19 January 2018

News Flash

एक कोटीचा ‘तलाश’

आमिर खानच्या रीमा कागली दिग्दर्शित ‘तलाश’च्या निमित्ताने एका रसिक पिढीला ओ. पी. रल्हनचा ‘तलाश’ नक्कीच आठवेल.. ‘फूल और पत्थर’च्या यशानंतर अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक ओ.

मुंबई | Updated: November 22, 2012 10:47 AM

आमिर खानच्या रीमा कागली दिग्दर्शित ‘तलाश’च्या निमित्ताने एका रसिक पिढीला ओ. पी. रल्हनचा ‘तलाश’ नक्कीच आठवेल.. ‘फूल और पत्थर’च्या यशानंतर अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक ओ. पी. रल्हन याने मोठी झेप घेताना या ‘तलाश’ चित्रपटाची निर्मिती केली. प्रमुख भूमिकेत बलराज साहनी, राजेन्द्रकुमार, शर्मिला टागोर व स्वत: ओ. पी. रल्हन. तर चित्रपटाला संगीत सचिन देव बर्मन यांचे. यातील ‘खाई है रे हमने कसम संग रहने की’ आजदेखील तितकेच सुमधुर आहे, १९७१ चा हा चित्रपट आहे. त्याच्या पूर्वप्रसिद्धीची तयारी करताना ‘एक कोटीचा तलाश’ यावर सगळा जोर होता. चित्रपटाच्या प्रसिद्धीत ‘निर्मिती खर्चाचा आकडा’ खेळवण्याचे हे पहिले उदाहरण. त्या काळात काही लाखांत चित्रपट निर्माण होत. (किती पैशात चित्रपट बनतो, त्यापेक्षा कसा बनतो, कोण बनवतो याला खूप महत्त्व असल्याचे ते दिवस होते.) रल्हनचे एक कोटींवर जोर देण्यामागचे कारण तोच जाणे. जास्त खर्चिक चित्रपट चांगलाच असेल असे प्रेक्षक समजतील (तशा दृष्टीने पाहतील) असा त्याचा समज असावा. एकदा चित्रपट आवडला की ‘तो किती खर्चात बनला’ व ‘तो किती रुपयांत आपण पाहतोय’ याला आपला चित्रपट प्रेक्षक फारसे महत्त्व देत नाही.)
‘तलाश’चे मुख्य चित्रपटगृह अप्सरा होते, तेथेच प्रीमियर झाला..
चित्रपटाचा शुक्रवारचा पहिला खेळ सुटला तेव्हा रसिकांची प्रतिक्रिया निराशाजनक होती. ‘एक कोटीची गुणवत्ता’ त्यात दिसलीच नाही. त्यामुळे चित्रपटाची गर्दी ओसरायला व त्याची पडेल चित्रपटात गणना व्हायला फारसा वेळ लागला नाही. त्या दिवसांत या चित्रपटावर विनोद करताना कोणी म्हणायचे, ‘तलाश नव्हे, रल्हनची लाश’ तर बाकीचे म्हणायचे, ले, ले रल्हनची अ‍ॅश (म्हणजे राख).पहिल्या ‘तलाश’नंतर बऱ्याच वर्षांनी धर्मेश दर्शन दिग्दर्शित ‘तलाश’ आला व गेलाही, त्यात अक्षयकुमार-करिश्मा जोडी होती. आमिर जे काही करतो ते दर्जेदारच असते असा ‘लगान’नंतर विश्वास निर्माण झाल्याने (तरी केतन मेहताच्या ‘मंगल पांडे’ने निराशा केली, ‘तलाश’ रहस्यरंजक असावा. अन्यथा, चांगले काही पाहू इच्छिणाऱ्या रसिकांचा शोध (अर्थात ‘तलाश’) कायम राहील..

First Published on November 22, 2012 10:47 am

Web Title: talaash of one crore
  1. No Comments.