राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात ऑनलाइन शिक्षण पध्दती अवलंब करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही अव्याहतपणे अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत गुंतले आहेत व त्यांनी शाळा बंद असल्या तरी शिक्षण चालू ठेवले आहे.

शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांसाठी परंपरागत पध्दतीने मिळणारी सुट्टी या वर्षीही देण्यात येणार आहे व त्या संबंधिचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे प्रा. गायकवाड यांनी आज माध्यम प्रतिनिधींसोबत अनौपचारिक चर्चा करताना सांगितले.

अकरावी महाविद्यालय प्रवेशासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाधिवक्ता व संबंधित यंत्रणेशी चर्चा करून लवकरच अकरावी महाविद्यालयाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा केला जाईल. कॉलेज सुरू व्हावे अशी सर्वांचीच इच्छा आहे. न्यायालयाच्या प्रक्रियेमुळे विलंब होतो आहे परंतु आँनलाईन अकरावी वर्गाला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे, याबद्दल गायकवाड यांनी समाधान व्यक्त केले.

शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळीच्या काळात कोणत्याही परीक्षांचे आयोजन करू नये अशा सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक रूची वाढावी व त्यांचे ज्ञानभांडार समृद्ध करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील राहील असा विश्वास वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali holiday for teachers and students announcement of the minister of school education aau
First published on: 04-11-2020 at 18:08 IST