ्या काढलेल्या असतात आपण विमानात. त्या व्हाट्स्यापताही येत नाहीत तत्क्षणी. किती ‘कम्युनिकेशन गॅप’ निर्माण होतो त्यामुळे! पण हॅलो मित्रहो, आता हा अन्यायअत्याचार दूर होणार आहे. आता विमानातही आपल्याला मोबाइल वापरता येणार आहे. किती मौजेचा होईल ना तो प्रवास? एरवी कंटाळवाणाच असतो तो. लोक आपले डोळे मिटून पडलेले असतात, काही नवप्रवासी खिडक्यांतून खालचा भौमितिक भूगोल पाहात आपण आता कोणत्या स्टेशनाजवळ आलो याचा वेध घेत असतात, काही जणांनी पुस्तकांत डोळे रुतवलेले असतात. हवाईसुंदऱ्यांच्या कचकडी हास्यग्रस्त बोलण्याखेरीज सारेच शांत शांत. खरेच किती अंगावर येते ना, ती त्या काही तासांची मोबाइल विपश्यना? पण आता पाहा, विमानाचा प्रवास रेल्वेसारखाच आनंददायी होईल. विमानात दोन-तीन गुज्जूभाई असतील, तर सर्व प्रवाशांना बसल्याजागी बाजारचे चोक्कस अर्थशास्त्रही शिकता येईल. असलाच कोणाकडे चायनीज मोबाइल, तर काय सांगावे? यूटय़ूबवरील गानेअंजान्यांचाही रसास्वाद घेता येईल. फार काय, भावांनो, ‘हां कुट्टायस?’ अशी विचारणा करणारा फोन आलाच, तर आपल्यालाही मोठय़ा टेचात सांगता येईल, ‘हाय की हिथंच.. विमानात!’.. तुम्हांस सांगतो, ती प्रवासातील शांतता गेली चुलीत, विमानातून असे बोलण्यासारखे दुसरे सुख नसेल या जगतात! अखेर आयुष्याचा टॉकटाइम का असाच वाया घालवायचा असतो? माणसाने सतत बोललेच पाहिजे.. आपल्या नेत्यांप्रमाणे!!