कल्याण तालुक्यातील दहिसर मोरी गावाजवळील मोकाशी पाडा येथील शेतकरी एकनाथ मोकाशी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जमीन विक्री व्यवहारावरून बेदम मारहाण करणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश सुक्रया म्हात्रे यांच्यासह त्यांच्या १५ साथीदारांवर डायघर पोलीस ठाणे येथे बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहिसर मोरी, मोकाशी पाडा या तीन गावांतील शेतकऱ्यांची २८४ एकर जमीन पिंपरी गावाजवळ आहे. या जमिनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गाव पंच समिती आहे. ही जमीन विकसित करण्यासाठी मिळावी म्हणून अनेक विकासक या भागात येतात. ही जमीन आपण आणलेल्या गिर्‍हाईकाला विकावी म्हणून डोंबिवलीतील शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे मागील काही दिवसांपासून मोकाशी पाडा येथील शेतकरी एकनाथ मोकाशी यांच्यावर दबाव आणत आहेत. मात्र गाव समितीचा निर्णय झाल्याशिवाय आपण हा निर्णय घेऊ शकत नाही असे एकनाथ यांनी रमेश यांना वारंवार सांगितले आहे. तरीही रमेश हे एकनाथ यांना मोबाईलवर संपर्क करून ती जमीन आपण आणलेल्या गिर्‍हाईकालाच विकावी, यासाठी दबाव टाकत होते.

तरीही एकनाथ मोकाशी ऐकत नाहीत म्हणून गुरुवारी रात्री आठ वाजता रमेश म्हात्रे व त्यांचे समर्थक सचिन पाटील, वैभव पाटील व इतर पंधरा जण दोन ते तीन गाड्यांच्या मधून मोकाशी पाडा इथे आले. त्यांच्या वाहनांमध्ये लाकडी दांडके होते. रमेश यांनी एकनाथ मोकाशी यांना भेटून, मी आता जमीन खरेदीसाठी गिऱ्हाईक आणले आहे त्याला जमीन विक्री कर, अशाप्रकारे धमकावले. परंतु एकनाथ यांनी या प्रकरणाबाबत समितीला विचारून निर्णय घेतो, असे म्हणताच संतप्त होत, रमेश म्हात्रे यांनी एकनाथ यांना शिवीगाळ सुरु केली. एकनाथ यांचा मुलगा देविदास याला शिवीगाळ आणि मारहाण केली गेली. त्यांचा दुसरा मुलगा प्रशांत मध्ये पडल्यावर त्यालाही बेदम मार बसला. या मारहाणीमध्ये एकनाथ आणि प्रशांत यांचे डोके फुटले.

एकनाथ यांच्या सुना भांडणात मध्ये पडल्यावर त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी एकनाथ मोकाशी यांनी डायघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेले होते. त्याआधी पोलिसांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी वैद्यकीय उपचारही करून घेतले होते. परंतु पोलीसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. यामागे राजकीय दबाव असल्याचे समजते.

शेवटी आमदार प्रमोद पाटील यांनी मध्यस्थी केली तसेच उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्या भेटी घेऊन गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. अखेर ६ दिवसांनी बुधवारी रात्री एकनाथ मोकाशई यांच्या तक्रारीवरून रमेश म्हात्रे आणि त्यांच्या १५ साथीदारांविरुद्ध डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रमेश म्हात्रे यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. महापालिका अधिकारी नारायण प्रकरणात ते अडचणीत आले होते. राजकीय दबावामुळे त्यांची याप्रकरणी सुटका झाली होती.